फक्त लेखनच केलं नाही तर आपल्या कृतीतून समाजकार्य देखील करून दाखवलं

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल…नाव घेतलं कि त्यांचे समग्र साहित्य नजरेसमोर उभं राहतं. मराठी साहित्याचा खजिना हे फक्त लेखन म्हणून मर्यादित नव्हतंच कधी तर त्यांच्या लिखाणाचे पडसाद समाजमानसावर उमटून अनेक आंदोलने, चळवळी उभ्या राहिल्या….पण त्यांचं आज यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट उर्फ बाबा यांनी रिपोर्ताज या महत्त्वपूर्ण प्रकाराची नव्याने ओळख करून दिली. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कामात तसेच अनेक कलांच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला, समाजकार्यात अग्रेसर असलेला संवेदनशील व्यक्ती आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 

संवेदनशील मत, गाढा अभ्यास आणि संशोधक वृत्ती असं समीकरण दिसून येतं ते म्हणजे अनिल अवचट यांच्या लिखाणात 

अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर इथला. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे  आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झालेले. आठ भावंडात ते  सर्वात मोठे होते, त्यांच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावे म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी ठेवले. १९५९ मध्ये एस .एस.सी. झाल्यावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस. झाले. याच कॉलेजमधील त्यांची मैत्रीण सुनंदा हिचेसोबत त्यांचे लग्न झाले.

त्यांनी सुरू केलेल्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने’ महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांना सावरलं आहे.

मुक्तांगण….

डॉ. अनिल अवचट यांचं लिखाण तर प्रभावी आहेच, मात्र त्यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती.  अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही पद्धत वापरली जाते. सद्या अनिल अवचट यांची मुलगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर आता मुक्तांगणचं काम पाहतात.

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदार यांचा समावेश आहे. 

 मराठीमध्ये रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनीच प्रथम सुरू केले.

डॉक्टर झाले तरी त्यांचा कल कायमच समाजकार्याकडे होता. डॉक्टरकीचा व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळी निवडल्या. पत्रकारिता केली,तरी त्यांनी व्यवसाय म्हणून पत्रकारिता केलीच नाही. पण आपल्या पत्रकारितेचा सामान्य लोकांना काय फायदा होईल याच्याच प्रयत्नात ते होते. मग समाजावर त्यांचं लिखाण देखील चालू झाले. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी अनेक पुस्तकं लिहिली. साधना व पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले. 

१९६९ साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे पूर्णिया पुस्तक प्रसिद्ध झालं, जे कि त्यांनी युक्रांदला अर्पण केलं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

त्यांचे साहित्य –

‘वेध’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘आप्त’, ‘कार्यरत’, ‘माणसं’, ‘स्वतःविषयी’, ‘भ्रम’, ‘मोर’, ‘छंदांविषयी’, ‘पूर्णिया’, ‘दिसले तसे’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी उत्तम ललित लेखनाचा एक वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच अमेरिका, आपलेसे, आप्त, बहर शिशिराचा, छेद, धार्मिक, कार्यमग्न, कार्यरत, कुतुहलापोटी, मजेदार ओरिगामी, माणसं, मुक्तांगणची गोष्ट, प्रश्न आणि प्रश्न, वनात…जनात.., छंदांविषयी, पुण्याची अपूर्वाई, स्वतःविषयी अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

डॉ. अनिल अवचट यांनी बालसाहित्यावरही मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. “सृष्टीत.. गोष्टीत” या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आला. इतकंच नाही तर अनिल अवचट यांची पुस्तकं सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली.

त्यांना मिळालेले पुरस्कार –

डॉ. अनिल अवचट यांच्या या सामाजिक कार्याची यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्‌मय पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

त्यांनी आयोवा विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेमध्ये (१९८८) भारतातर्फे निवड झालेली आहे. याशिवाय त्यांना इतरही अनेक पुरस्कार लाभले आहेत ; त्यामध्ये  फाय फाउंडेशन पुरस्कार , अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, न्या.रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार ( २००८,सृष्टीत गोष्टीत),साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (२०१०,सृष्टीत गोष्टीत ), महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०१७), इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. 

एक डॉक्टर, मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार अशी सगळी ओळख असलेल्या तसेच त्यांच्या योगदानाला बोल भिडूचा सलाम !

 हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.