नोटबंदीची आयडिया देणाऱ्या बोकील काकांकडे, पेट्रोलचे दर कमी करण्याचा पण प्लॅन आहे

अजूनपण लख्ख आठवतंय, ८ नोव्हेंबर २०१६ ची संध्याकाळ. टीव्हीवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, ‘आज रात्री बारानंतर देशात पाचशे आणि हजाराच्या नोटा चालणार नाहीत.’ आता आपल्याला टेन्शन यायचा तसा काय विषय नव्हता. कारण आपल्याकडं पैसेच मोजून दोन तीन हजार, त्यामुळं आपण काय पॅनिक झालो नाही. पण ज्यांच्याकडे झोलचा पैसा होता त्यांना मात्र बरीच सूत्रं हलवावी लागली.

आता नोटबंदीला पाच वर्ष झाली. आज सकाळीपण तुमच्या व्हॉट्सअपवर पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या फोटोला हार घालून ‘तुमची आठवण येते’ वगैरे थुकरट मेसेज फिक्स आलेले असणार. अजूनपण लोकं म्हणतात की, नोटबंदी झाली तेव्हा वाटलेलं आता काळा पैसा परत येणार, सगळ्यांच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये येणार, आता भिडू लोक प्रत्यक्षात काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये.

ब्रेकअप झाल्यावर पण बरोबर बर्थडेच्या दिवशी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची आठवण येते, तसंच नोटबंदीचं झालंय. सनम… तुमको ना भुला पायेंगे हम…

आता नोटबंदी म्हणलं की, जसे मोदीजी आठवतात; तसंच आणखी एक माणूस आठवतो तो अर्थतज्ञ अनिल बोकील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटबंदीचा सल्ला देणारा माणूस म्हणजे बोकील काका.

अर्थक्रांती प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक असणारे बोकील हे मूळचे लातूरचे. ते पेशानं मेकॅनिकल इंजिनीअर, मात्र त्यांना अर्थकारणात जास्त रस आहे. अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या आधीपासूनच म्हणजेच १९९९ पासूनच ते कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या सिद्धांताचे प्रणेते आहेत.

नरेंद्र मोदी २०१३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री जाताना बोकील यांनी त्यांना नोटबंदीवर ९ मिनिटांचं प्रेझेंटेशन दाखवलं होतं. थोडक्यात आवरणारी ही बैठक साधारण दोन तास चालली आणि बोकील यांच्याकडून लेखी प्रस्तावही मागवण्यात आला.

विशेष म्हणजे, मोदींच्या आधी हे प्रेझेंटेशन त्यांनी मनमोहन सिंग यांनाही दाखवलं होतं.

नोटबंदीचा निर्णय चांगलाच फसला. लोकांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, सोबतच अनागोंदीही माजली. बँकांच्या रांगेत थांबून अनेकांचा मृत्यूही झाला. बोकील यांनी, ‘आपण पूर्ण कॅशलेस इकॉनॉमी व्हावी याच्या समर्थनात कधीच नव्हतो. पण ५० रुपयापेक्षा मोठी नोट असण्याचं काहीच कारण नाही.’ असं मत नोटबंदीनंतरच्या परिस्थितीबाबत व्यक्त केलं होतं.

लोकांच्या मृत्यूबद्दल बोलताना त्यांनी, ‘हे भारतासारख्या देशात घडणारच. आपण फार संवेदनशील आहोत. ही सगळी बदल झाल्याची किंमत आहे,’ असं अजब विधान केलं होतं.

आता बोकीलकाकांची आठवण येण्याचं कारण फक्त नोटबंदीचा बड्डे हेच नाही. तर सध्या वाढलेले पेट्रोलचे दरही आहेत.

आता तुम्ही म्हणाल इथं पेट्रोल भरून भरून पाकीट रिकामं व्हायला आलं आणि तुम्ही कुठं बोकील काकांची आठवण काढताय. पण काकांकडे पेट्रोलची किंमत कमी करण्याचं सोल्युशन आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा पुनरुद्धार या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात बोलताना बोकील म्हणाले, ‘पेट्रोल उत्पादनांच्या किमती गगनाला भिडत आहेत. यामुळं महागाई निर्देशांक वाढला आहे. यातून सुटका करण्यासाठी सरकारनं केंद्रीय कर रद्द करून बँक व्यवहार शुल्क (बीटीसी) घ्यायला सुरुवात करावी. त्यामुळं कर वसूल केल्यानंतरही पेट्रोलचा दर प्रतिलिटर ४० रुपयापर्यंत पोहोचेल.’ अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

आता तसं बघायला गेलं तर पेट्रोलचे रेट पडणं सामान्य लोकांच्या फायद्याचं आहे. पण बोकीलकाकांचा फसलेला प्लॅन पाहता, विश्वास ठेवायला पाहिजे की नाही?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.