द्रविडच्या आधी गायकवाडच होते ज्यांनी ६७१ मिनिटे बॅटिंग करून पाकला जेरीस आणलं होतं.

सुनील गावस्कर, कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटचा पाया रचला. या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटला सोन्याचे  दिवस आले. सुनील गावस्करानी रेकॉर्डचा पूर आणला होता.

गावस्करांबरोबरच अजून एक खेळाडू होता ज्याला गावस्करांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखलं जायचं ते होते अंशुमन गायकवाड.

अंशुमन गायकवाड यांचे वडीलसुद्धा क्रिकेटरच होते. १९५९ च्या दौऱ्यावर त्यांनी इंग्लंडविरुद्ध देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आपलं ४० टेस्टचं करियर असणारे अंशुमन गायकवाड हे बऱ्याचशा सामन्यात गावस्करांसोबत ओपनिंगला खेळायला यायचे.

आपल्या एका वेगळ्या आणि डिफेन्सिव्ह खेळीमुळे अंशुमन गायकवाडांना द ग्रेट वॉल म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे द्रविडच्याही आधी गायकवाड हे भारताचे द वॉल होते. डिफेन्सिव्ह टेक्निक काय लेव्हलचं असावं याच प्रॉपर नॉलेज हे गायकवाडांना होतं.

अंशुमन गायकवाडांना द वॉल म्हणण्याचं कारण होतं ते म्हणजे वेस्ट इंडीजसारख्या टीमच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांचे चेंडू कसे डिफेन्स करायचे याची टेक्निक त्याना होती. १९७६ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौरा केला होता. या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनच्या खेळवल्या गेलेल्या मॅचमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०३ धावांच्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला होता.

तिसऱ्या टेस्टमधली हि हार वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना चांगलीच लागली होती यावर त्यांनी बदला म्हणून बॉडिलाइन टेक्निकचा आधार घेतला. या मॅचमध्ये भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये माईक होल्डींगचा एक बॉल अंशुमन गायकवाड यांच्या थेट कानावर जाऊन आदळला आणि ते जागेवरच कोसळले. तेव्हा ना हेल्मेट होतं ना बॉल बाऊन्सिंगचे नियम होते. गायकवाडांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण त्याअगोदर त्यांनी ८१ धावांची जबरदस्त खेळी केलेली होती.    

१९८३- ८४ च्या काळात जालंधरमधल्या एका टेस्ट मॅचमध्ये अंशुमन गायकवाड यांनी पाकिस्तानविरुद्ध २०१ धावांची खेळी केली होती पण हे द्विशतक बनवायला गायकवाडांनी तब्बल ६७१ मिनिटे घेतली होती. द्विशतक बनवायला सगळ्यात जास्त वेळ घेणारा खेळाडू आणि सगळ्यात स्लो इनींगचा रेकॉर्ड अंशुमन गायकवाड यांच्या नावावर झाला होता.

४० टेस्टमॅच मध्ये अंशुमन गायकवाड यांनी १९८५ रन बनवले होते ज्यात २ शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश होता. यात २०१ धावा हा त्यांचा बेस्ट स्कोर होता. वनडेमध्ये त्यांच्या एकूण धावा या २६९ होत्या. २०६ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गायकवाड यांनी १२ हजार १३६ धावा बनवल्या होत्या. यात ३४ शतक आणि ४७ अर्धशतकांचा समावेश होता.

अंशुमन गायकवाडांनी क्रिकेटला रामराम केल्यानंतर कोचिंगमध्ये आपलं नशीब आजमावलं. १९९७-१९९९ या काळात भारतीय संघाचे हेडकोच म्हणून कार्यरत होते. जून २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाने लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.