संघाचा कट्टर स्वयंसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो हे एकदाच घडलं होतं

नुकताच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गल्ली ते दिल्ली इतके दिवस भाजपमध्ये इनकमिंग सुरु होतं मात्र खडसे यांच्या रूपाने भाजपने आपला खंदा नेता गमावला.

असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या भाजपचे कार्यकर्ते वैचारिक दृष्ट्या पक्के असतात. कितीही संकटे आली तरी ते पक्ष सोडत नाहीत.

पक्षादेश शेवटचा मानून काम करत राहणे हीच संघाची शिस्त कार्यकर्त्यांमध्ये बाणवलेली पाहायवयास मिळते. मात्र इतिहासात अशीही घटना घडली होती जेव्हा एकेकाळचे संघाचे कट्टर स्वयंसेवक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते.

त्यांचं नाव लक्ष्मण सोनोपंत उर्फ अण्णा जोशी.

पुण्यात जन्मलेल्या अण्णा जोशींवर लहानपणापासून संघाच्या शाखेचे संस्कार झाले. पुणे विद्यापीठात त्यांच एमएस्सी पर्यंत शिक्षण झालं झालं होतं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यां तरुणांमध्ये अण्णा जोशी आघाडीवर होते. त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाला. या कारावासातुन ते बाहेर आले ते हिरो बनूनच.

अण्णा जोशी नगरसेवक म्हणून महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होतेच पण त्यांना १९८० साली पुण्याच्या शिवाजीनगर येथून भाजपच्या आमदारकीचं तिकीट देण्यात आलं. अण्णांच्या विरोधात काँग्रेसच्या जयंत टिळक यांनी सुप्रसिद्ध लेखक ग.दि.माडगूळकर यांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांना तिकीट दिल होतं.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अण्णा जोशींनी माडगुळकरांचा ६०० मतांनी पराभव केला. पुन्हा १९८५ साली अण्णांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली. अण्णांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना १९८९ साली पुणे लोकसभेचे तिकीट देण्यात आले.

तो पर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ असे दिग्गज नेते येथे निवडून आले होते. यावेळी काँग्रेसने पुन्हा विठ्ठलराव गाडगीळ यांना तिकीट दिलं होतं. नरहर गाडगीळ यांच्या काळापासून शहर काँग्रेसवर गाडगीळ घराण्याची मजबूत पकड होती. विठ्ठलराव म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर राहिलेले अनुभवी नेते.  

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरुद्ध डिपॉजिट जरी वाचलं तर भरपूर झालं अशी भाजप उमेदवाराची धारणा असायची.

पण यावेळच्या निवडणुकीत रंग वेगळा होता. अण्णा जोशींनी आमदार म्हणून केलेलं काम तिथल्या नागरिकांना माहित होतं. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता, याकाळात त्यांची लोकप्रियता शिखरावर होती या उलट विठ्ठलराव गाडगीळ यांच्या रामजन्म भूमी बद्दलच्या भूमिकेबद्दल पुण्याच्या जनतेत रोष होता. याचा परिणाम मतपत्रिकेवर दिसून आला.

विठ्ठलराव गाडगीळ १९८९ ची लोकसभा निवडणूक जिंकले मात्र फक्त अवघ्या ९ हजार मतांनी. पहाटे पाच वाजेपर्यंत मत मोजणी सुरु होती.

अनुभवाच्या जोरावर गाडगीळांनी अण्णा जोशींना हरवलं मात्र त्यांनी निकालानंतर जोशींची भेट घेऊन खास कौतुक केलं.

१९९१ साली मात्र अण्णा जोशी संपूर्ण तयारीने उतरले. असं म्हणतात की काँग्रेसच्या शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या कार्यकर्त्यांनी गाडगीळ नको म्हणून जोशींचा प्रचार केला. कारण काहीही असो अण्णा जोशी यांनी विठ्ठल गाडगीळ यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला चारी मुंड्या चीत केले.

अण्णा जोशींच्या रूपाने भाजपला पुण्यात पहिला खासदार मिळाला.

भाजपाला पुण्यात रुजवण्याचे काम अण्णा जोशी यांनी केले. पण या विजयानंतर अण्णा जोशींना भाजपने एकदाही तिकीट दिले नाही. याची कारणे शेवट पर्यंत गुलदस्त्यात राहिली. पुढच्या १९९६ सालच्या निवडणुकीत नवख्या गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण काँग्रेसच्या कलमाडींनी त्यांचा पराभव केला.

