हाॅटेलमधला आचारी, फाळकेंची नजर पडली अन् बनला भारतीय सिनेमातील पहिली अभिनेत्री

भारतीय सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके. त्याकाळी सर्वार्थाने अशक्य वाटणारं स्वप्न दादासाहेब फाळकेंनी खरं करुन दाखवलं. ते स्वप्न होतं सिनेमा बनवण्याचं. अनेक अडचणींचा सामना करुन, अथक मेहनत करुन फाळकेंनी ‘राजा हरीश्चंद्र’ सिनेमा बनवला. ‘राजा हरीश्चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा.

तेव्हाचे रंगभुमीवरील अनेक नट फाळकेंनी ‘राजा हरीश्चंद्र’ सिनेमासाठी निवडले. एकएक करुन प्रत्येक भुमिकेसाठी कलाकार मिळत होते. पण फाळकेंना राजा हरिश्चंद्राची बायको तारामतीच्या भुमिकेसाठी कोणी नटी सापडत नव्हती.

फाळकेंना सिनेमातील पहिली नटी कशी मिळाली माहितीय ???

‘राजा हरिश्चंद्र’ चा घाट घातल्यावर तारामतीच्या भुमिकेसाठी दादासाहेब फाळके अभिनेत्रीचा शोध घेत होते. तेव्हा कोणतीही स्त्री सिनेमांमध्ये काम करण्यास तयार नव्हती. काम करायची इच्छा असेल तरीही समाजाची चौकट आड यायची.

शेवटी नाईलाज म्हणुन फाळकेंनी त्यांच्या पत्नी सरस्वतीबाईंना विचारले.

.परंतु सरस्वतीबाई फाळकेंसोबत सिनेमाच्या इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला. सिनेमाच्या तांत्रिक बाजु सांभाळणारी पहिली स्त्री म्हणुन फाळकेंच्या पत्नीला श्रेय द्यावं लागेल. त्यावेळेस नाटकांमध्येही स्त्रियांच्या भुमिका पुरुषच करायचे. त्यामुळे तारामती फाळकेंना सापडत नव्हती.

आणि तारामतीचा शोध संपला

‘तारामती’ साठी महिलेचा शोध घेता घेता फाळके व्यथित झाले. एके दिवशी एका हाॅटेलमध्ये चहापानासाठी गेले असता फाळकेंना तिथे देखणा, सडपातळ माणुस दिसला. त्या माणसाचं नाव अण्णा साळुंखे. साळुंखे त्या हाॅटेलात आचा-याचं काम करायचे. फाळकेंना साळुंखेमध्ये तारामती दिसली.

फाळकेंनी सिनेमात काम करण्याविषयी साळुंखेला विचारलं. साळुंखे १० महिने प्रतिमहिना पगारावर हाॅटेलमध्ये काम करायचा. फाळकेंनी त्याला सिनेमात काम केल्यावर १५ रुपये द्यायचं कबुल केलं. शिवाय २ वेळचं जेवण मिळणार होतं.

हे सर्व ऐकल्यावर, साळुंखे आनंदाने सिनेमात काम करण्यास तयार झाला.

साळुंखेची आणखी अडचण होती. साळुंखे मिशी कापण्यास तयार नव्हता.

त्यावेळी वडील वारल्याशिवाय मिशी कापायची नाही, अशी एक पद्धत होती. फाळकेंनी साळुंखेच्या वडीलांना समजावलं. वडील मान्य झाले आणि साळुंखेने तारामतीसाठी स्वतःची मिशी कापली. अशाप्रकारे भारतीय सिनेमातील पहिली अभिनेत्री म्हणुन अण्णा साळुंखे यांना ओळखलं गेलं.

गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमागृहात, शनिवार ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरीश्चंद्र’ प्रदर्शित झाला. ५० मिनीटांच्या या मुकपटाने २३ दिवस कोरोनोशन थिएटरमध्ये मुक्काम ठोकला होता. पुढे अन्य ठिकाणी सुद्धा सिनेमाचं प्रदर्शन झालं. हे सर्व दृश्य परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या मराठी सिनेमात सुद्धा पाहायला मिळतं.

‘डबल रोल’ करणारा पहिला कलाकार

‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाल्यानंतर अण्णा साळुंखेंनी साकारलेल्या तारामतीचा सर्वत्र बोलबाला झाला. यानंतर अण्णा साळुंखेंची भारतीय सिनेमात पहिला ‘डबल रोल’ करणारा अभिनेता म्हणुनही ओळख आहे. ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमानंतर रामायणातील गोष्टींवर आधारीत ‘लंका दहन’ हा सिनेमा १९१७ साली फाळकेंनी बनवला.

या सिनेमात अण्णा साळुंखेंनी राम आणि सीता या दोन्ही व्यक्तिरेखा साकारल्या. राम आणि सीता साकारणारा कलाकार एकच आहे, हे ओळखणं प्रेक्षकांना अवघड गेलं. इतका फर्मास अभिनय अण्णा साळुंखेंनी केला. अशाप्रकारे भारतीय सिनेमात डबल रोल करणारा पहिला कलाकार म्हणजे अण्णा साळुंखे.

अभिनयासोबतच साळुंखेंनी त्याकाळच्या जवळपास ३२ सिनेमांसाठी सिनेमेटोग्राफर म्हणुन काम केले.

१९३१ साली भारतीय सिनेमे बोलु लागले. मुकपटांचा काळ सरला. यानंतर अण्णा साळुंखे हे नाव सुद्धा काळाच्या ओघात गुडूप झालं. परंतु अण्णा साळुंखेंमुळे त्यानंतर अनेक महिलांना सिनेमात काम करायची प्रेरणा मिळाली. त्यामुळे भारतीय सिनेमासाठी दादासाहेब फाळकेंसारखंच अण्णा साळुंखेंसारख्या मंडळींनी दिलेलं योगदान न विसरता येण्यासारखं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.