दोन महिने गायब असलेले अनिल देशमुख अखेर ईडीच्या अटकेत, पीएंवर देखील झाली कारवाई

मध्यंतरी गायब असणारे अनिल देशमुख दोन दिवसांपूर्वी माध्यमांसमोर प्रकटले तर १ नोव्हेंबरला ईडीसमोर. त्यांच्या गायब होण्यामागचं कारण होत १०० कोटींच्या वसुली आदेश. अखेर आज या प्रकरणात त्यांना अटक झालीय.

ईडीसमोर हजर झाल्यावर त्यांची जवळपास १३ तास मॅरेथॉन चौकशी सुरू होती. त्यांच्यावर जे आरोप होते, त्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली. आणि मगच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. यापूर्वी देशमुखांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.

अटक झाली असली तरी घटनाक्रम काय होता ? 

तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार,

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचं युनिट हेड होते. मागच्या काही महिन्यात अनिल देशमुख जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं होत.

दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायचे आदेश दिले होते. देशमुख वाझेंना म्हणाले होते की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले, तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये जमा होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येऊ शकते.

देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे.

मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

त्यांनी हे पत्र फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुद्धा पाठवलं होत. 

त्या पत्रानंतर मोठी खळबळ माजली. सीबीआयने २१ एप्रिलला अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले होते.

त्यानंतर २५ एप्रिलला सकाळी-सकाळी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह ५ ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी प्रामुख्यानं १०० कोटी वसुली तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांनंतर या सगळ्या पैशाचं नेमकं झालं काय झालं? हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली का? या सगळ्याच्या तपासासाठी केली होती.

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना पहिलं समन्स बजावलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितला.

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना ताब्यात घेतलं. त्यांची जवळपास १० तास चौकशी केली, आणि त्यानंतर रात्री १२:३० वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली असल्याचं ईडीने सांगितलं.

याच वकिलांचा रिमांड मिळण्यासाठी न्यायालयात सुनावणी सुरु असताना ईडीने अनिल देशमुख यांचं देखील नाव घेतलं होतं. त्यादिवशी ईडीचे वकील सुनिल गोन्सालवीस यांनी याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार,

माजी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, कसे ते देखील ईडीने न्यायालयात सांगितले.

डिसेंबरमध्ये सचिन वाझेला ४० लाख रुपये गुडलक मनी देण्यात आले. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या झोन १ ते झोन ७ कडून १ कोटी ६४ लाख रुपये दिले गेले. सोबतचं बार, पब आणि ऑर्केस्ट्राद्वारे झोन ८ ते झोन १२ कडून २ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आले. हे सर्व पैसे सचिन वाझेने अनिल देशमुख यांना देण्यात येणार असं सांगितलं.

याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. हा सगळा पैसा देशमुख यांनी दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेकडे वळवला, पण हि कंपनी केवळ कागदावरच असून केवळ ट्रान्सफर एन्ट्री करण्याच्या कामासाठी वापरल्या जातात असा ईडीने आरोप केला आहे.

त्यानंतर देशमुख यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यासाठी  समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी पत्र पाठवून हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. 

या सगळ्या प्रकरणात अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

देशमुख चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते.  समन्स बजावून ही चौकशीला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे अनिल देशमुख अटकेच्या भीतीने प्रत्यक्ष उपस्थिती टाळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर तर ते गायबच झाले. आणि अखेर अचानक इतक्या महिन्यानंतर जगासमोर आले. आणि थेट ईडीच्या कार्यालयात गेले.

शेवटी अटक झालीच….

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.