त्या दोन घटना ज्यामुळे अण्णा हजारेंनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

किसन बाबुराव हजारे उर्फ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९४० साली अहमदनगरमधील भिंगार या गावी झाला. अण्णांचे आजोबा लष्करात होते. त्यांची नियुक्ती भिंगार या गावी झाली होती.

अण्णांचे वडील भिंगार येथे आयुर्वेदिक आश्रम फार्मसी मध्ये नोकरीला होते.

आजोबांच्या मृत्यूनंतर काही काळाने अण्णांचे वडील आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या मूळगावी राळेगणसिद्दीला परत आले.

अण्णांना एकूण सहा भावंडे. एवढा मोठा संसार, त्याचा खर्च अण्णांच्या वडिलांना झेपत नव्हता. अखेर त्यांनी आपली निम्मी जमीन विकली व निम्मी गहाण टाकली. रोजंदारीवर काम करून सगळ्या मुलांना शिकवण्याचा खर्च भागत नव्हता.

याच साठी छोट्या किसन ला म्हणजेच अण्णांना मुंबईला त्यांच्या आत्या कडे शिक्षणासाठी पाठवन्यात आलं.

पण घरची बेताची परिस्थिती लक्षात घेऊन अण्णांनी सातवी नंतर शाळा सोडून दिली आणि दादरमध्ये फुलविक्रीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात कष्टाने पैसे साठवून दादर रेल्वे स्टेशन च्या बाहेर स्वतःच दुकान सुरू केलं.

अण्णांच्या या दुकानामुळे गावाकडच्या घरी ओढाताण कमी झाली.

उपजतच हुशार असल्या मुळे त्यांचा धंदा अतिशय चांगला सुरू होता. पण तरुण वय होतं. अंगात अफाट रग होती, त्यामुळे स्वभाव चिडका बनला होता. वाईट मित्रांची संगत लाभली होती यातून वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होत होता.

यातून अण्णांची भांडणे मारामाऱ्या कायमचा प्रकार सुरू झाला.

मोठे जमीनदार सावकार गरिबांवर अन्याय करतात हे त्यांना सहन व्हायच नाही. असच एकदा अण्णांनी एका व्यक्तीला जोरदार मारहाण केली, अटक होण्याच्या भीतीने घरी पण गेले नाहीत, कुठेतरी जाऊन लपून बसले.

अण्णांची ओळख एक रागीट मुलगा अशीच होती.

अखेर अण्णांनी आपल्या आजोबांप्रमाणे लष्करात जायचं ठरवलं. एप्रिल १९६० मध्ये भरतीसाठी मुलाखत दिली ज्यात त्यांची सहज निवड झाली.

त्यांच लष्करातील सुरवातीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे झालं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांची नेमणूक पंजाबमध्ये आर्मी ट्रक ड्रायव्हर म्हणून झाली.

घरापासून दूर राहण्याची सवय नव्हती. मित्रांपासून कुटुंबापासून तुटल्यामुळे एकटे वाटत होते,

खिन्नतेतून आत्महत्येचा विचार मनात डोकवायचा.

याच नैराश्यातुन अण्णांनी आत्महत्येची सगळी तयारी केली, शेवटची चिठ्ठी देखील लिहिली. पण ऐनवेळी आत्महत्या करण्याचं त्यांचं धाडस झालं नाही. आपल्या अशा वागण्यामुळे बहिणीची लग्ने होणार नाहीत हे विचार त्यांच्या मनात डोकावला.

अखेर बहिणीचं लग्न होई पर्यंत आत्महत्या करायची नाही अस त्यांनी ठरवलं.

मधल्या काळात घडलेल्या काही घटनांनी अण्णा हजारेंच आयुष्य कायमच बदलून टाकलं.

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी त्यांची नेमणूक खेमकरण बॉर्डरवर झाली होती.

एकदा ते लष्कराचा ट्रक चालवत होते आणि पाकिस्तानी विमानाने हल्ला चढवला. हे विमान अगदी खालून जात असल्यामुळे अण्णांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक मधून बाहेर उड्या टाकल्या व जवळच्या झाडाखाली आश्रय घेतला.

या हल्ल्यात अण्णांच्या ट्रकचा विस्फोट झाला. पण ते आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांचे सगळे सहकारी मात्र मारले गेले.

अशीच एक घटना काही वर्षांनी घडली.

तेव्हा त्यांची नियुक्ती नागालँडमध्ये झाली होती. एकदा एका रात्री त्यांच्या लष्करी ठाण्यावर अलगाववादी नागानी हल्ला केला.

यासुद्धा हल्ल्यात जवळपास सगळे सैनिक मेले पण योगायोगाने अण्णा हजारे नैसर्गिकविधीसाठी बाहेर गेले असल्यामुळे बचावले.

या दोन घटनांनी त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम केला.

आपले आयुष्य मौल्यवान आहे आणि देवाने काही खास कारणांसाठी आपलं जीवन वाचवलं आहे अस त्यांना वाटू लागलं.

त्यांनी आत्महत्येचे विचार बाजूला केले.

अशातच एकदा दिल्ली रेल्वे स्टेशनवर त्यांना विवेकानंद यांचे देशबांधणीसाठी युवकांना आवाहन हे पुस्तक मिळाले. हे पुस्तक अण्णांच्या तरुण मनावर खोलवर परिणाम करून गेले.

त्यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांनी पुस्तके वाचण्याचा धडाका लावला.

या पुस्तकांमुळे आपल्या जीवनाला एक अर्थ असल्याचं त्यांना उमगलं

आणि या पुढील सगळं आयुष्य देशासाठी समर्पित करायचा निर्णय त्यांनी घेतला. आपण कधीच लग्न करणार नसल्याचा ठाम निर्णय त्यांनी घरच्यांना कळवून टाकला.

१९७४ साली अण्णांची बदली जम्मूला झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या लष्करी सेवेची १५ वर्षे पूर्ण होत होती व पेन्शनही लागू होत होते.

आपला देश सुधारण्यासाठी आधी आपलं गाव सुधारलं पाहिजे हा विचार खूप दिवसांपासून त्यांच्या मनात होता.

सुट्टीच्या काळी गावी गेल्यावर तिथली परिस्थिती त्यांना अस्वस्थ करून सोडत होती.

अखेर ऑगस्ट १९७५ साली अण्णांनी लष्करातून स्वेच्छा निवृत्ती घेतली व राळेगण सिद्दीला आले. घरदार सोडलं आणि यादवबाबा मंदिरात राहून समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं.

संदर्भ- “अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा” प्रदीप ठाकूर, पूजा राणा

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.