हेलिकॉप्टरच्या पेट्रोल टाकीत माती टाकण्यात आली व साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला..

महाविकास आघाडीला स्थापनेपासूनचं पनोती लागली आहे. करोना आला, सुशांत गेला, कंगना भांडली, मुंडे गंडले आणि राठोड गेले. एकामागून एक प्रकरण चालू असताना आत्ता अंबानी प्रकरण मिडीयात गाजायला लागलय.

आत्ता ज्यांना काहीच पत्ता नसतोय त्यांना दोन चार ओळीत प्रकरण सांगतो.

मुकेसभाय यांच्या घराबाहेर एक संशयास्पद स्कॉर्पियो घावली. यात स्फोटकं होती. ती गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

बातम्यात त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं असलं तरी या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझेंच नाव घेवूनच महाविकास आघाडीच्या विरोधात मोर्चा खोलला आहे.

तर असं हे एकूण प्रकरण आहे.

थोडक्यात काय तर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर असणारी संशयास्पद स्फोटकांनी भरलेली गाडी, गाडीच्या मालकांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यामुळे बिघडणारे राजकारण ही सध्याची राजकीय स्थिती…

या पार्श्वभूमीवर खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे फक्त ११ वर्षांपूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगू वाटतो. काहीसा मिळताजुळताच हा प्रकार होता पण तेव्हा लक्ष्य होते ते मुकेशभाईंचे छोटे बंधु अनिल भाई निशाण्यावर असल्याचं सांगितलं गेलं. ही केस देखील एक कॉन्स्पेरेसी थेअरी म्हणून पुढे येत गेली आणि काळानुसार चर्चेतून बाहेर गेली.

तारीख होती २३ एप्रिल २००९…

या दिवशी एक बातमी चर्चेत आली. अनिल अंबानीच्या हेलिकॉप्टरच्या फ्यूएल टॅन्कमध्ये खडी, चिखल टाकून घातपात करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

एअरवर्क्स इंडियन इंजिनीअरिंगचे कर्मचारी भारत बोरगे यांनी अनिल अंबानीचे हेलिकॉप्टर वापरात येण्यापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरची पाहणी केली असता त्यांना ही गोष्ट नजरेत आली होती. त्यानंतर बातमी पसरली व अनिल अंबानीचा घातपात करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची शक्यता वर्तवली गेली..

झालेलं अस की अनिल अंबानी यांचे हेलिकॉप्टर जुहू येथील एअरवर्क्सच्या हॅंगरमध्ये देखभालीसाठी दाखल झाले होते. त्यांनतर फायनल तपासणीसाठी आलेले भारत बोरगे यांना हेलिकॉप्टरच्या फ्यूएल टॅंकमध्ये दगड, चिखल असल्याचे दिसले. कोणीतरी हे मुद्दामहून टाकल्याचे चिन्ह होती. अशा अवस्थेत जर हेलिकॉप्टर उडाले असते तर काही काळ ढगात जावून जमिनीवर येवून पुन्हा कायमस्वरूपी ढगात गेले असते.

झालं आज जरी अनिल अंबानी कोर्टात माझ्याकडे फक्त बायकोचं सोनं असल्याचं सांगत असले तरी तेव्हा त्यांची परिस्थिती चांगली होती. मुकेशभाईं प्रमाणेच त्यांच्या नावाची चलती होती. अनिल अंबानींना संपवण्याचा कट म्हणून या गोष्टीकडे पाहण्यात येवू लागलं.

या प्रकारानंतर अंबानींचे पायलट आर.एन.जोशी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. साहजिक प्रकरण पुढे क्राईम ब्रॅन्चकडे गेले.

मात्र यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रत्यक्ष साक्षीदार असणारे भारत बोरगे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. या घातपातामागे एअरवर्क्समधील आजी-माजी कर्मचारी असल्याची माहिती त्यांनी दिली होती असही सांगण्यात आलं.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चारच दिवसात भारत बोरगेंचा मृत्यू झाल्याने शंका वाढल्या.

मात्र बोरागेंच्या माहितीवर क्राईम ब्रॅन्चने उदय वारेकर आणि पलराज थेवर या दोघांना अटक केली. मात्र प्रमुख साक्षीदाराचाच मृत्यू झाल्याने केस वीक होतं गेली अस सांगण्यात आलं. पुढे सत्र न्यायालयाने घातपात घडविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात या दोघांची मुक्तता केली. पुराव्याअभावी या दोघांना निर्दोष जाहीर करण्यात आलं. ही घटना व्यवस्थापक व कामगार संघटनांच्या वादातून घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.व्ही कुलकर्णी यांच्यासमोर या दोन आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यात आलेला होता. या दरम्यान एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या होत्या. साक्षीदारांच्या साक्षी व डीजीसीए ने सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर फ्युएल टॅंकमध्ये दगडमाती टाकल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र ही दगडमाती वारेकर व थेवर यांनी टाकल्याचं सिद्ध करता आलं नाही.

वारेकर व थेवर यांनीच हा घातपाताचा कट रचला होता हे सांगणारा एकही साक्षीदार नव्हता. उलटपक्षी आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्यासाठीच कंपनीने हा बनाव रचल्याची माहिती या बचाव पक्षाकडून देण्यात आली होती.

इतक्यावरच हे प्रकरण थांबल नाही तर कंपनीवर आरोप केल्यानंतर आरोपींच्या बचाव पक्षाने पोलीसांना देखील संशयाच्या पिंजऱ्यात उभा केलं होतं. या युक्तीवादावेळी भारत बोरगेंच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी झाली नसल्याचं सांगण्यात आलं तसेच या प्रकरणाशी त्यांच्या मृत्यूचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

पण बरेच युक्तीवाद झाल्यानंतरही वानेकर व थेवर यांची सहीसलामत सुटका झाली आणि या प्रकरणावर पडदा पडला…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.