लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब, ९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड…

दिवाळी म्हटलं कि एक विषय हमखास चर्चेत येतो. तो म्हणजे फटाके. दरवर्षी सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी येतात आणि फटाके उडवू नका म्हणून सांगतात. कट्टर विचारांची पब्लिक त्याना झाडून शिव्या घालते. दिवाळीत फटाके उडवायचे नाही म्हणजे बॅटबॉल शिवाय क्रिकेट खेळल्यासारखं झालं म्हणत फटाके उडवतात.

आपण लहानपणापासून आजवर ज्या दिवाळ्या साजऱ्या केल्या तितक्या दिवाळींमधे किती प्रकारचे फटाके वाजवले असतील. लवंगी फटाका, कोंबडा फटाका, मिरची बॉम्ब, सुतळी बॉम्ब पासून ते थेट 12 शॉट पर्यंत किंवा अजून त्याच्या पुढे कोणी गेला असेल.

पण आजवर आपण जितके फटाके वाजवले त्यात बहुतांशी फटाके हे अनिल क्रॅकर्स फॅक्टरी मधून आलेले असतात आणि अजूनही त्याच फॅक्टरीमधून भारतभर फटाके पोहचतात.

९० वर्षांपासून भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे शिवकाशीचा अनिल ग्रुप फटाका ब्रँड, लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब सर्वांना परवडतील असे, अव्वल फटाके ब्रँड्सपैकी एक म्हणजे अनिल फटाके ब्रँड. तर याच अनिल ग्रुप फटाका ब्रँडबद्दल माहिती करून घेऊया.

तामिळनाडूमधील मदुराई ते कन्याकुमारीकडे जाणाऱ्या मार्गावर फटाक्यांची दुनिया आहे. या दुनियेचं नाव शिवकाशी. इथे सततच्या सुरु असलेल्या औद्योगिक उपक्रमांमुळे याला भारतातलं मिनी जपान देखील म्हणलं जातं. येथे जवळपास 98% फटाके जुन्या फॉर्म्युल्यापासून बनवले जातात. इथल्या नोंदणीकृत फटाके उत्पादकांची संख्या १ हजार ७० च्या जवळपास आहे.

म्हणूनच फटाक्यांचे माहेरघर म्हणून शिवाकाशीला ओळखले जाते…

अनिल फटाके ब्रँड देखील शिवकाशीमधलाच आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अनिल फटाके ब्रँड कंपनीला ९० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. १९२३ साली अनिल फटाक्यांची फॅक्टरी ‘शिवकाशी’ ही मूळ कंपनीच्या स्थापन झाली. 

शिवकाशी फटाक्यांचं हब बनण्यामागे दोन भावांचं योगदान आहे. पी. अय्या. नाडर आणि त्यांचे बंधू षणमुगा नाडर. उपजिवेकेसाठी हे दोन्ही भाऊ पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये मॅच फॅक्टरीत कामाला गेले होते.

या फॅक्टरीत या भावांनी मॅच मेकिंगची कला शिकून घेतली, त्याच्या आठ महिन्यांनंतर ते आपल्या राज्यात परतले आणि इतिहास घडवला. त्यांनी अनिल ब्रँड आणि अयान ब्रँडच्या नावाने मॅच इंडस्ट्रीज स्थापन केली, त्यासाठी जर्मनीतून मशिनरी आयात केली आणि सुरुवातीला १०० मजुरांना हाताशी घेतलं. जस त्या काळी तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याप्रमाणे या दोघा भावांनी मजुरांना सेफ्टी मॅच बनवायला शिकवलं.

हळूहळू फटाके बनवण्याच्या कलाही त्यांनी शिकून घेतली आणि फटाक्यांची निर्मिती सुरु झाली. 

दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांच्या फटाक्यांच्या प्रॉडक्शनवर बंधनं लावली गेली. पण १९४० मध्ये भारतात स्फोटक नियम लागू करण्यात आले, त्याद्वारे फटाके उत्पादन आणि विक्रीसाठी परवाना देण्याची सिस्टीम सुरू करण्यात आली.

अशाप्रकारे शिवकाशी मध्ये १९४० मध्ये पहिल्या संघटित कारखान्याची स्थापना झाली.

१९२३ मध्ये जेंव्हा दोघं भावांनी निर्मिती सुरु केली तेंव्हा फक्त एक साधारण कारखाना होता…१९४२ मध्ये या कारखान्यांची संख्या तीनवर गेली आणि १९८० पर्यंत कारखान्यांची संख्या १८९ वर गेली होती. २००१ च्या अखेरीस एकट्या शिवकाशीमध्ये  फटाक्यांच्या एकूण कारखान्यांची संख्या ४५० होती आणि आज ती ६४० वर पोहोचली आहे. काळानुरूप मजुरांमध्ये स्त्रियांची संख्या वाढू लागली.

