आईच्या स्वप्नासाठी जिने ‘मदर्स डे’ सुरु केला, तिनेच तो बंद करण्याची मोहीम सुरु केली होती

‘मदर्स डे’ आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात ५० पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो. हा पण प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या दिवशी. खास करून मार्च ते मे महिन्यातं. यात भारत मे महिन्याच्या पहिल्या रविवारी मदर्स डे साजरा होतो.

आता तुम्ही म्हणाल यावर्षीचा ‘मदर्स डे’ झाला कि, त्याचं आता काय. तर भिडू आपल्याला ‘मदर्स डे’ची थीम आणणाऱ्या सहसंस्थापिका अ‍ॅना  जार्विस यांचा एक किस्सा सापडलाय. 

तर १०७ वर्षांपासून सुरु असलेली ही मदर्स डेची परंपरा अ‍ॅना मारी जार्विस यांनी सुरु केली. अ‍ॅना मारी जार्विसने आपल्या आई अ‍ॅन जार्विसला हा दिवस समर्पित केला होता. ज्यादिवशी त्यांची पुण्यतिथी असते.

खरं तर, मदर्स डेची सुरुवात अ‍ॅना मारी जार्विसची आई अ‍ॅन जार्विसला करायची होती. यामागे त्यांचा उद्देश होता कि, आईंसाठी एका अश्या दिवसाची सुरुवात करायची, ज्यादिवशी त्यांच्या  अतुलनीय सेवेसाठी त्यांना सन्मानित केले जाईल. पण अ‍ॅन जार्विस यांचे १९०५ मध्ये निधन झाले आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची मुलगी म्हणजे अ‍ॅना मारी जार्विसने घेतली.

पण, अ‍ॅनाने या दिवसाच्या थीममध्ये  किंचित बदल केला. त्यांनी म्हंटल कि, या दिवशी लोकांनी आपल्या आईच्या बलिदानाची आठवण केली पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे. लोकांना तिची कल्पना फार आवडली. यानंतर १९०८ मध्ये म्हणजे अ‍ॅन जार्विसच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.

जेव्हा जगात पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला, तेव्हा अ‍ॅना जार्विस एक प्रकारे याची पोस्टर गर्ल होती. तिने त्या दिवशी आपल्या आईच्या आवडते पांढरे कार्नेशन फुल महिलांना वाटले, जे व्यवहारातचं घेतले गेले. या फुलांचे व्यापारीकरण इतके वाढले की, येत्या काही वर्षांत, मदर्स डेच्या दिवशी पांढऱ्या कार्नेशन फुलांचा काळाबाजार व्हायला लागला. लोक जास्तीत जास्त किंमतीत ते खरेदी करण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून अ‍ॅना संतापली आणि हा दिवस संपवण्याची मोहीम सुरू केली.

मदर्स डे वर पांढऱ्या कार्नेशन फुलांच्या विक्रीनंतर, टॉफी, चॉकलेट आणि सर्व प्रकारच्या भेटवस्तू देखील ट्रेंडमध्ये येऊ लागल्या. अशा परिस्थितीत अ‍ॅनाने लोकांना याबाबदल विरोधही केला. ती म्हणाली कि,

लोकांनी आपल्या लोभासाठी मार्केटिंग करून या दिवसाचे महत्त्व कमी केले आहे.

१९२० मध्ये तिने लोकांना ही पांढरी कार्नेशन फुलं खरेदी न करण्याचे आवाहनही केले. अ‍ॅना तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा दिवस संपवण्याच्या मोहिमेत गुंतली होती. पण तरीही हा मदर्स डे साजरा होत होता. याची ख्याती हळु- हळू अख्ख्या जगात पसरली. तिने यासाठी स्वाक्षरी मोहीमही चालवली, पण यात काही यश मिळाले नाही आणि १९४८ च्या आसपास अ‍ॅनाने या जगाला निरोप दिला.

अ‍ॅनाने मदर्स डे च्या बाजारीकरणाविरुद्ध सुरु सुरु केलेल्या मोहिमेचा परिणाम भलेही जगावर झाला नसेल. पण तिच्या कुटुंबावर मात्र झाला. तिचे कुटुंब आणि नातेवाईक आजही हा दिवस साजरा करत नाही.

काही वर्षांपूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅनाच्या नातेवाईक एलिझाबेथ बार यांनी सांगितले की,

आम्ही सगळ्याचं नातेवाईकांनी कधीचं  मदर्स डे साजरा केला नाही, कारण आम्ही अ‍ॅनाचा खूप आदर करतो. मार्केटींगने या स्पेशल दिवसाचा सगळं अर्थ बदलला आहे,  या अ‍ॅनाच्या भावनेवर त्यांचा खोलवर प्रभाव पडला आहे.

दरम्यान, आज कित्येक वर्षांनंतरही सगळ्या जगभरात हा मदर्स डे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. भलेही एक दिवस का असेना आपण आपल्या आईच्या त्यागाबद्दल तिचे आभार मानतो. 

हे ही  वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.