दुसरे CDS अनिल चौहान देखील गुरखा रेजिमेंटचे आहेत, असा आहे गुरखा रेजिमेंटचा इतिहास

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युनंतर ९ महिने सीडीएसचं पद तसंच रिक्त होतं. पण काल २८ सप्टेंबरला दुसरे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय. 

चीनविरुद्ध सामरिक रणनीती जोखणारे तज्ज्ञ आणि बालाकोट एअर स्ट्राईकची योजना आखण्यात महत्वाची भूमिका असलेले  निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे ३ स्टार अधिकारी होते. पहिले सीडीएस विपीन रावत हे निवृत्तीपूर्वी ४ स्टार अधिकारी होते. त्यामुळे अनिल चव्हाण हे ३ स्टार वरून ४ स्टार पदावर नियुक्त केलेले पहिले अधिकारी ठरले आहेत. 

स्टारचा फरक असला तरी दोन्ही अधिकारी एकाच उत्तराखंड राज्यातले आहेत. एवढंच नाही तर दोघेही एकाच रेजिमेंटमधून आलेले आहेत.

ती म्हणजे गुरखा रेजिमेंट….

हे वाचून आश्चर्य वाटलं असेल की, गुरखा या नेपाळी रेजिमेंटचे सैनिक भारताचे सीडीएस कसे? तर त्यासाठी गुरखा रेजिमेंटचा इतिहास आणि स्ट्रक्चर बघा. 

गुरखा रेजिमेंटमध्ये जरी नेपाळी सैनिकांची भर्ती केली जात असली तरी त्यात सगळे सैनिक नेपाळी नसतात. साधारणपणे ६० टक्के सैनिक नेपाळी असतात तर ४० टक्के सैनिक भारतीय गुरखे असतात. त्यामुळेच नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंमधील बिपीन रावत आणि अनिल चौहान हे गुरखा रेजिमेंटचेच सैनिक आहेत. 

ही गुरखा रेजिमेंट निव्वळ भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात पराक्रमी रेजिमेंटपैकी एक रेजिमेंट मानली जाते. 

भारताचे सातवे सीएएस फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी हे जेव्हा गुरखा रेजिमेंटचे प्रमुख झाले तेव्हा त्यांनी गोरख्यांचं वर्णन केलं होतं.

ते म्हणाले होते, “जर कोणी म्हणतो की त्याला मरणाची भीती वाटत नाही, तर तो एकतर खोटं बोलतोय किंवा तो गुरखा आहे.”

पण या गुरखा रेजिमेंटला मृत्यूला न घाबरणारी रेजिमेंट अशी उपमा का दिली जाते आणि ही रेजिमेंट भारताच्या आर्मीत कशी आली हे रेजिमेंटच्या इतिहासातुन कळते. 

माजी लष्करप्रमुख जनरल व्हीपी मलिक (निवृत्त), ज्यांनी त्यांच्या ‘इंडियाज मिलिटरी कॉन्फ्लिक्ट्स अँड डिप्लोमसी’ या पुस्तकातसांगतात की हिमालयीन देशाशी भारताचा लष्करी संबंध महाराजा रणजीत सिंग यांच्या कारकिर्दीपासून आहे त्यावेळी नेपाळी सैनिकांची भरती करण्यात येत होती. नेपाळी सैनिकांना सैन्यात भरती करणं त्यावेळी चांगलं लक्षण मानलं जायचं.

त्यानंतर ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी २४ एप्रिल १८१५ रोजी नासिरी रेजिमेंट म्हणून गुरखा रेजिमेंटची पहिली बटालियन उभारली. पहिले महायुद्ध सुरू झाले तोपर्यंत ब्रिटिश भारतीय सैन्यात १० गुरखा रेजिमेंट होत्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, नोव्हेंबर १९४७ मध्ये  ब्रिटन-भारत-नेपाळ त्रिपक्षीय करारानुसार या रेजिमेंट ब्रिटीश आणि भारतीय सैन्यांमध्ये विभागल्या गेल्या. एक लाख सैनिकांसह ६ गुरखा रेजिमेंट भारतात आल्या, ज्यामध्ये  ११ गुरखा रायफल्स आणखी एक रेजिमेंट वाढवण्यात आली. 

