फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत, त्याचं जगणं, त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे

फकिरा…

जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकिरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार कशा प्रकारे ठेचतो याच जबरदस्त वर्णन अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची हि फकिरा कादंबरी म्हणजे साहित्यविश्वातला मानबिंदू आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात हा फकिरा अण्णाभाऊंच्या लेखणीच्या रूपाने पोहचला. वंचितांचा प्रेरणास्रोत असलेला हा फकिरा जगभरात गाजला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अण्णाभाऊंनी हि फकिरा कादंबरी अर्पण केली. अण्णाभाऊंची हि कादंबरी म्हणजे मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड मानली जाते. आजसुद्धा बेस्ट सेलर असलेली कादंबरी तेव्हा प्रचंड खपाने विक्री झाली होती. फक्त भारतातच नाही तर झेक, पोलिश, रशियन, इंग्रजी आणि जर्मन अशा अनेक भाषांमध्ये फकिरा जगभर पोहचला.

पण हा फकिरा नक्की कोण होता ? त्याबद्दल जाणून घेऊया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकीराबद्दल लिहून ठेवलंय कि,

ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माणसं माझी असतात. त्यांची मुवर्त ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं. हा फकिरा माझा होता. जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठायी नाही. जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं. त्यातून हा फकिरा निर्माण झाला.

१ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेंचा वाटेगावात जन्म झाला. याच दिवशी इंग्रजी सत्तेविरुद्ध खवळून उठलेले मांग समाजातील सहादु धोंचीकर, बळी आणि फकिरा यांनी वेडस गावचा सहकारी खजिना लुटून, इंग्रजांना दक्षिण साताऱ्याची पहिलीच सलामी दिली. हा खजिना लुटून फकिरा आणि त्याचे सहकारी बेफाम दौड करत निघाले.

इकडे अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला होता पण परिस्थिती हलाखीची असल्याने अण्णाभाऊंच्या घरच्यांकडे बाळाला पाजायला लागणाऱ्या बाळघुटीचे सुद्धा पैसे नव्हते. संध्याकाळ झाली, रात्र गडद झाली आणि मध्यान्ह रात्री वाटेगावच्या मांगवाड्याजवळ घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. त्या घोड्यावरच्या माणसानं अण्णाभाऊंच्या वडिलांना आवाज दिला. पण अण्णाभाऊंचे वडील घरी नव्हते.

अण्णाभाऊंची आत्या [आक्का] त्यावेळी बाहेर आली. तिनं त्याला बघितलं तर घोड्यावर इंग्रजी सत्तेचा खजिना लुटून क्रांतिकारक फकिरा मांगवाड्याजवळ येऊन ठेपला होता. दारी आलेल्या फकिराला तिनं घरात बाळ जन्मल्याची वार्ता सांगितली. फकिराच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा पसरली आणि फकिराने आपल्या ओटीतून दोन ओंजळी सुरती रुपये आक्काच्या ओंजळीत घातले आणि म्हणाला,

हा क्रांतीचा पैसा आहे  या क्रांतीच्या पैशातून बाळाला बाळघुटी पाजा, हे पोरगं क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळबाळंतीणीची काळजी घ्या म्हणत फकिराने घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांमागे नुसता धुरळा उडत राहिला.

याच फकिराच्या पूर्वजांनी एकेकाळी तलवारीच्या जोरावर बाबरखानला ठेचून काढलं होतं. ज्यावेळी इंग्रजी सत्तेने गावाला वेठीस धरलं, फकिराच्या परिवाराला जेरबंद करून सगळ्या गावाची नाकाबंदी केली ती केवळ फकिराने इंग्रजी सत्तेला शरण यावं म्हणून, अशा वेळी फकिराने गावच्या भल्यासाठी आत्मसमर्पण केलं. त्या वेळी प्रांत अधिकाऱ्याने फकिराला विचारलं हि तलवार तुला कुठे मिळाली त्यावेळी या स्वाभिमानी फकिराने उत्तर दिलं

हि तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलीय. हि तलवार घेऊन माझा बाप लढला आणि आता तीच तलवार घेऊन मी तुमच्याशी लढतोय.

अण्णाभाऊंनी हा अंधारात राहिलेला फकिरा आपल्या लेखनाच्या रूपाने जगासमोर आणला. त्याचा पराक्रम, स्वाभिमान, अभिमान आणि दिलदारपणा यथोचित अण्णाभाऊंनी मांडला. फकिरा हि कादंबरी केवळ मनोरंजाचा विषय नाहीए.  तिच्यात इतिहास आणि तत्त्वज्ञान आहे.

वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते. अण्णाभाऊंनी हा फकिरा बराच काळ डोक्यात साठवून ठेवला होता, त्याचे पराक्रम ऐकले होते आणि पुढे अण्णाभाऊंनी या फकिराला साहित्याच्या रूपाने जगासमोर आणलं. या कादंबरीतलं हे लिखाण अण्णाभाऊंच्या असामान्य प्रतिभेची ओळख करून देतं

मरण हे माणसाच्या पुढं जन्माला येतं आणि ते माणसाला घेऊनच मरतं. निराशेच्या कोंडीत सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत,कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. मन मुळचचं बेडर नसतं ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसं पोलाद निखाऱ्यात तापून बाहेर येतं नि कणखर होतं तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती…
                                                                                       -फकिरा
संघर्षाने भरलेलं आयुष्य जगणारे अण्णाभाऊ फकिरा लिहितात आणि तिला राज्यशासनाचा मानाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळतो. स्वतःला फकिराच्या स्वातंत्र्यलढ्याशी अण्णाभाऊ जोडून घेताना म्हणतात
मी असा तसा कलावंत नाही तर फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला मी कलावंत आहे….!
  • दुर्गेश काळे
हे हि वाच भिडू :
Leave A Reply

Your email address will not be published.