दोन दिवसांपासून भाजप म्हणतं होते पुढची विकेट अनिल परबांची घेणार….

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केले. याचा तपास करण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला आदेश दिले. यानंतर अनिल देशमुखांनी ५ एप्रिल रोजी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. इथं पहिल्या लेटरबॉम्बचा चॅप्टर राजकीय दृष्ट्या क्लोज झाला.

मात्र त्या दिवसानंतरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेत्यांनी पुढच्या आठचं दिवसांमध्ये सरकारमधील आणखी एक विकेट घेणार असल्याचं सांगितलं. तर किरीट सोमय्या यांनी थेट नाव घेऊन पुढची विकेट परिवहन मंत्री अनिल परब यांची असल्याचं सांगितलं. अर्थात हा राजीनामा का घेणार, कोणत्या मुद्द्यावर घेणार याच कोणतंही उत्तर या विधानांमध्ये दिलं नव्हतं.

यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तर अवघ्या दोनचं दिवसांमध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दुसऱ्या लेटर बॉम्बमधून दिली आहेत.

नक्की काय आहे प्रकरण? 

सचिन वाझेंची सध्या एनआयएकडून चौकशी सुरू आहे. यावेळी त्यांनी एनआयएला स्वतःच्या हस्ताक्षरांमध्ये एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाझेंनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे,

२०२० मध्ये मला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं.

sachin 1

मात्र हा विरोध खोडून पुन्हा निलंबन टाळायचं असेल तर देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये देशमुख यांनी मला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावलं होतं. त्यावेळी शहरातील १ हजार ६५० रेस्टोरंट आणि बारकडून वसूली करण्यास सांगितलं होतं. मात्र ही वसुली आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगितलं असा दावा सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे.

पुढे वाझे यांनी दावा केला आहे की, आपण याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यावर त्यांनी या सर्व बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.

यानंतर वाझे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. 

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे. सुरूवातीला त्यांनी SBUT प्रकरणांच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं.

त्याचबरोबर ही चौकशी जर थांबवायची असेल तर SBUT च्या ट्रस्टींकडून ५० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते.

sachin 2

मात्र हे काम करण्यास आपण पुन्हा असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUT बद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपल कोणतंही नियंत्रण नव्हतं, असं देखील वाझे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

यानंतर वाझे यांनी अनिल परब यांच्यावर दुसरा आरोप केला आहे की, 

जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा एकदा शासकीय बंगल्यावर बोलावलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या यादीतील काही काँट्रॅक्टर्सची चौकशी करण्यास सांगितलं.

अशा ५० काँट्रॅक्टर्सकडून त्यांनी २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं.

 

sachin 3

त्याप्रमाणे अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. मात्र काँट्रॅक्टर्स विरोधातील तक्रारींचं क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही.

या सगळ्या आरोपांवर अनिल परब काय म्हणाले ? 

सचिन वाझे यांचं पत्र सोशल मीडियामधून व्हायरल झाल्यानंतर अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हे सगळे आरोप नाकारले आहेत.

हे आरोप नाकारताना ते म्हणाले,

मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कोणतेही संस्कार नाही. बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो. म्हणूनच मी बाळासाहेबांची आणि माझ्या माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे.

मला केवळ आणि केवळ बदनाम करण्यासाठी हे सर्व आरोप करण्यात आले आहेत.

भाजपचे नेते दोन ते तीन दिवसांपासून आणखी एक विकेट घेऊ म्हणत होते. म्हणजेच हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. महापालिकेच्या कोणत्याही काँट्रॅक्टरसोबत माझी कसलीही ओळख नाही.

त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. सीबीआय, एनआयए, अगदी मी नार्कोटिक्ससाठी देखील तयार आहे. मात्र ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे माहित आहे. असं म्हणत परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

त्यानंतर भाजपनं आता अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत राजीनामा मागितला आहे.

तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील अनिल परब यांच्यावर त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर संशय व्यक्त केला आहे.

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांपासून सुरु झालेला हा घटनाक्रम आता या प्रकाणानंतर पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.