आणि अण्णा राष्ट्रपती होता होता राहिले..

साधारण २०११-१२ चा काळ. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार सत्तेत होतं. डॉ.मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून दुसरी टर्म होती. या वेळी त्यांचे पाय ओढायला डावे पक्ष देखील नव्हते. चांगलं बहुमत पाठीशी होतं पण तरीही काँग्रेस आघाडी अडचणीत आली होती.

कारण ठरले होते,  जेष्ठ समाजसेवक किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे.

त्याकाळात मनमोहन सिंग यांच्या सरकारचे एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर पडत होते. अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्यापासून सुरवात झाली, मग टूजी स्पेक्ट्रम,  कोल गेट असे एका मागोमाग बॉम्ब फुटू लागले. प्रत्येक घोटाळ्यांचा आकडा आभाळाला भिडणारा होता. कोळसा घोटाळ्यात तर दोन लाख करोड रुपये खाल्ले गेले आहेत असं बोललं गेलं.

मग संकटमोचक म्हणून धावून आले भारताचे दुसरे गांधी म्हणजेच अण्णा हजारे.   

आपलं उपोषणाचं हत्यार काढून अण्णांनी देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा केली होती. सगळी जनता भारावून रस्त्यावर उतरली. केजरीवालांनी मै भी अण्णाच्या टोप्या सगळ्या  घातली. नेतेमंडळी स्विस बँकेत काळा पैसा दडवून बसले आहेत आणि  भारतात परत आले तर महागाई कमी होईल प्रत्येकाच्या आयुष्यच लखलाभ होईल असच सगळ्यांना वाटू लागलं होतं. याला अण्णांनी उपाय म्हणून लोकपाल बिल मंजूर करा अशी सूचना दिली होती.

अण्णा हजारे या स्वातंत्र्यलढ्याचे हिरो होते. त्यांना लोक दुसरा राष्ट्रपिता म्हणू लागले होते. सरकारला या लोकपाल बिलाचं काय करायचं कळेना झालं होतं. अण्णांचं उपोषण तापलं कि काँग्रेसच्या नेत्यांचा बीपी हाय व्हायचा. 

कसबसं अण्णांची समजूत काढून काँग्रेसने लोकपाल बिल पास केलं , स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याकडे गेलं तर टीम अण्णाने त्यात खोट काढली कि हे बिल म्हणजे निव्व्ल तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे आहे. यात लोकपालाला घटनात्मक दर्जा दिला नाही. ते म्हणजे दात काढलेल्या सापाप्रमाणे आहे.

अण्णा मंडळी चिडली. आता पुन्हा आंदोलन वगैरे सुरु होणार याची काँग्रेसला शक्यता दिसू लागली. अशातच दोनच वर्षात पुढच्या लोकसभा निवडणूक येणार होत्या. काँग्रेसला आपला युवराज राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं होतं. यासाठी काहीही करून अण्णांना आणि त्यांच्या आंदोलनाला काबूत आणणे गरजेचे वाटत होते.

अशातच कोणाच्या तरी डोक्यातून सुपीक कल्पना निघाली कि अण्णांना राष्ट्रपती बनवायचं.

अण्णा म्हणजे फकीर माणूस. राळेगण सिद्धीच्या देवळात झोपणारा, लग्न न करता आपलं आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलेला, उपोषण करून भ्रष्ट नेत्यांना कच्चा खाणारा नेता देशाच्या सर्वोच्च पदावर गेला तर कोणाला नाही म्हणायची हिंमत होती? अण्णांना राष्ट्रपती करणार अशी चर्चा मीडियामध्ये पसरली आणि एकच वादळ सुरु झालं.

लोक दोन्ही साईडने बोलत होती. अण्णांनी हे पद स्वीकारावे म्हणजे लोकपाल पेक्षाही खमक्या माणूस देशाच्या कारभारावर अंकुश ठेवून बसेल असं भोळ्या भाबड्या जनतेचं मत होतं. जरा व्यवहारी असलेले मेम्बर सांगत होते की राष्ट्रपतींच्या हातात विशेष अधिकार नसतात. मग त्यांना त्या पदावर बसवून काय उपयोग होणार नाही.

