रशियात अण्णाभाऊंचं स्मारक उभारण्यामागे मुंबई विद्यापीठातील डॉ. संजय देशपांडेंचे प्रयत्न आहेत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव म्हणून रशियात मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आलाय आणि या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मिळालंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना !

येत्या १४ सप्टेंबर रोजी फडणवीसांच्या हस्ते अनावरण होणार आहे.  आता अण्णा भाऊंचं आणि रशियाचं काय नातं आहे ते सर्वांनाच माहित आहे. अण्णा भाऊंचं मराठी लिखाण आणि रशियाविषयी केलेलं लिखाण हे रशियन भाषेत भाषांतरित केलं गेलं आहे. रशियन जनतेच्या मनातही अण्णा भाऊंचं आदराचं स्थान आहे, त्यांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा तर लोकप्रियच आहे.

म्हणूनच अण्णा भाऊंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान व्हावा या उद्देशाने मॉस्कोतल्या ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे…

हा अण्णा भाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याचं श्रेय जातं ते मुंबई विद्यापीठातील एका प्राध्यापकाला…त्यांचं नाव डॉ. संजय देशपांडे.

डॉ संजय देशपांडे हे मुंबई विद्यापीठात रशियन भाषा विभागाचे प्रमुख आहेत, युरेशियन स्टडीज या विषयातील ते विशेषज्ञ आहेत. तसेच ते युरेशियन अभ्यास केंद्राचे संचालक आहेत. 

त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज रशियात अण्णाभाऊंचा पुतळा उभा राहिलाय. बोल भिडूने डॉ देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी बातचीत केली, तेंव्हा देशपांडे यांनी मॉस्कोत अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्याच्या प्रवासाबाबत सांगितलं,

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,

मुंबई विद्यापीठातील रशियन भाषा विभागाने मातंग ग्रुप डेव्हलपमेंट संघटनेच्या प्रस्तावानुसार  २०१७ च्या ऑक्टोबरमध्ये महिन्यात मुंबईतील रशियन दूतावासामध्ये अण्णा भाऊंच्या कार्यावर एक मोठा सेमिनार आयोजित केला होता. 

२०१९ मध्ये संजय देशपांडे त्यांच्या कुटुंबासोबत रशियाला गेले होते. असंही त्यांचं युरेशियन स्टडीजच्या कामानिमित्त दरवर्षी रशियाला जाणं-येणं होत असते. २०१९ मध्ये देशपांडे रशियात वास्तव्यास होते. 

आणि याच दरम्यान तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अण्णा भाऊंचं जन्मशताब्दी वर्षं साजरं करायचं घोषित केलं होतं. जन्मशताब्दी वर्षाच्या त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठानेही अण्णा भाऊंना आदरांजली म्हणून उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. 

देशपांडे यांनी तिकडे रशियात अशा ठिकाणांना भेटी देण्यास सुरुवात केली जिथे अण्णा भाऊंनी भेटी दिल्या होत्या. अण्णा भाऊ ज्या ‘हॉटेल सोव्हिएतस्काय’ या हॉटेलमध्ये राहिले होते तिथेही देशपांडे यांनी भेट दिली. या हॉटेलात इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, फिडेल कॅस्ट्रो यांच्यासह जगभरातील अनेक राजकारणी नेत्यांनी भेटी दिल्यात, त्यांची तैलचित्रे देखील हॉटेलात लावण्यात आलीत.  

annabhau sathe's oil painting displayed in moscow hotel for his birth centenary

या हॉटेलात अण्णा भाऊंचंही चित्र असावं म्हणून देशपांडे यांनी तसा लेखी प्रस्ताव, त्यांची माहिती आणि वास्तव्याविषयीची माहिती हॉटेलमालकाला दिली आणि प्रस्ताव मान्य झाला. देशपांडे यांनी भारतात परतल्यावर अण्णाभाऊंचं हे तैलचित्र नांदेडहून खास बनवून घेतलं आणि ते मॉस्कोला पाठवलं अन् ते तैलचित्र आज हॉटेल सोव्हिएतस्कायमध्ये लावलेलं आहे.

यानंतर अण्णा भाऊंचा पुतळा रशियात असावा यासाठी प्रयत्न सुरु केले.

संजय देशपांडे सांगतात की, रशियामध्ये ‘मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ नावाची लायब्ररी आहे.  लायब्ररीत मी विद्यार्थीदशेत असताना अभ्यासाला जायचो. माझं शिक्षण हे मॉस्को मध्येच झालं. त्या लायब्ररीच्या बाहेर एक सर्कल आहे जिथे अनेक नेत्यांचे पुतळे आहे. महात्मा गांधींचाही पुतळा आहे.

Embassy of India, Moscow (Russia)

अण्णा भाऊंचं रशियातील वास्तव्य आणि लिखाणांची आठवण म्हणून इथे अण्णा भाऊंचा देखील पुतळा असावा असं देशपांडेंना जाणवलं.  

देशपांडेंनी या संस्थेला तशी विचारणा केली. त्यांच्याकडून नकार मिळाला. 

मॉस्कोहून परत आल्यानंतर देशपांडेंनी याबाबत ई-मेलद्वारे बराच पाठपुरावा केला. अण्णा भाऊंचं रशियन भाषेत अनुवादित झालेल्या साहित्याविषयी देशपांडे यांनी संबंधित ग्रंथालयाच्या व्यवस्थापनास सांगितलं. अखेर २०१९ च्या जून महिन्यात त्यांनी या पुतळ्याच्या प्रस्तावास मान्यता दिली.

या मान्यतेनुसार, मातंग ग्रुप डेव्हलपमेंटच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा बनवण्यासाठी पैसे गोळा केले, पुतळा तयार करून घेतला आणि मॉस्कोला पाठवला. देशपांडे सांगतात कि, “या सगळ्या गोष्टी २०१९ च्या आहेत, जेंव्हा जन्मशताब्दीचं वर्ष चालू होतं. रशियात पोहचलेल्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण करायचा प्लॅन देखील झालेला त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मॉस्कोला यावं, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केलेली.  

ग्रंथालयाच्या  संचालकांनीदेखील, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना आम्ही रीतसर आमंत्रण देऊ’ असं सांगितलं होतं. मुंबई विद्यापीठाने देखील याबाबत निर्णय घेण्याची मोकळीक मला दिली होती. तशी सप्टेंबर महिन्याची रजा देखील मंजूर झालेली. 

सगळं काही मे महिन्यात नियोजन ठरलेलं मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आलीच नाही कारण नेमकं नंतर लॉकडाऊन लागलं. म्हणून पुतळ्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला.

तो कार्यक्रम आत्ता पूर्णत्वास येतोय…

येत्या १४ सप्टेंबर ला अण्णा भाऊंच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मिलिंद नार्वेकर तसेच भारतात राहणारे अनेक रशियाचे अभ्यासक आणि भारतातून ५ जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या ५ जणांमध्ये डॉ संजय देशपणे यांचाही समावेश आहे.     

ज्यांच्या प्रयत्नांनी हे स्मारक उभारलं गेलं त्या देशपांडे यांची याबाबत बोल भिडूला समाधानकारक प्रतिक्रिया दिली, ते म्हणतात की,

अण्णा भाऊंसारख्या मोठ्या साहित्यिकाला रशियात त्यांची आठवण करून देणारं यथोचित स्मारक असावं असं वाटत होतं. हे स्मारक उभा राहणं हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव आहे. आणि हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, त्याच्या पाठपुराव्यात कुठंतरी माझी भूमिका असल्यामुळे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आणि समाधारक बाब आहे”.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.