अटकेच्या भीतीने अनिल देशमुख ईडी समोर हजर होणं टाळत आहेत का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांनी यावेळी वय ७२, उच्चरक्त, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण सांगितलं आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

या आधी शुक्रवारी ईडीची रेड संपल्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. परंतु, ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती.

त्यानुसार आज हजार राहण्यासाठी देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र आपल्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

119128566 5a9d955c 3560 4330 9065 06d757af4fa6

मात्र यामुळे आता एक प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे तो म्हणजे अनिल देशमुख अटकेच्या भीतीने प्रत्यक्ष उपस्थिती टाळत आहेत का?

२५ तारखेला सकाळी-सकाळी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह ५ ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी प्रामुख्यानं १०० कोटी वसुली तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांनंतर या सगळ्या पैशाचं नेमकं झालं काय झालं? हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली का? या सगळ्याच्या तपासासाठी केली होती. 

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना पहिलं समन्स बजावलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितला.  

त्यानंतर ईडीने रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेतलं. त्यांची जवळपास १० चौकशी केली, आणि त्यानंतर रात्री १२:३० वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली असल्याचं ईडीने सांगितलं.

याच वकिलांचा रिमांड मिळण्यासाठी न्यायालयात सुनावणी सुरु असताना ईडीने अनिल देशमुख यांचं देखील नाव घेतलं होतं.

सचिन वाझेने अनिल देशमुख यांना पैसे दिले असल्याचा दावा

त्यादिवशी ईडीचे वकील सुनिल गोन्सालवीस यांनी याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार,

माजी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, कसे ते देखील ईडीने न्यायालयात सांगितले.

डिसेंबरमध्ये सचिन वाझेला ४० लाख रुपये गुडलक मनी देण्यात आले. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या झोन १ ते झोन ७ कडून १ कोटी ६४ लाख रुपये दिले गेले. सोबतचं बार, पब आणि ऑर्केस्ट्राद्वारे झोन ८ ते झोन १२ कडून २ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आले. हे सर्व पैसे सचिन वाझेने अनिल देशमुख यांना देण्यात येणार असं सांगितलं.

याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. हा सगळा पैसा देशमुख यांनी दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेकडे वळवला, पण हि कंपनी केवळ कागदावरच असून केवळ ट्रान्सफर एन्ट्री करण्याच्या कामासाठी वापरल्या जातात असा ईडीने आरोप केला आहे.

त्यानंतर देशमुख यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी पत्र पाठवून हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. 

मात्र समन्स बजावल्यानंतर अटक होऊ शकते का?

आपल्याला देखील चौकशीसाठी बोलवून पालांडे, शिंदे यांच्याप्रमाणे अटक करतील अशी भीती अनिल देशमुख यांना असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळेच ते प्रत्यक्ष चौकशीसाठी हजार राहणं टाळतं असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. पण खरंच केवळ समन्स बजावल्यानंतर अटक होऊ शकते का?

याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने जेष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला.  ते म्हणाले, 

आता अनिल देशमुख यांना नक्कीचं अटक केली जाऊ शकते. कारण २ गोष्टी आहेत. यात त्यांना पहिल्यांदाचं बोलावलं जात आहे असं अजिबात नाही. याआधी त्यांची २ ते ३ वेळा चौकशी झाली आहे. यात ईडी काही पुरावे मिळाले असण्याची शक्यता आहे. सोबतच छाप्यांमध्ये प्रथमदर्शनी काही पुरावे हाती लागले असल्यामुळेच त्यांनी न्यायालयात देखील दावा केला असावा.

आता जर अनिल देशमुख यांच्या चौकशी दरम्यान जर बेहिशेबी संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग, पैसा काळ्याचा पांढरा करण्याची प्रक्रिया, खोट्या कंपन्या या सगळ्या गोष्टी जर उघड होत असतील, म्हणजेच पुरावे आणि संशय खरा ठरत असेल तर ते देशमुख यांच्यावर नक्कीच त्वरित अटकेची कारवाई करू शकतात. 

अटक केल्यानंतरची प्रक्रिया काय असू शकते? याबाबत ऍड. सरोदे म्हणाले, 

अटक केल्यानंतर पुढच्या चौकशीमध्ये धागेदोरे हातात लागतात त्या लोकांच्या चौकशी करणं, कागदपत्र गोळा करणे, त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, इमेल इथून झालेलं कम्युनिकेशन चेक करणं, त्याबाबत चौकशी करणे, काही फेक कंपन्या काढल्या असतील तर त्याची बोर्डाकडून माहिती घेणं अशा सगळया बऱ्याच गोष्टी असतात.

मात्र थोडक्यात सांगायचं झालं तर याआधी देखील देशमुख यांची चौकशी झाल्याने त्यांना अटक करण्याची शक्यता बळावते असं ऍड. सरोदे सांगतात.

मागच्या महिन्यात ईडीने गुन्हा दाखल केला होता…

सीबीआयच्या तपासानंतर आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर मागच्या महिन्यात ११ मे रोजी ईडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी ईडीने सांगितले कि आम्ही सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.