त्यांच्या प्रयत्नांतून पुण्याजवळची छोटी खेडी आशिया खंडात नावाजलेली उद्योगनगरी बनली..

जास्त नाही, शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. इंग्रजांचं भारतावर राज्य होतं तेव्हा त्यांनी मुंबई पुण्याला जोडणारा महामार्ग उभा केला. रेल्वे मुळे आधीच अंतर कमी झालं होतं महामार्गामुळे दोन्ही गावातील आणखी अंतर कमी झालं. शांत निवांत पुण्याचा धावत्या मुंबईशी संपर्क वाढला.

मुंबई ही संपूर्ण देशाची औद्योगिक राजधानी होती. विसाव्या शतकाच्या सुरवातीला मुंबईत सुरु झालेल्या गिरण्या कारखाने कालांतराने लोकसंख्या वाढल्यामुळे भर वस्तीत दिसू लागल्या. पुढे वाढती जागेची समस्या, नागरी सुविधांवर वाढत असलेला प्रभाव यामुळे मुबईतून उद्योग धंदे स्थलांतरित केले जावे असा विचार पुढे आला.

स्वातंत्र्याच्या मागचा पुढचा काळ. तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात या द्विभाषिकांचे मुंबई प्रांत हे राज्य होते. तेव्हा मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते तर उद्योग मंत्री जीवराज मेहता हे होते. या दोघांनी मुंबईतील उद्योग व कारखाने गुजरातला हलवण्याचा सपाटाच सुरु केला. गुजरात मध्ये अनेक औद्योगिक वसाहती उभ्या राहू लागल्या.

भायखळा येथे इनव्हेस्टा मशीन टूल्स नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीत मूळचे पुण्याचे असणारे मनोहर आपटे नावाचे गृहस्थ मॅनेजर होते. जेव्हा कंपनी इतरत्र हलवण्याचे विचार पुढे आले तेव्हा आपटे यांनी आपल्या व्यवस्थापनाला कंपनी पुण्याला स्थलांतरित करणे कसे फायदेशीर आहे हे पटवून दिलं.

एव्हाना मुंबईच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण आले होते. त्यांना इनव्हेस्टा मशीन टूल्स कंपनीचे शिष्टमंडळ भेटायला गेले. त्यांनी त्यांच्या समस्या ऐकल्या आणि सांगितलं एकच व्यक्ती तुम्ही मदत करू शकेल,

हवेलीचे आमदार अण्णासाहेब मगर 

अण्णासाहेब मगर हे मूळचे हडपसरचे. तिथली पाटीलकी त्यांच्या घराण्यात चालत आलेली. १२७ एकर जमीन होती. मुबलक ऊस पिकायला. स्वतःची गुऱ्हाळ घरे होती. अण्णासाहेब मगर यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यांचाच समाजकार्याचा वारसा अण्णासाहेब मगर यांच्याकडे चालत आला होता. त्यांच बीएस्सी ऍग्रीमध्ये शिक्षण झालं होतं. कॉलेजमध्ये असतंच त्यांनी  स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. चले जाव चळवळीपासून काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले.

वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर कुटूंबाची आणि समाजकार्याची जबाबदारी अण्णासाहेब मगर यांच्यावर आली. वडिलांचा राजकीय वारसा त्यांनी पुढे नेला.

१९५२ साली झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत ते हवेली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. साधारण याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेने  पिंपरीच्या माळावर हिंदुस्थान अँटी बायोटिक्सचा कारखाना उभा राहत होता. काकासाहेब गाडगीळ यांनी या कार्यात पुढाकार घेतला होता. त्यांनी कारखाना निर्मितीची सगळी जबाबदारी अण्णासाहेब मगर यांच्यावर सोपवली.

१९५४ साली भारताला औषधनिर्मितीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करणारा हा सुप्रसिद्ध कारखाना उभा राहिला. पंतप्रधानांच्या हस्ते त्याच उदघाटन झालं. 

