४ हजार २२० वेळेस अटक झालेला पक्षाचा कार्यकर्ता आता राज्यसभेचा खासदार बनणार आहे

कोण म्हणतं कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यासाठीच असतात ?

असे कितीतरी कार्यकर्ते आहेत जे तळमळीने पक्षासाठी काम करतात आणि त्याचं फळही त्यांना कधीना कधी मिळतंच मिळतं..याचं उदाहरण म्हणजे जनता दलाचे कार्यकर्ते अनिल हेगडे !

जेडीयूचे खासदार महेंद्र प्रसाद म्हणजेच राजा महेंद्र यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. अनिल हेगडे यांच्यावर विश्वास दाखवत जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन यांनी अधिकृत घोषणा केली आहे की, राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत अनिल हेगडे हे उमेदवार असतील. बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी ३० मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अनिल हेगडे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं…पण तुम्हाला अनिल हेगडे विषयीच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्कीच सांगाव्यात म्हणून हा प्रयत्न…

अनिल हेगडे हे काय आजकालचे कार्यकर्ते नसून ते गेल्या ३८ वर्षांपासून पक्षासाठी २४ तास काम करत आले आहेत. 

अनिल हेगडे म्हणजे समाजवादी विचारसरणीचे फकीर नेते… आजच्या काळात पक्ष पैशाच्या जोरावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांना राज्यसभेवर पाठवतात, पण अनिल हेगडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जेडीयूने घेतला…का ? त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच..

अनिल हेगडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन जेडीयूने हे सिद्ध केले आहे की पक्षासाठी काम करणाऱ्यांना एक दिवस का होईना मोठी संधी मिळणार… जाहीर झालेल्या उमदेवारी नंतर अनिल हेगडे यांनी माध्यमांना बोलतांना अशी प्रतिक्रिया दिली की,

“कार्यकर्त्याला संधी मिळाली याचा आनंद आहे. सन्मान मिळाला आहे, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आत्तापर्यंत पक्षाला  कोणतेही पद मागितले नाही…. हे बनवा, ते बनवा असंही कद्धी म्हणालो नाही. पण मला मिळालेल्या सन्मानामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.”

कोण आहेत अनिल हेगडे ? त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

  • अनिल हेगडे हे मूळ कर्नाटकातील मंगळूरचे रहिवासी असून ते एका शेतकरी कुटुंबातील आहेत.  ३८ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते पाटणा येथे वास्तव्यास असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करत आहेत. 

अनिल हेगडे हे गेली ६ वर्षांपासून पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आहेत.

  • अनिल हेगडे हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि नितीश कुमार यांच्यात संघटनात्मक बाबींवरून मतभेद होते तेव्हा अनिल हेगडे मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.
  • अनिल हेगडे अतिशय विनम्र आणि संघटनात्मक व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
  • गेल्या १२ वर्षांपासून ते पक्षाच्याच कार्यालयात राहतात, तिथेच झोपतात तिथेच खातात.
  • ते अविवाहित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी पक्षाच्या कार्यासाठी वाहून घेतले आहे.

१९८३-८४ च्या काळापासून ते राजकारणात आहेत.. आधी जनता पक्ष, नंतर जनता दल आणि समता पार्टी नंतर जेडीयू. अनिल हेगडे यांनी रामकृष्ण हेगडे यांच्यासोबत जनता पक्षात काम केले. पुढे ते जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रशेखर यांच्याही जवळ होते. 

तेंव्हा पक्षाचे नाव जनता पक्ष होते. त्यानंतर २०१२ च्या काळात तोच पक्ष जनता दल झाला.  त्याच जनता दलातून अनिल हेगडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत विभक्त होऊन समता पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष पुढे जनता दल युनायटेड झाला.

हेगडे यांच्यावर सुरुवातीला माजी पंतप्रधान चंद्रशेखर जी आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रभाव होता.. त्या दिवसांत हे नेते पार्टीचे प्रशिक्षण कॅम्पस आयोजित करत असत. ज्या कॅम्पस मध्ये मधु दंडवते, रवी राय, सुरेंद्र मोहन, किशन पटनायक असे नेते येत असत.

आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनिल हेगडे यांना आजवर ४,२२० वेळेस तुरुंगवास झालेला आहे..

डंकेलच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास विरोध केल्याने डंकेल चर्चेत आले होते…

अनिल हेगडे यांची गणना समाजवादी विचारसरणीला पूर्णपणे वाहून घेतलेल्या नेत्यांमध्ये केली जाते. डंकन प्रस्ताव असो की कांडला बंदरातील संप, या सगळ्यात अनिल हेगडे यांचा अग्रणी सहभाग होता.

आर्थिक उदारीकरणाचे कट्टर विरोधक म्हणून अनिल हेगडे यांचं नाव येतंच येतं. 

डंकेलच्या ठरावावर स्वाक्षरी रोखण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. डंकेल ठरावाच्या विरोधात त्यांनी ५,१५० दिवस सतत प्रचार केला. या १४ वर्षांच्या काळात त्यांना या आंदोलनामुळे दिल्लीच्या संसद मार्ग पोलिस ठाण्यात त्यांना दररोज अटक होत असे. संसद भवन पोलीस ठाण्यात त्यांना ४,२५० वेळेस अटक करण्यात आली होती. 

त्यातली काही दिवस त्यांनी तिहार तुरुंगात देखील काढले आहेत. हे आंदोलन सुरू झाल्याच्या आठव्या दिवशी दिल्लीतील पत्रकारांनाही अटक करण्यात आली होती आणि ही घटना तेंव्हा बरीच गाजली होती.

१९९४ ते २००८ या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्यासाठी अनिल हेगडे खास होते. अनिल हेगडे सांगतात की या आंदोलनाची जबाबदारी जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना दिली होती. पक्षाचे प्रस्ताव तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असायची. 

जेव्हा जेव्हा राजकीय आंदोलनात राजकीय अटकेची चर्चा होते तेव्हा लोक अनिल हेगडे यांचे नाव नक्कीच घेतलं जातं.

या आंदोलनाच्या काही दिवसातच नितीश कुमार यांनी १९९४ मध्ये अनिल हेगडे यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. नितीश कुमारांमुळे जॉर्ज फर्नांडिस वेगळे झाले. पक्षाकडून समता पक्षाची स्थापना केली.

असो तर आता त्यांना पक्षाने राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाने १२ मे रोजी जारी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ मे आहे. ३० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही केली जाणार आहे.

जेडीयू नेते आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल हेगडे यांनी पक्षाची सत्ता असतानाही कधीही कोणत्याही पदाची मागणी केली नव्हती. पण तरी पक्षाने त्यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊन पक्षाने त्यांना निवडणूक अधिकाऱ्यासोबतच इतरही अनेक महत्त्वाची पदे दिली आहेत. आता राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी हे त्यांच्या पक्षासाठीच्या योगदानाचं फलित म्हणलं तर वावगं ठरू नये…

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.