१९९८ सालच्या निवडणुकीत अण्णा जोशींनी तिकीट मिळवण्यासाठी  जोरदार तयारी केली होती. मात्र तेव्हा झालेल्या प्रचंड गोंधळात भाजपतर्फे कोणाची उमेदवारीच दाखल झाली नाही. शेवटी अटलबिहारी वाजपेयी यांनी अपक्ष उभ्या असलेल्या सुरेश कलमाडी यांना पाठिंबा दिला आणि प्रचार सभा देखील घेतली पण त्यांचा पराभव झाला.

अण्णा जोशींनी खेचून आणलेला मतदारसंघ भाजपने पुढच्या काळात हातचा गमावला. जोशींनी राष्ट्रीय नेतृत्वाला मला का डावललं जात आहे असा संतप्त सवाल केला होता.

परत पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक आल्या. आता केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार होते. पवारांच्या राष्ट्रवादीची निर्मिती झाल्या मुळे पुण्यात देखील काँग्रेसमध्ये फूट पडली होती. कधी नव्हे ते यावेळी भाजपची पुण्यातली स्थिती मजबूत दिसत होती.

भाजपतर्फे अण्णा जोशींच नाव फायनल झालं, केंद्रांतून खुद्द मुरली मनोहर जोशी यांनी त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब केलं होतं. पण राज्यात भाजप वर पकड असणारे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जोडगोळीला अण्णा जोशी नको होते.

महाजनांनी पुण्याहून भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना एक खास कानमंत्र दिला.

गोव्यात भाजपचे चिंतन शिबीर भरले होते. तिथे हे सगळे कार्यकर्ते पोहचले. त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या दारात धरणे धरले. पुण्यातून अण्णा जोशी यांच्या ऐवजी प्रदीप रावत यानांच उमेदवारी मिळाली पाहिजे हि त्यांची मागणी होती. त्यांचा हा आवेश बघून शेवटच्या क्षणी अडवाणी यांनी आपला निर्णय फिरवला आणि अण्णा जोशींचे तिकीट कापले.

प्रदीप रावत तेव्हा निवडून आले मात्र भाजपचा पुण्याचा चेहरा असणारे अण्णा जोशी भाजपच्या राजकारणातून बाजूला फेकले गेले.

अण्णांना पुन्हा कधीच तिकीट मिळाले नाही. आपल्यावरचा अन्याय सहन न होऊन अण्णांनी २००६ साली राष्ट्रवादीची वाट पकडली. खरं तर राज्याच्या राजकारणात पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोन विरुद्ध टोक मानले जातात. आता पर्यंत भाजप शिवसेनेच्या काही नेत्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

मात्र संघाचा वारसा असूनही राष्ट्रवादी मध्ये जाणारे अण्णा जोशी हे पहिलेच नेते ठरले.

२००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघात आमदारकीचे तिकीट दिले. राजकारणातील लोकप्रियता घसरणीला लागलेल्या अण्णा जोशींचा मोठा पराभव झाला. दुर्दैवाने ते चौथ्या स्थानावर राहिले. अण्णा जोशींनी भाजप सोडली हे त्यांच्या परंपरागत मतदारांनी स्वीकारले नाही, याचा त्यांना फटका बसला. संघाचे कट्टर कार्यकर्ते आपल्या नेत्यांनी विरुद्ध विचारधारेच राजकारण केलेलं खपवून घेत नाहीत हाच संदेश या निवडणुकीनंतर दिला गेला.

पुढे अण्णा जोशींनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला व सक्रिय राजकारणातून ते बाहेर पडले.

पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर त्यांनी ठसा उमटवला होता. पुणे सहकारी बँकेची स्थापना त्यांनी केली होती. महापालिका सभागृहात तसेच विधानसभेतही त्यांची अभ्यासू आमदार अशी ओळख होती. उत्तम वक्ते आणि लोकसंपर्कासाठीही ते प्रसिद्ध होते. पुण्यातील सर्व राजकीय पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता. राजकारणाच्या चढउतारामुळे एका मोठ्या कार्यकर्त्याची झालेली फरफट पुणेकरांनी अनुभवली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.