फक्त ४ हजारांच्या चेकचा घोळ आणि बिचारा अनिल कपूरचा अन्नू कपूर झाला.

टिपिकल कॉलेज आणि तिथे टपोरीगिरी करायला जाणारी तुमच्या आमच्या सारखी पोरं. यात एक जॉनी लिव्हर एक विजय पाटकर एक चंकी पांडे आणि एक अनिल कपूर. रोज वही उडवत जाणे, माधुरी दीक्षित मंदाकिनी यांच्यावर लाईन मारणे हि त्यांची कामे.

अशातच कॉलेजच्या कट्यावर त्यांचं नेहमीच गिऱ्हाईक म्हणजे चहाच्या टपरीवर कामाला असणारा गुलदस्ता. चहा मागितल्यावर तूमणे पुकारा और हम चले आये गात नाचत कप आणून देणारा हा मस्त मौला (भोळसट माणूस) त्याच्या गाण्याचं कौतुक करून त्याच्याकडून चहा नाश्ता उकळणारी आपली अनिल कपूर गॅंग. पूर्ण पिक्चरमध्ये ते त्याच्या भोळेपणाचा मज्जा उडवत असतात.

पिक्चर लक्षातच आला असेल. “तेजाब “

तेजाब त्याकाळी प्रचंड गाजला. आपल्या माधुरीच्या एक दो तीनने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला. ती थेट सुपरस्टार झाली. अनिल कपूरचा अँग्री यंग मुन्ना देशमुख, चंकीचा सो गया ये जहाँ गाणारा सच्चा दोस्त बबन, किरण कुमार चा खुंखार लोट्या पठाण, माधुरीचा दारुडा बाप अनुपम खेर , जॉनी-विजय पाटकरची कॉमेडी सगळंच भारी होतं.

मात्र या सगळ्यांच्या गर्दीत अनिल कपूरच्या भोळ्या मित्राचा रोल करणारा गुलदस्ता देखील अनेकांच्या लक्षत राहिला. तो रोल केला होता अनिल कपूरने. कन्फ्युजन झालं ना? हिरो अनिल कपूर नाही तर आपला सारेगमा वाला अन्नू कपूर. त्याच पण खरं नाव अनिल कपूरच.

अन्नू कपूर मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळ मधील इटवाराचा. त्याची आई कमल बंगाली तर वडिल मदनलाल हे पंजाबी होते. त्यांच्या वडिलांची शहर आणि गावात काम करणारी एक पारशी नाट्य कंपनी होती. त्यांची आई कवी आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. अन्नू कपूरचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते तर त्यांचे पंजोबा लाला गंगा राम कपूर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेलेले क्रांतिकारक होते.

कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अन्नूला माध्यमिक शिक्षणानंतर  शाळा सोडावी लागली.

वडिलांच्या आग्रहाने अन्नू  त्यांच्या नाटक कंपनीत रुजू झाला. थोड्याच दिवसात तिथे त्याचा चांगलाच जम बसला. अन्नूचा एक भाऊ रणजित हा दिल्लीमध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे(एनएसडी)मध्ये नाटक शिकत होता. त्याच्या सांगण्यावरून आणून देखील एनएसडीची परीक्षा दिली, पस देखील झाला.

भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जात असणाऱ्या या संस्थेत अन्नूच्या अभिनयावर खरे पैलू पडले. १९८१ साली तो एनएसडी मधून पास झाला. त्यानंतर तो मुंबईला आला. इथे देखील पृथ्वी थिएटर व अशा संस्थांमधून त्याने नाटकात कामे करण्यास सुरवात केली.

मुंबईमध्येच एकदा एक रुका हुआ फैसला  नावाच्या नाटकात त्याने ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी हे नाटक पाहिले. अन्नूची त्यातली भूमिका त्यांना प्रचंड आवडली. त्याला त्यांनी कौतुकाचे पत्र पाठवले आणि १९८३च्या मंडी या चित्रपटासाठी साइन देखील  केले.

तिथून अन्नू कपूरची नवी इनिंग सुरु झाली. 

