२६/११ नंतर अंबानींना ईमेल मिळाला, “ताज के बाद अब तुम्हारी बारी है.. “

गेला महिनाभर झालं संपूर्ण भारतात एकच गोष्ट चर्चेत आहे. अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये सापडलेली स्फोटकं आणि त्या सोबत लिहिली चिठ्ठी,

 प्रिय नीता भाभी और मुकेश भैया और परिवार यह सिर्फ एक ट्रेलर है। अगली बार, आपके परिवार के पास उड़ान भरने के लिए पर्याप्त सामान होगा। सावधान रहे।

ही स्फोटके सापडली आणि देशभर खळबळ उडाली. अशातच काळ त्या स्कॉर्पिओच्या मालकाचा गूढ मृत्यू झाला. हे प्रकरण केंद्र सरकारने एनआयए कड सोपवलं. यात एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला. ते सध्या अटकेत आहेत आणि रोज या प्रकरणाबद्दल नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

पण अजूनही प्रश्न अनुत्तरित राहिलाय की ज्यांनी कोणी हे सगळं घडवून आणलंय त्यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके का ठेवली आणि सोबत अशी चिठ्ठी का लिहिली? जसा तपास पुढे चाललंय तसा या सगळ्या गोष्टी गूढ बनत चालल्या आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणाची सुरवात झालेल्या अंबानी कुटूंबियांची अजूनही साक्ष वगैरे घेतलेल्या नाहीत.

जगातल्या सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या रिलायन्स फॅमिली साठी ही पहिली घटना नाही. यापूर्वी देखील धीरूभाईंपासून ते आजवर अंबानींवर अनेकदा हल्ल्याचे प्रयत्न झालेले आहेत. सगळ्यात जास्त हल्ले झाले ते सर्वात धाकट्या अनिलभाईंवर.

गोष्ट आहे दोन हजारच्या दशकातली.

नुकताच मुंबईवर २६/११ चा भयंकर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता. पाकिस्तानमधून आलेल्या कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सीएसटीपासून ते ताज हॉटेलपर्यंत संपूर्ण शहरात येक ७ बंदुका घेऊन फिरत होते. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांच्या सारखे शूरवीर ऑफिसर्स मारले गेले. ताज हॉटेलमध्ये लपलेल्या अतिरेक्यांनी तर शेकडो लोकांना बंदुकीच्या जोरावर दोन-तीन दिवस वेठीस धरलं.

या हल्ल्याच्या आठवणी देखील संपूर्ण जगाला कापरं भरवणाऱ्या होत्या. त्या नंतर फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात सिक्युरिटी कडक करण्यात आली. असे हल्ले परत होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात होती.

अशाच तंग वातावरणामध्ये अचानक रिलायंस ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांना पर्सनल आयडीवर एक पाकिस्तानमधून धमकीचा मेल आला. त्यात लिहिलं होतं,

“अनिल अंबानी तुम्हारे पास तो बहुत पैसा है.ताज के बाद अब तुम्हारी बारी है..”

सगळ्या सुरक्षा यंत्रणेचं धाबं दणाणलं. या पूर्वी देखील अनिल अंबानी यांच्यावर एकदा दोनदा हल्ल्याचे प्रयत्न झाले होते.

त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये माती भरण्याचे प्रयत्न झाला होता. एकदा तर दुबई वरून शार्प शुटर अनिल अंबानींना मारण्यासाठी आला होता. रोज मरीन ड्राइव्ह वर जॉगिंगसाठी जाणाऱ्या अनिल अंबानी यांच्यावर हा हल्ला केला जाणार होता.

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना याची खबऱ्यांकडून टीप मिळाली आणि मुंबई पोलिसांनी त्या शार्प शुटरला मरीन ड्राइव्हवर जाळं पसरवून पकडलं.     

या वेळी मात्र खबऱ्या कडूनही काही टीप मिळत नव्हती. अंडरवर्ल्ड पासून ते टेररिस्ट संघटनांपर्यंत नेमका कोणाचा हात असू शकतोय याची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. मेल पाठवणारा स्वतःच नाव मुख्तार असं सांगत होता तर त्याचा आयडी होता ‘[email protected]

 पोलिसांचं नेटवर्क कंबर कसून कामाला लागलं होतं पण काही धागे दोरे लागत नव्हते. अखेर तीन दिवसांनी सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटिव्ह सेलला सापडलं.

तो मेल झारखंड मधल्या धनबाद शहरातून आला होता. तिथले गँग्स, कोळशाच्या खाणीचे व्यवहार यातून ही धमकी आली असावी का याचा शोध घ्यायला मुंबई पोलिसांची टीम झारखंडला पोहचली. तिथल्या सायबर कॅफे वाल्याला उचललं. या सगळ्या चौकशीतुन समोर आलं की १७ वर्षांच्या मुलाने हा मेल पाठवला होता.

त्या मुलाचं नाव राजेश कुमार अगरवाल.

मूळचा बंगालचा. घरचा प्रचंड श्रीमंत. वडील तिथल्या ऑइल बिझनेस मधले नावाजलेले. पोरग लहान पणापासून उनाड. त्याला अभ्यास सोडून इतर गोष्टींचाच मोठा नाद होता. शाळेत सारखं नापास होत असल्यावर त्याला काढून टाकण्यात आलं. घरी लाड होतात म्हणून त्याला सरळ करण्यासाठी त्याच्या आजोळी धनबादला पाठवण्यात आलं.

पण गड्याने तिथं जाऊन सुद्धा आपल्या कारभाराने ऊत आणला. गेम खेळायला म्हणून सायबर कॅफेमध्ये जायचा. तिथं जाऊन कॉम्प्युटरचा नाद लागला. इंटरनेट हॅकिंग मध्ये काड्या करणे त्याने सुरु केलं. त्यातूनच त्याने हा अनिल अंबानीला मेल पाठवण्याचा उद्योग केला.

राजेश अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली. इंटरनेटवरून तो कुठल्या अतिरेकी संघटनांच्या कचाट्यात आलाय का हे तपासलं. पण तस काही नव्हतं. मग त्याने हा प्रकार का केला हे विचारलं तर तो म्हणाला,

“टीव्हीवर २६/११ ची घटना पाहून मला खूप दुःख झालं होतं. अशा घटना घडूनही आपल्या देशात पोलीस बेफिकिरीने वागतात हे मला सहन होत नव्हतं. याच देशप्रेमाच्या भावनेतून मी ठरवलं कि जर एखाद्या मोठ्या उद्योगपतीला धमकीचे पत्र पाठवले तर सुरक्षा यंत्रणा जागी होईल. “

पोलिसांनी कप्पाळाला हात मारून घेतला. राजेश अग्रवालची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. अनिल अंबानी यांची सकाळची मॉर्निंग नेहमी प्रमाणे पुन्हा सुरु झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.