या कारखान्यामुळे देशभरातील इतर उद्योगपतींचे पिंपरी चिंचवडकडे लक्ष वेधलं गेलं. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे वेगवेगळे उद्योगपती अण्णासाहेब मगर यांच्या भेटीला येऊ लागले. मुंबई पुणे हायवेच्या लगत असणारी हि छोटी छोटी खेडी नव्या बदलासाठी सज्ज झाली.

हिंदुस्थान अँटी बायोटिक्सच्या पाठोपाठ रस्टन, इन्व्हेस्टा, कूपर, एल्प्रो, महिंद्रा, अशा अनेक कंपन्या निर्माण होऊ लागल्या. हायवे नजीकच्या शेतकऱ्यांच्या जागा घेऊन हे कारखाने उभे राहत होते. 

औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर यशवंतरावांनी १ ऑक्टोबर १९६० रोजी बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हपलमेंटची स्थापना केली. त्याचेच पुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात रूपांतर करण्यात आले. या एमआयडीसीचे अध्यक्ष स.गो.बर्वे होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीने भोसरी, पिंपरी, चिंचवड या भागातील शेकडो हेक्टर माळरान जमिनी ताब्यात घेतल्या.

३६०० एकर जमिनीवर पिंपरी चिंचवड एमआयडीसी अण्णासाहेब मगर यांनी उभी केली. टेल्को, बजाज, गरवारे, फिलिप्स , टाटा मोटर्स अशा अनेक महत्वाच्या कंपन्या पिंपरी चिंचवडला याव्यात म्हणून अण्णासाहेब मगर यांनी प्रयत्न केले. या उद्योगांच्या निर्मितीसाठी कोणत्या समस्या येतात, त्या सोडवण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेत होते.

साधारण १९७० सालापर्यंत पिंपरी चिंचवडची उद्योगनगरी स्थिरावली. फक्त भारतातच नाही तर सबंध आशिया खंडात ती नावाजली जाऊ लागली.

या मधल्या काळात गावांचं रुपडं बदलून गेलं. नोकरीच्या निमित्ताने हजारो कामगार इथे येऊन वसले. भरमसाठ वेगाने लोकसंख्या वाढू लागली. नागरी व्यवस्थांवर ताण येणार हे आधीच लक्षात घेण्यात आलं होतं म्हणून या खेड्यांच रूपांतर औद्योगिक शहरात करण्याची तयारी पहिल्या टप्प्यापासून सुरु करण्यात आली होती.

१९६० साली गाडगीळ समितीच्या वतीने औद्योगिकीकरण आणि नागरी समस्या वर अभ्यास करून प्रादेशिक नियोजनाचा विचार मांडण्यात आला.

अण्णासाहेब मगर यांनी या दृष्टीने पिंपरी चिंचवड परिसरात विविध संकल्पना राबवण्यास सुरवात केली. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीमध्ये गेल्या त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून चाळी उभा करून देण्यास अण्णासाहेबांनी प्रोत्साहन दिले. यामुळे वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न मिटला आणि जागा गेलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील चालू राहिले.

वाढत्या लोकसंख्येमुळे येणारा ग्रामपंचायती वरचा ताण कमी करण्यासाठी नव्या नगरपालिकेच्या स्थापनेचा विचार त्यांनी मांडला. त्याकाळी आपल्यावरील करत वाढ होईल या विचाराने अनेक गावकरी ग्राम पंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास तयार नव्हते. पण अण्णासाहेब मगर यांनी घरोघरी फिरून त्यांना समजावून सांगितले. अनेक बैठकी घेतल्या.

या सगळ्याचा परिणाम म्हणून ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नव नगरपालिका अस्तित्वात आली. यात आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, फुगेवाडी, कासारवाडी अशा अनेक छोट्या मोठ्या खेड्यांचा समावेश होता.

या नगरीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अण्णासाहेब मगर यांचीच निवड करण्यात आली. आमदार असूनही नगराध्यक्ष पदी राहण्याचा आगळा वेगळा विक्रम देखील अण्णासाहेब मगर यांच्या नावे जमा झाला.

आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी चिंचवड भागात पक्के रस्ते बांधले, प्रत्येक गावात दवाखाने सुरु केले. त्याकाळात आरोग्यविषयक सोयीसाठी नगरपालिका २५ लाख रुपये खर्च करत होती. अनेक शाळा उभ्या केल्या. जिल्हापरिषद शाळा नगरपालिकेकडे वर्ग केल्या, विजेच्या खांबापासून ते स्मशान भूमी पर्यंत, अग्निशामक दला पासून वाचनालय, भाजी मार्केट, बस सेवेपर्यंत प्रत्येक गोष्टी चार पाच वर्षात उभ्या राहिल्या.

१९७६ रोजी अण्णासाहेब मगर यांनी दुर्गादेवी उद्यानात रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. त्यांनी मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा लावलेली झाडे आजही वाटसरूंना सावली देत उभी असलेली दिसून येतात.

अण्णासाहेब मगर यांनी त्याकाळी घेतलेला आणखी एक दूरदृष्टीचा निर्णय म्हणजे पीसीएमटी बस सेवा. त्याकाळी गाड्यांचे प्रमाण आजच्या एवढे प्रचलित नसल्यामुळे लोकांना सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत असे. दूर पुण्याहून कित्येक कामगार सायकलींवरून पिंपरी चिंचवड ला यायचे. यांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात अंतर्गत वाहतूक सुरु व्हावी यासाठी अण्णासाहेब मगर प्रयत्न करत होते.

मात्र एसटी आणि पुण्याची पीएमटी यांच्यात वाद सुरु होते.पिंपरी चिंचवड नगरपालिकेने बसेसची खरेदी देखील केली होती मात्र टायची सुव्रत होण्यास वेळ लागत होता. अखेर एक दिवस वैतागून मगर यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि त्यात निर्णय जाहीर केला कि उद्या पासून पीसीएमटी बस सुरु होत आहे.

पत्रकारांनी त्यांना सांगितलं की अजून मान्यता नाही आणि तुम्ही असं कस बस सुरु करू शकता ?

अण्णासाहेब मगर म्हणाले,

मी या बसेस माझ्या बायका पोरांना फिरवण्यासाठी सुरु करत नाही. हि इथल्या लोकांची सोय आहे. कोणाला काय कारवाई करायची आहे ती करू देत

सगळे पत्रकार अवाक झाले. दुसऱ्या दिवशी पिंपरी ते भोसरी पहिली पीसीएमटी बस धावली. 

असा हा तडफदार निर्णयक्षमता असणारा नेता होता म्हणून पिंपरी चिंचवडची निर्मिती झाली. त्याकाळात गावातल्या तरुणांना कामगारांना खेळण्यासाठी अत्याधुनिक स्टेडियमची आवश्यकता जाणून अण्णासाहेबांनी  प्रयत्न सुरु केले.

कामगारांच्या भल्यासाठी म्हणून उभारल्या जाणाऱ्या या स्टेडियमसाठी शहरातील कंपन्यांनी मदत करावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. काही उद्योजकांनी त्याला विरोध केला. त्यावेळी अण्णासाहेब म्हणाले,

“प्रसंगी भीक मागेन पण कामगारांच्या नगरीत कामगारांसाठी स्टेडियम बांधूनच दाखवेन.”

बोलल्याप्रमाणे त्यांनी अनेक खस्ता खाऊन निधी उभारला. आणि तत्कालीन कामगार मंत्री शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचे थाटात भूमिपूजन केले. स्टेडियम निर्मितीस सुरवात केली.

यात बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा, ग्रंथालय यांनी सुसज्ज बनवण्यात आले आहे. अण्णासाहेब मगर यांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. तिचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मेट्रो पासून अनेक विकासकामे धडधडत आहेत. या सगळ्या विकासाची सुरवात करणाऱ्या अण्णासाहेबांच्या पुतळा आजही महानगरपालिकेच्या इमारती बाहेर उभा आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.