महाराष्ट्राच्या अण्णासाहेब शिंदेंचे उपकार पंजाब हरियाणा कधी विसरू शकणार नाही

गेली सहा महिने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन पेटले आहे. विशेषतः हरियाणा व पंजाबचे शेतकरी तिथे ऊन वारा पावसाची चिंता न करता ठाण मांडून बसले आहेत. मोदी सरकार माघार घेण्यास तयार नाही आणि शेतकरी देखील पाठीमागे हटत नाही आहेत. दिवसेंदिवस आंदोलन चिघळत असलेलं पाहायला मिळत आहे .

मध्यंतरी या आंदोलनाबद्दल बोलताना माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले,

“अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती.”

अशावेळी आजच्या पिढीच्या अनेकांना प्रश्न पडला कि हे अण्णासाहेब शिंदे कोण होते ज्यांचं पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांमध्ये इतकं वजन होतं?

नाशिक जिल्ह्यातल्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळीसारख्या दुर्गम खेड्यात २१ जानेवारी १९२२ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात अण्णासाहेबांचा जन्म झाला. घरची स्थिती गरिबीची होती.  गुरे राखत आई-वडिलांना शेतीकामात मदत करता करता अण्णासाहेबांनी शिक्षण घेतले.

मॅट्रिकला संगमनेर येथील सर डी. एम. पेटिट विद्यालयात ते पहिले आले.

पुढील शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी त्यांना  मदत केली. हा स्वातंत्र्यलढ्याचा काळ होता.  गांधींच्या आंदोलनाने प्रेरित होऊन अनेक तरुणांनी या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती यात अण्णासाहेब शिंदे देखील होते.

१९४२ साली जेव्हा गांधींजीनी इंग्रजांना चले जावं म्हणून अखेरचा इशारा दिला तेव्हा करेंगे या मरेंगे म्हणत अण्णासाहेबांनी कॉलेज शिक्षणावर बहिष्कार घातला व ते नाशिकला परतले.

अनेक काँग्रेस नेत्यांना अटक झाली. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आपल्या पद्धतीने हि लढाई लढण्यास सुरवात केली. कित्येकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. यात अण्णासाहेब शिंदे देखील होते. सिन्नर, अकोले, संगमनेर या भागात ‘प्रतिसरकार’ स्थापण्याच्या ते प्रयत्नाला लागले.

इंग्रज सरकारच्या यंत्रणेला अडथळा यावा म्हणून एक पूल उडवून दिला, पण अण्णासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली.

तुरुंगात असतानाच साम्यवादी विचारसरणीचा अभ्यास करून अण्णासाहेबांनी लेनिनवर एक पुस्तक लिहिले. दोन वर्षांनी १९४४ साली तुरुंगातून ते कम्युनिस्ट कार्यकर्ता बनूनच बाहेर आले. सिन्नर, संगमनेर परिसरातल्या विडी कामगारांना एकत्र करून त्यांनी संघटना बांधली. अहमदनगर जिल्हा कम्युनिस्टमय झाला व अकोले, संगमनेर तालुक्यांचा परिसर कम्युनिस्टांचे बालेकिल्ले बनले.

पुढे स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणावरून त्यांचे मतभेद सुरु झाले. यातूनच अण्णासाहेबांनी पक्ष सोडला. राजकारणापेक्षा दूर वकील व्यवसायात जम बसवण्यासाठी ते श्रीरामपुरला आले.

श्रीरामपूर भाग हा साखर पट्टा म्हणून ओळखला जायचा. या भागात काही खाजगी साखर कारखाने सुरु होते. मात्र या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात असे. त्यामुळे अण्णासाहेबांनी खंडकरी चळवळ उभी केली. अण्णासाहेबांचे या चळवळीच्या निमित्ताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून अनुभवता आले. यातूनच सहकारी साखर कारखान्याचे महत्व त्यांना पटले.

अण्णासाहेबांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या आग्रहाखातर प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या कामात त्यांनी लक्ष घातले. विठ्ठलराव विखे पाटील अण्णासाहेब शिंदे धनंजयराव गाडगीळ या प्रभुतींनी एकत्र येऊन हा कारखाना तर उभारलाच पण सोबतच महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

बेरजेचे राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अण्णासाहेबांना प्रयत्नपूर्वक काँग्रेसमध्ये आणलं.

प्रवरा साखर सहकारी कारखान्याची ख्याती ऐकून १९६१ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कारखान्याला भेट दिली. तिथलं कार्य पाहून ते प्रचंड प्रभावित झाले. अशा प्रकारची सहकारी साखर कारखानदारी उत्तर प्रदेशातल्या आपल्या फुलपूर या मतदारसंघात सुरू करण्यासाठी अण्णासाहेबांना दिल्लीला पाठवा अशी विनंती पंडितजींनी यशवंतरावांना केली. अण्णासाहेब दिल्लीला गेले आणि इंदिराजींसोबत फुलपूरला जाऊन आले.

