दारूवरून ट्रोल होणाऱ्या अण्णांच्या सामाजिक कार्याची सुरुवातच दारूबंदीपासून झाली होती

महाराष्ट्र सरकारने नुकतंच किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री कायदेशीर करण्यास परवानगी दिली आहे. आता कोणालाही सहज वाईन या दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या नव्या दारू धोरणाला विरोधी पक्षांकडून विरोध दर्शवला जातोय. भाजपही या निर्णयाच्या विरोधात आहे. मात्र हा मुद्दा जास्त हायलाईट झाला तो अण्णा हजारेंच्या एन्ट्रीने.

दारू विक्रीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचं हित पाहून हा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. पण या निर्णयामुळे लहान मुलं आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांना त्रास होऊ शकतो, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचं अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवाय महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मात्र अण्णांच्या या निर्णयावरून त्यांना सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातंय. अण्णा आत्ताच का दारू मुद्यावर बोलते झाले? त्यांचा संबंध काय? अशा आशयाच्या पोस्ट सगळीकडे व्हायरल होतायेत. म्हणूनच याच्या खोलात जाऊन आम्ही विचार केला आणि तेव्हा एक तथ्य समोर आलं. 

आंदोलन आणि उपोषणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारू विरोधात सुरु केलेली ही पहिलीच चळवळ नाहीये. खरं तर अण्णांच्या सामाजिक कार्याची सुरुवातंच ‘दारू’ या मुद्यावरून झाली होती.

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे १९६२ च्या सुमारास भारतीय लष्करात दाखल झाले होते. तेव्हा त्यांचं वय २५ वर्षांचं होतं. मात्र १९६५ आणि १९७० या दोन वर्षांत त्यांच्या सोबत अशा काही घटना घडल्या ज्याने अण्णांना लष्कर सोडण्यास प्रवृत्त केलं. या दोन्ही घटनांत अण्णा मरता मरता वाचले, तेव्हा आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देतंय, असं त्यांना वाटलं. आपलं उरलेलं आयुष्य गरीबांची दुःखं दूर करण्यात घालवावं, असा निश्चय करून वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर अण्णा त्यांच्या मूळगावी ‘राळेगण सिद्धी’ ला परतले. गावात बघता तर काय फक्त गरिबी आणि निराशा. अशात अण्णांनी कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग न करता फक्त जिद्द आणि सहकार्यातून गावाचा कायापालट करायला सुरुवात केली. 

अण्णांनी गावकऱ्यांसमोर ‘आदर्शगाव’ ही संकल्पना मांडली. त्यात व्यसनमुक्ती, गुटखाबंदी, जलसंधारण यापासून आपल्या कामाला सुरुवात केली. व्यसनमुक्ती करायची असेल तर आधी दारू बंदी करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि अशाप्रकारे त्यांच्या सामाजिक कार्याचा आरंभ ‘दारू’ या मुद्यापासून झाला.

गावात दारू बंद व्हावी यासाठी त्यांनी गावातील नागरिकांना मंदिरात एकत्र केलं आणि तिथे त्यांना शपथ दिली.

या नंतर मात्र त्यांनी राज्यस्तराचा विचार केला. राज्यातील इतर भागात दारू बंदी करण्यात यावी, यासाठी अण्णा हजारे यांनी प्रयत्न केले. यासाठी चंद्रपूर, गडचिरोली या भागातील अनेकांना मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांनी दिलं. तेव्हापासून अण्णा शक्य होईल त्यांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आताच्या अण्णांच्या दारू मुद्यावरून अजून एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे ‘महाविकास आघाडीचे सरकार’ आहे म्हणून अण्णा हे करतायत. मात्र या कारणामुळे अण्णा वाईन धोरणा विरोधात उतरले आहेत, असं नाहीये. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही त्यांनी दारू बंदी संदर्भात आवाज उठवला होता. हायवे जवळील दारूची दुकाने बंद करावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहीलं होतं.

या काळात हा मुद्दा चांगलाच ज्वलंत झाला होता. न्यायालयाने हा मुद्दा लावून धरत नियम देखील केला होता. अण्णांची भूमिका ही नेहमी दारू विरोधात राहिलीये, असं सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले आहेत. 

आताही अण्णांनी किराणा दुकानांत दारू विक्रीवर बंदी घालण्यासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. तेव्हा त्यांच्या उपोषणापर्यंत सरकार निर्णय बदलेल का? की अण्णांना उपोषण करावं लागेल? आणि उपोषण केलं तर त्याचा परिणाम काय होतोय? हे तर येणार काळंच सांगेल.

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.