परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल खोटं चित्र निर्माण करण्यात आलंय..

मागच्या महिनाभरापासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केलं आहे. दरम्यान कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम आहे तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ आहेत. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या युद्धात उतरले होते. तळहातावर शीर घेऊन रणात उतरलेले हे उपाशी जीव मरणाच्या तयारीनेच पुढे सरसावल्याचा प्रत्यय आला.

पण आज जे एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे त्या एसटी कर्मचाऱ्यांना ८ ते १० हजार पगार मिळत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण खरंच असं आहे का ?

तर यावर महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनीच माहिती दिली आहे. ते म्हणतात की,

एसटीचे चालक आणि वाहक हे दोन प्रमुख घटक असतात. यात जे नव्याने कामाला लागले आहेत म्हणजे ज्यांचा कार्यकाळ १० ते १२ वर्षापर्यंत आहे अशा चालकांचे पगार कमी आहेत. त्यांचे पगार १८ हजार होते. यामधील बेसिक १२ हजार आणि इतर भत्ते होते. पण कर्जाचे हफ्ते, सोसायटीचे हफ्ते कापून १० ते १२ हजार हातात येतात.

जसा १८ हजार पगार घेणारा कर्मचारी आहे तसा ५० हजार घेणाराही आहे. पण लोकांसमोर जे काही चित्र आलं ते एसटी कर्मचाऱ्यांना ५, ६ हजार पगार मिळतो असं दाखवण्यात आलं.

एसटीत दोन गटांमध्ये पगार आहेत. ज्यांचे पगार कमी आहेत त्यांच्या मूळ पगारात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं अनिल परब म्हणाले. पगारवाढ फसवी असल्याचा अनेकांचा आरोप आहे यावर अनिल परब यांनी आकडेवारी सादर केली.

चालक ज्याला १० वर्ष पूर्ण झालीत किंवा जो पहिल्या दिवशी कामाला लागला त्याचा पगार १७ हजार ३९५ रुपये होता. या कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्याच्या डीए, एचआरएमध्येही वाढ झाली आणि पगार २४ हजार ५९५ रुपये झाला. हे आकडे रेकॉर्डवर असून फसवे नाहीत. म्हणजे ७२०० रुपयांची वाढ झाली असून ही वाढ ४१ टक्के आहे. एसटीच्या पूर्ण इतिहासात अशी वाढ झाली नव्हती. असं अनिल परब म्हणतायत.

ज्यांची १० वर्ष पूर्ण झाली त्यांना २३ हजार रुपये पगार आहे त्यांच्या बेसिकमध्ये ४ हजार मध्ये वाढवण्यात आले आहेत. आज त्यांचा पगार २८ हजार ८०० झाला आहे. त्याच्या पगारात एकूण वाढ ५७६० रुपये झाली आहे. २० वर्ष पूर्ण झालेल्यांचा पगार ३७ हजार ४४० असून त्यांच्यात अडीच हजारांची वाढ केली असून एकूण ३६०० रुपयांची वाढ झाली आहे. ३० वर्ष पूर्ण झाली त्यांचा पगार ५३ हजार २८० रुपये असून त्यात ३६०० रुपयांची वाढ करण्यात आली आणि एकूण पगार ५६ हजार ८८० झाला आहे.

गेल्या दोन वर्षात पगार वेळेवर झाले नाहीत. यावर अनिल परब म्हंटले, हे आम्हाला मान्य आहे. कर्मचाऱ्यांनी काम न करताही आम्ही २७०० कोटी रुपये एसटीच्या पगारापोटी दिले आहेत.

विलीनीकरणाचा निर्णय घेणं शक्य नाही असं आम्ही सांगितलं होतं. सरकार काहीच करत नाही, बसून आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सरकारने विलीनीकरणाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण दोन पावलं पुढं जावं आणि यांच्या पगारात वाढ करावी असं ठरवलं. एचआरए, डीए, पगारवाढ राज्य शासनाप्रमाणे देतो. प्रश्न फक्त बेसिकचा होता आणि म्हणून मग त्यात वाढ करण्याचं ठरलं.

आता ह्या सगळ्या गोष्टी बघता संप कधी मागे घेतला जाईल याचा सध्यातरी कोणताच अंदाज बांधता येणं अशक्य आहे. 

 

 

English Summary: Anil Parab slams oppositions on BEST employee’s salary. opposition leaders are creating a fake scenario of BEST employee’s salary.

 

Leave A Reply

Your email address will not be published.