एक तर शिवकाशीमध्ये काळी चिकणमाती असली तरी, कोरडे हवामान आहे, पाऊसही कमी पडतो त्यामुळे इथे शेती कधीच यशस्वी झाली नाही म्हणून लोकं गाव सोडून शेजारील शहरात स्थलांतरित झालेले.  फटाक्यांच्या कारखान्यांमुळे इथे रोजगार वाढला.

रोजगाराच्या शोधात इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले बरेच लोक चांगला रोजगार मिळत असल्यामुळे शिवकाशीला परत येऊ लागले. अनिल फटका ब्रँड मार्केटमध्ये तग धरेल की नाही याचीही शाश्वती सुरुवातीला नव्हती पण गेल्या 90 वर्षांपासूनही जास्त काळ उलटून गेला पण अनिल ग्रुप थेट शिवकाशीहून दर दिवाळीला भारतभर फटाके मोठया प्रमाणात विक्री करतो तेही विशेष सवलतीच्या दरात.

आता आपण काय फक्त दिवाळीलाच फटाके वाजवत नाही तर लग्नात फटाके वाजवले जातात, निवडणूक जिंकली की फटाके लागतात, तुळशीच्या लग्नाला फटाके वाजवले जातात, थोडक्यात फक्त दिवाळीच्या दिवसातच नाही तर वर्षभरात चांगल्या प्रसंगी आपण फटाके फोडतो. लक्ष्मी बॉम्ब पासून ते मीटर पर्यंतच्या लडी लावण्यापर्यंत आपली मजल जाते.

अनिल फायर क्रॅकर्स लोकांची ही गरज उत्तम प्रकारे भागवली. 90 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीने फॅन्सी फटाक्यांना मानाचं आणि आघाडीचं स्थान दिलं. कंपनीच्या गेल्या महत्वाच्या 50 वर्षात फटाक्यांच्या प्रोडक्शन वर जास्त भर देत मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग मिळवला…आणि हा ग्राहकवर्ग वर्षभर फटाके विकत घेत असतो. 

सिंगल साउंड क्रॅकर्स, स्पार्कलर्स, चक्कर, फुलदाण्या, चमकणारा तारा, पेन्सिल, गिफ्ट बॉक्स, फॅन्सी आयटम – ग्राउंड/स्काय फंक्शन त्यातही 10-16 शॉट्स, फॅन्सी मल्टी इफेक्ट शॉट्स – त्यातले 6/7 शॉट्स, फ्लॉवर पॉट फटाके, फ्लॉवर पॉट क्रॅकर्स अशा अनेक प्रकारच्या फटाक्यांची विक्री अनिल ग्रुप भारतभर करत असतो. यातले बरेच फटाके आपण वाजवलेही आहेत.

अनिल क्रॅकर्स ग्रुपचे मेम्बर सांगतात की आमच्या कंपनीच्या फटक्यांची क्वालिटी आणि नवींनवीन प्रकारचे फटाके आणण्याचं वैशीष्ठय हे बाजारपेठेतील आमच्या प्रतिष्ठेचे मुख्य कारण आहे. प्रीमियम क्वालिटी देण्यासाठी आम्ही फटाके बनवण्याच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावर स्क्ट्रिक्टली क्वालिटी कंट्रोल रेग्युलेशन्स फॉलो करतो.

भारतीय स्फोटक कायद्याने दिलेल्या नियमांनुसार पायरोटेक्निक अॅल्युमिनियम पावडर आणि ब्लॅक पावडरच्या मिश्रणाने उत्पादने तयार केली जातात. रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे अनिल कंपनीच्या कार्यप्रणालीचा अविभाज्य भाग आहे म्हणूनच बाजारपेठेत या कंपनीची मोठी प्रतिष्ठा आहे.

अनिल ग्रुप ऑफ कंपनी असा दावा करते कि, फटाक्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी चीन, तैवान आणि जर्मनीच्या तज्ञांकडून सूचना आणि सल्ले घेतले जातात.

औद्योगिक क्षेत्रात पाय रोवून उभा असलेल्या अनिल ग्रुपचा अनिल समूहाचा सध्याच्या काळात इतका मोठा विस्तार झाला आहे कि २५ इंडस्ट्रियल युनिट्समध्ये अनिल ग्रुप ऑफ कंपनी इतरही ग्रुप चालवते त्याद्वारे पोटॅशियम क्लोरेट, कॉपर कोटेड वायर्स, कृषी उत्पादने, वनौषधींचे उत्पादन घेत असते. सुरुवातीला अगदी १०० कामगारांपासून सुरु झालेल्या कंपनीच्या सर्व युनिट्समध्ये आज एकूण ५०० कामगार काम करतात.

अशाप्रकारे ९० वर्षांपासून भारतात घुमणारा आवाज म्हणजे हा अनिल ग्रुप फटाका ब्रँड.

यंदाच्या दिवाळीत तुमची इच्छा असेल तर नक्कीच फटाके उडवा पण  प्रदूषणाची, आजूबाजुला असणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची काळजी घेऊन फटाक्यांचा आनंद घ्या…

 हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.