अण्णासाहेबांचे कृषी-सहकाराबाबतचे ज्ञान व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन कृषी-सहकाराचा एवढा गाढा अभ्यास असलेला माणूस आपल्याला दिल्लीत हवा असा आग्रह पंडितजींनी यशवंतरावांकडे धरला.

पुढच्याच वर्षी १९६२ साली कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब शिंदे काँग्रेसतर्फे खासदार झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते,

‘अण्णासाहेबांसारखा कृषितज्ज्ञ दिल्लीत गेल्याने देशापुढची कृषिसमस्या माझ्यापुरती सुटली आहे.’

यशवंतरावांचा हा विश्वास अण्णासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवला. पुढची १५ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी उपमंत्री-कृषी राज्यमंत्री या पदावर त्यांनी काम केले. देशाच्या कृषिमंत्रिपदाची सूत्रे अण्णासाहेबांनी हाती घेतली, त्यावेळी देशाची कृषी व अन्नसमस्या बिकट बनली होती.

विदेशातून येणारा मिलो (निकृष्ट दर्जाचा गहू) खाऊन आपण कशीबशी गुजराण करीत होतो. १९६०-६२ च्या दोन युद्धांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. अशा स्थितीत अत्यंत आत्मविश्वासानं अण्णासाहेबांनी कृषिमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. शेती, पाणी, बी-बियाण्यांबाबत मूलभूत संशोधन केले. तसेच मातीची प्रत काय, कुठे कोणते पीक येऊ शकते यावरच्या संशोधनाला अण्णासाहेबांनी गती दिली. धान्य, कडधान्य, भाजीपाल्याची कृषी संशोधन केंद्रे व कृषी विद्यापीठांद्वारे ठिकठिकाणी लागवड व संशोधन करून हे सारे प्रयोग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले.

पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू अशा देशभर एक हजार ठिकाणी शेती लागवडीचे प्रयोग यशस्वी केले.

त्यांनी व कृषिसंशोधक स्वामिनाथन यांनी मिळून भारतात हे प्रयोग केले त्यालाच आपण हरितक्रांती म्हणून ओळखतो.

अण्णासाहेबांच्या हरितक्रांतीच्या प्रयोगामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. पंजाबातले गव्हाचे व भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे पंजाबातले शेतकरी अण्णासाहेबांबद्दल विशेष आत्मीयता बाळगून असत.

सोव्हिएत युनियनच्या दौऱ्याहून आल्यावर अण्णासाहेबांनी वैज्ञानिकांना सूर्यफुलांचं बियाणं दिलं. सोयाबीन आणि सूर्यफुलाचं महत्त्व ओळखून भारतामध्ये त्यांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याचं श्रेय त्यांनाच जातं, आज सोयाबीन, सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये गाठलेला विक्रम घडताना अण्णासाहेबांच्या दृष्टीचा प्रत्यय येतो. कमी दिवसात अधिक पैसा देणारी पिकं सर्व शेतकरी मनोभावे स्वीकारतील. ती त्यांची गरज आहे हे अण्णासाहेबांनी वेळीच ओळखलं होतं.

‘भारतातील सूर्यफूल लागवडीचे जनक’ असा त्यांचा गौरव डॉ.एम.एस.स्वामीनाथन सांगतात,

‘रात्रंदिवस केवळ शेती आणि शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या अण्णासाहेबांनी भारतीय शेतीसंशोधनाचा पाया घातला. वैज्ञानिक, प्रसारक आणि शेतकरी यांच्यात अजोड संगम घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. शेती हे त्यांच्या आयुष्याचे मिशन होते.’

महाराष्ट्रातून जाऊन दिल्ली गाजवणारे जे काही मोजके नेते होते त्यात अण्णासाहेब शिंदे यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधींच्या पर्यंत सर्व पंतप्रधानांचा शेतीबद्दलच्या प्रश्नात त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. अण्णासाहेबांच्या खात्यात त्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही.

अण्णासाहेब शिंदेंनी आदर्श कृषिमंत्री कसा असावा याचे उदाहरण देशभरात घालून दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचं हित अण्णासाहेबांसाठी महत्वाचं होतं. देशभरातले शेतकरी त्यांच्यावर अफाट प्रेम करायचे. म्हणूनच आजही अस म्हटलं जातं की अण्णासाहेब असते तर दिल्लीत आंदोलन झालंच नसतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.