राजकारणात चाप्टर असणाऱ्या लोकांनी मात्र ओळखलं की काँग्रेस स्वतःची इमेज सुधारण्यासाठी हि आयडिया करत आहे. राहुल गांधींच्या पंतप्रधानपदासाठीचे अडथळे दूर व्हावेत म्हणून हि स्कीम काढण्यात आली आहे असं बोललं गेलं. खुद्द अण्णा हजारे यावर मत विचारल्यावर म्हणाले,

राष्ट्रपती हा सर्वोच्च पदावर असतो त्यामुळे त्याच्यामध्ये अपमान सहन करण्याची ताकद असावी. तसंच तो चारित्र्य संपन्न असावा.

अण्णा हि ऑफर स्वीकारणार कि नाही म्हणणार याबद्दल सगळ्या देशात उत्सुकता निर्माण झाली होती. काँग्रेस कडून तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती पण प्रतिभा ताईंच्या जागी अण्णांना आणलं जाणार असल्याच्या वावड्या त्यांनी सोडल्या होत्या हे नक्की.

अण्णांच्या गोटात  त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली. अण्णा नावाचे वादळ शांत करून त्याला राष्ट्रपती भवनाच्या चार भितीत कोंडण्याचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा सरकारचा डाव असेल तर अण्णांनी या सूचनेचा अजीबात स्वीकार करू नये असे त्यांच्या चाहत्यांनी म्हटले. राजकारणात येणार नाही म्हणणारे टीम अण्णाचे सदस्य देखील निवडणुकीची तयारी करू लागले होते. अण्णा काँग्रेसच्या गळाला लागले तर त्यांचीही मोठी अडचण होणार होती. त्यांनी हा विषय जोरात हणून पडला.

खुद्द मनमोहन सिंग अण्णांना राष्ट्रपती करण्यासाठी उत्सुक आहेत असं बोललं गेलं पण अण्णा त्यासाठी उत्सुक आहेत का हे कधी समोर आलं नाही. राळेगणसिद्धी प्रमाणे संपूर्ण देशाला आदर्श बनवण्याचं त्यांचं स्वप्न असेलही पण ते कधी समोर आलं नाही.

अखेरीस अण्णांचं नाव मागं पडलं. काँग्रेस वाले खुद्द मनमोहन सिंग यांनाच राष्ट्रपती करण्याची मागणी करू लागले. काहीही करून स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रपती पाहिजे यावर सगळ्यांचं मत ठाम होतं. मधल्या मध्ये काय सूत्रे हलली माहित नाही पण शेवटी काँग्रेस कडून प्रणब मुखर्जीचं नाव पुढं आलं.

हे सगळं चालू असताना अण्णा राष्ट्रपती होणार याची चर्चा काही थंड होत नव्हती. यावेळी काँग्रेस ऐवजी भाजप कडून त्यांना उमेदवारी मिळणार अशा बातम्या पसरू लागल्या. दोन्ही सभागृहात बहुमत असणाऱ्या युपीएच्या उमेदवाराला पाडायला अण्णांनी उतरावं असंच भाजप वाल्यांचं म्हणणं होतं.

पुन्हा अण्णा समर्थक तापले. भाजप म्हणजे काँग्रेस पेक्षा वेगळे नाहीत. एकाला झाकून दुसऱ्याला बाहेर काढावं अशीच स्थिती असं त्यांचे नेते म्हणू लागले. अण्णांनी भाजपाला देखील नकार द्यावा म्हणून दबाव टाकण्यात आला. पुढं ते देखील बारगळला. भाजपला उमेदवारच मिळाला नाही. अखेर त्यांनी पी ए संगमा यांना पाठिंबा दिला.

त्यावेळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले,

“आम्ही कधी अण्णा हजारेंना उमेदवारी देणारच नव्हतो. अशी ऑफर कधी दिलीच नाही. आमची आणि अण्णा हजारेंची इमेज  करावी म्हणून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी मुद्दामहून पसरवलेली अफवा आहे.”

एकूण काय तर अण्णा हजारेंना होणारी राष्ट्रपतीपदाची ऑफर हवेतच विरली आणि देश एका स्वच्छ प्रतिमेच्या राष्ट्रपतींना मुकला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.