या ७ रेजिमेंट मध्ये असलेल्या ३९ बटालियन्स अशाप्रकारे विभागलेल्या आहेत. 

१ गुरखा रायफल्स – ६ बटालियन्स

३ गुरखा रायफल्स – ५ बटालियन्स

४ गुरखा रायफल्स – ५ बटालियन्स

५ गुरखा रायफल्स फ्रंटियर फोर्स – ६ बटालियन्स

८ गुरखा रायफल्स – ६ बटालियन्स

९ गुरखा रायफल्स – ५ बटालियन्स

११ गुरखा रायफल्स – ६ बटालियन्स

यातीलच ११ गुरखा रायफल्समधूनच बिपीन रावत आणि अनिल चौहान यांची सुरुवात झाली होती. 

यात भारतातील गुरख्यांची भर्ती थेट भारतीय आर्मीत करण्यात येते. मात्र नेपाळमधील गुरख्यांच्या भरतीसाठी वेगळी प्रोसेस आहे. 

यासाठी भारत, नेपाळ आणि ब्रिटन हे तीन देश एकत्र येतात. ब्रिटनच्या सैन्यातही नेपाळमधून गुरखांची भरती केली जाते. नेपाळी, ब्रिटिश आणि इंडियन आर्मी मिळून नेपाळमध्ये गुरखांच्या भरतीसाठी एक दिवस फायनल करतात. त्या दिवशी तिन्ही सैन्याचे प्रतिनिधी नेपाळमधील एका विशिष्ट ठिकाणी लेखी आणि शारीरिक चाचणी घेतात.

यामध्येही समजा १०० उमेदवार सिलेक्ट करण्यात आले आहेत. तर यातील टॉपच्या २० उमेदवारांना तिन्हीपैकी एक आर्मी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिला जातो. हे सैनिक बऱ्यापैकी ब्रिटिश आर्मीचा पर्याय निवडतात कारण ब्रिटिश आर्मीचा पगार आणि भत्ता सर्वाधिक असतो. त्यापाठोपाठ ते भारतीय आर्मीचा पर्याय निवडतात. भारतीय लष्कर नेपाळी आर्मीपेक्षा २.५ पट वेतन आणि भत्ता देते. त्यामुळं दुसरा लॉट भारत उचलतं तर बाकीचे सैनिक नेपाळी आर्मीत घेतले जातात.  

या नेपाळी सैनिकांना सेवेदरम्यान आणि सेवानिवृत्तीनंतर भारतीय सैनिकांसारखेच फायदे मिळतात.

त्यांना भारतीय सैनिकांप्रमाणेच वैद्यकीय सुविधा मिळतात आणि अनेकदा भारतीय लष्कराची वैद्यकीय पथके नेपाळला भेट देतात. नेपाळी सैनिकांना निवृत्तीनंतरही सेम पेन्शन मिळते. त्यामुळे भारतीय लष्कराने नेपाळी सैनिकांशी कधीही भेदभाव केला नाही. भारतीय लष्कर नेपाळच्या गावांमध्ये लहान पाणी आणि वीज प्रकल्पांसह कल्याणकारी प्रकल्पही चालवते. त्यामुळे नेपाळमध्ये भारतीय सैन्यमध्ये भरती होण्याकडे नेहमीच कल राहिलेला दिसतो. 

गुरखा रेजिमेंटमुळे भारत आणि नेपाळच्या आर्मीमध्ये एक इंटरेस्टिंग बॉंड तयार झाला आहे. 