पण या अन्नुच नाव अन्नू कस झालं हे माहित आहे का?

खरं तर सुरवातीच्या सिनेमांमध्ये तो अनिल कपूरचं होता. त्याला तिसरा सिनेमा मिळाला तो म्हणजे ‘मशाल’. यश चोप्रा यांच्या दिगदर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमात दिलीप कुमार असणार होते. त्यांच्या समोर हिरो म्हणून एक नवखा तरुण होता. तो म्हणजे प्रोड्युसर बोनी कपूरचा लहान भाऊ अनिल \. खरे तर या रोल साठी आधी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आलं होतं पण काही कारणांनी नकार दिला आणि अनिल कपूरला हा मोठा रोल मिळाला.

अन्नू कपूरचा यात एक छोटासा रोल होता. यात त्यांना फक्त चारच ओळींचा डायलॉग होता आणि त्याबदल्यात चार हजार रुपये मिळणार होते. शूटिंग संपलं आणि अन्नू कपूर ला मिळाले दहा हजार रुपये. त्याला वाटलं कि यश चोप्रा मोठे दिलदार प्रोड्युसर आहेत, आपलं काम आवडलं म्हणून त्यांनी थेट चारच्या ऐवजी दहा हजार रुपये दिले.

पण तिकडे मोठा घोळ झाला होता. अन्नू कपूरचा नावाचा चेक चुकून हिरो अनिल कपूरला गेला होता.

नावाच्या घोळामुळे चेकची अदलाबदल झाली होती. अनिल कपूरचा मोठा भाऊ बोनी कपूर तर भांडण काढण्यासाठी यशराज स्टुडिओमध्ये पोहचला होता. त्याने यश चोप्रानां तो चेक दाखवला आणि त्यांनी आपल्या अकाउंटंटला धारे वर धरलं. त्यानंतर शोध घेतल्यावर सगळा गोंधळ लक्षात आला.

अखेर यशराज वाल्यानी एनएसडी वाल्या अनिल कपूर ला नाव बदलून घ्यायची विनंती केली. त्या दिवसानंतर तो अन्नू कपूर झाला. काहीजण तर सांगतात की तेजाब मध्ये रॅगिंग घेतली तशी अनिल कपूरने रॅगिंग घेतली आणि बिचाऱ्याला नाव बदलायला लावलं. 

तेव्हा एक साईड कलाकार असलेला अन्नू कोणाला काही बोलू देखील शकला नाही. पुढे  उत्सव नावाचा सिनेमा आला आणि त्यासाठी अन्नूला  फिल्मफेअर पुरस्काराच्या कॉमेडी ऍक्टरच्या श्रेणीत नॉमिनेशनदेखील मिळालं.  १९८६ मध्ये बासु चटर्जी यांनी एक रुका हुआ फैसला या नाटकाचे सिनेमात रूपांतर केले आणि या सिनेमातही अन्नू त्या सत्तर माणसाच्या भूमिकेत दिसला. अन्नूचे कौतुक झाले.

पण खरं नाव त्याला तेजाबच्या गुलदस्त्यामुळे मिळालं.

मिस्टर इंडिया, चालबाज, घायल या सुपरहिट सिनेमात तर तो चमकत होताच पण नव्वदच्या दशकात आलेल्या अंताक्षरी या रियालिटी शोने अन्नूची आणि भारतीय टीव्हीची लाईफ बदलून गेली, ग्लॅमर मिळालं. अभिनयात तो भारी होताच पण चरित्र रोलपेक्षाही कॉमेडी सेन्स ऑफ ह्युमर, प्रचंड तोंडपाठ असलेली फिल्मी गाणी, सिनेमाचे मुखोदगत असणारे असंख्य किस्से यासाठी तो ओळखला जातोय.

कधी वादात सापडला तर कधी विकी डोनर सारख्या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. आज त्याने पैसा शोहरत सगळं मिळवलं पण स्वतःच जुनं नाव तो परत मिळवू शकला नाही. अजूनही तो अन्नूच राहिलाय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.