दोन दिवसांचा वेळ दिला होता, अन्नू मलिकने ७ मिनिटात हे सुपरहिट गाणं तयार केलं.

२६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट असो आपल्या देशात देशभक्तीपर गाण्यांची या दिवशी रेलचेल असते. प्रत्येक शाळेच्या लाउडस्पिकरवर हि गाणी वाजत असतात. काही गाणी अशी असतात त्या गाण्यांसोबत लोकांचं भावनिक नातं असतं. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी वाटणारी कृतज्ञता आपण गाण्यातून व्यक्त करत असतो. बरीच गाणी आपल्याला पाठही झालेली असतात आणि राष्ट्रीय सणांच्या दिवशी आपण आपसूक ती समाजमाध्यमांवर शोधून ऐकत असतो.

आजचा किस्सा बॉर्डर सिनेमातल्या जगप्रसिद्ध गाण्याचा.

संदेसे आते हें, हमें तडपाते हें…..

या गाण्याने एकवेळ प्रचंड लोकप्रिय मिळवली आणि पुढच्या येणाऱ्या नवनवीन पिढ्यांपर्यंत ती टिकवलं. दरवेळी जेव्हा हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचं नॉस्टॅलजिक वातावरण तयार होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि

हे अजरामर गाणं संगीतकार अनु मलिकने केवळ ७ मिनिटात तयार केलं होतं.

बॉर्डर चित्रपटाचे दिग्दर्शक जे पी दत्ता हे चित्रपटातलं संगीत काहीतरी हटके असावं याचा हट्ट धरून बसले होते. या चित्रपटाचे गीतकार जावेद अख्तर होते आणि संगीतकार अनु मलिक होते. चित्रपट जितका भव्य दिव्य होता त्याला संगीतसुद्धा भरदार हवं होतं.

जे पी दत्ता यांनी गाणी कंपोज करण्यासाठी जावेद अख्तर आणि अनु मलिक याना स्टुडिओत बोलावलं. जावेद अख्तर यांनी गाणी लिहायला सुरवात केली, काही ओळी त्यांनी आधीच लिहिलेल्या होत्या. असं एक एक पान करता करता जावेद अख्तर यांनी तब्बल एकवीस पानांचं गाणं लिहिलं . यात चार पाच कडवी आणि मुक्तहस्त प्रकारातल्या काही ओळी होत्या.

सुरवातीच्या लिहिलेल्या संदेसे आते हे , हमें तडपाते हें…..या ओळींची चाल जावेद अख्तरांनी अनु मलिकच्या कुठल्यातरी ट्यूनला डोक्यात धरून त्यानुसार मीटरमध्ये लिहिल्या होत्या. ती कुठल्यातरी बॅण्डमध्ये अनु मलिकला सुचलेली ट्यून होती. त्यावर सुरवातीच्या ओळी बसल्या. पण जावेद अख्तरांनी मधल्या काही ओळी मुक्तहस्त प्रकारात लिहिलेल्या होत्या त्या ओळी होत्या ए गुजरने वाली हवा बता….

अनु मलिक आधीच घाबरून गेला होता कि इतकं मोठं गाणं कस कंपोज होईल म्हणून. त्यातही जेपी दत्ता बाहेरगावी जाणार होते म्हणून त्यांनी अनु मलिकला दोन दिवसात हि गाणी बसव म्हणून सांगितलं होतं.

जावेद अख्तरांनी जे पी दत्ताना सांगितलं कि इतक्या कमी वेळात हि गाणी तयार होणार नाही , संगीतकाराला थोडाफार वेळ द्यावा लागेल तेव्हा कुठं गाणी पूर्ण होतील. या मुद्द्यावरून जावेद अख्तर आणि जे पी दत्ता भांडत बसले.

अनु मलिकने दोघांचं भांडण सुरु होतं तोवर त्याला चटकन चाल सुचली आणि त्याने त्यांचं भांडण थांबवून

ए गुजरने वाली हवा बता….

हे मेलडीत गाऊन दाखवलं. जे पी दत्ताना चाल आवडलं. अनु मलिकने जागेवरच सगळं गाणं एका चालीत बांधलं. हे गाणं बनलं ते केवळ सात मिनिटात.

सोनू निगम आणि रुपकुमार राठोड या दिग्गज लोकांकडून गाऊन घेऊन गाणं रेकॉर्ड केलं. रेकॉर्डिंग संपली. गाण्याची कॅसेट घेऊन जावेद अख्तर अनु मलिकजवळ आले त्यांनी अनुला मिठी मारली आणि कॅसेटवर त्याचा ऑटोग्राफ मागितला.

गाण्याच्या लोकप्रियतेने चित्रपट चांगलाच गाजला, बॉक्स ऑफिसवर बॉर्डरने भरपूर गल्ला जमवला. अनु मलिकचं नाव चांगलंच गाजलं. फक्त सात मिनिटात इतकं सुंदर गाणं त्याने तयार केलं याच बऱ्याच जणांना कौतुक होतं.

अनु मलिक अलीकडच्या काळात भलेही ट्रोल होत असला तरी हे एव्हरग्रीन गाणं त्याने कंपोज केलंय यावर बऱ्याच जणांची दुमत आहे. काहींचं म्हणणं असत कि सोनू निगम अप्रतिम गायला तर काही लोकांचं म्हणणं असत कि जावेद अख्तर यांनी सुंदर शब्द लिहिले म्हणून गाणं हिट झालं, कुठल्याही प्रकारे अनु मलिकच्या संगीताचं श्रेय त्याला लोक देत नाही. पण हे गाणं मात्र त्याने सात मिनिटात करून गाण्याचं सोनं केलं आणि कायमचं लोकांच्या मनात बसलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.