तो म्हणजे भारताचे आर्मी चीफ नेपाळी आर्मीचे मानद चीफ असतात तर नेपाळ आर्मीचे चीफ भारताच्या आर्मीचे. आणि याची सुरवात झाली होती सॅम मानेकशॉ यांच्यापासून. १९७२ मध्ये जेव्हा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ गुरखा रेजिमेंटचे ऑफिसर होते तेव्हा सैनिक त्यांना  प्रेमाने सॅम बहादूर म्हणायचे.

यामुळेच त्यांना नेपाळी सैन्याचे मानद प्रमुख बनवले गेले. जी परंपरा अजूनही पाळली जाते. भारतात सध्या अंदाजे ३५ हजार नेपाळी सैनिक सात रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत. त्यापैकी काही भारताच्या पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर देखील तैनात आहेत.

गुरखा सैनिकांना मृत्यूला न घाबरणारे का म्हणतात ते या सैनिकांनी लढलेल्या युद्धांना पाहिल्यावर कळते.

१८४६ मध्ये ब्रिटिश आणि शीख साम्राज्यामध्ये झालेल्या पहिल्या अँग्लो शीख युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने गुरखा सैनिकांनी भाग घेतला. त्यात ब्रिटिशांचा विजय झाला.

१८५७ च्या उठावादरम्यान जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्लीला वेढा दिला होता तेव्हा गुरखा रेजिमेंटला याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात सुद्धा गुरखा रेजिमेंट यशस्वी झाली होती.

१८७८-८० च्या दुसऱ्या अँग्लो अफगाण युद्धात गुरखा सैनिकांनी अफगाणिस्तानचा काही भाग ब्रिटिशांना जिंकून दिला होता. अफगाणिस्तानात सहज जिंकता येत नाही पण गुरख्यांच्या पराक्रमामुळे १९१९ च्या तिसऱ्या अँग्लो अफगाण युद्धात सुद्धा गुरखा बटालियनला पाठवण्यात आलं होतं. 

१९९० मध्ये चीनचं बॉक्सर उठाव, १९४१ चं अँग्लो इराकी युद्ध, १९४१ चं मलेशियातील जित्राचं युद्ध, १९४३ मध्ये ट्युनिशियाचं वाडी अक्रीत युद्ध, १९४४ चं ब्रिटिश-जपानी सैनिकांत झालेलं इंफाळचं युद्ध, १९६२-६६ चा ब्रुनेई विद्रोह या युद्धात भाग घेतला. 

मेजर धनसिंग थापा यांना १९६२ च्या भारत-चीन युद्धात परम वीर चक्र मिळाला होता तसेच लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांना १९९९ च्या कारगिल युद्धात परमवीर चक्र मिळाला होता.   

तर १९८७-९० दरम्यान श्रीलंकेत चालू असलेल्या गृहयुद्धात गुरखा सैनिकांना शांतात सैनिक म्हणून तैनात करण्यात आलं होतं. पण एलटीटीएच्या दहशतवाद्यांनी हल्ले केल्यामुळे गुरखा रेजिमेंटनेसुद्धा युद्ध सुरु केलं. यात त्यांनी १३ शीख लाईट इन्फेन्ट्री आणि पॅराकमांडोच्या १० जवानांची सुटका केली होती.

डोक्यावर नसलेले केस आणि डावीकडे झुकलेल्या हॅटमुळे गुरखा रेजिमेंट सहज ओळखता येते. गुरखा सैनिकांनी भारताच्या बाहेर सुद्धा लढाया लढलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यातून रिटायर्ड झालेल्या गुरखा सैनिकांना थायलंड, सिंगापूर या देशातील पोलीस दलात नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येते. गुरखा रेजिमेंटच्या या पराक्रमामुळेच भारताच्या सैन्यात सगळ्यात शक्तिशाली असलेल्या सीडीएस पदावर विपीन रावत यांच्यानंतर अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय. 

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.