डोनाल्ड ट्रम्पला निवडणुकी आधी रस्त्यावर उतरून हरवणारी गॅंग

डोनाल्ड तात्या यांचा निवडणुकीत पराभव झाल्यापासून अनेक लोक खुश आहेत. त्यांच्या विरोधकांना तर जग जिंकल्याचा आनंद झाला आहे. पण अमेरिकेच्या राजकारणाला फक्त थेट मतदान हा एकच पदर नाही. अनेक पातळ्यांवर अमेरिकेत ही लढाई सुरू होती .

या लढाईमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात अनेक लोक उतरले होते. यातील काही आंदोलने ही थेट रस्त्यांवर झाली होती.

गोऱ्या लोकांचे राज्य अमेरिकेत परत आलं पाहिजे आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवले पाहिजे हे ट्रम्प यांचा स्वप्न होतं.

या स्वप्नासाठी त्यांना काही लोकांशी थेट लढावं लागलं. ट्रम्प यांचे समर्थक मारामारी करण्यात मोठे वस्ताद होते. तिथल्या पांढऱ्या सत्तेला अमेरिकेत इतर वर्णाच्या लोकांविरुद्ध लढण्याचा मोठा इतिहास आहे. केकेके (KKK) नावाने ओळखली जाणारी संस्था तर काळ्या लोकांच्याविरुद्ध कित्येक वर्षांपासून अनन्वित अत्याचार करत होती. त्यामुळे निवडून आल्यानंतर ते देशाचा चेहरामोहरा हिंसेचा मार्ग वापरूनही बदलून टाकू शकतात अशी शक्यता निर्माण झाली होती.

आत्तापर्यंत या टोळ्यांशी थेट पंगा कोणीच घेतला नव्हता. त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी आधी अशा सर्व टोळ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. या टोळ्या अनेक ठिकाणी जाऊन इतर वंशाच्या लोकांना हाणामाऱ्या करत असत.

थेट रस्त्यावर उतरून राडा घालत ब्लॅक नेबरहूड असणाऱ्या भागांमध्ये त्यांनी थैमान घातले होते. भारतीय वंशाच्या आणि शीख धर्माच्या काही लोकांवरतीही या संघटना अत्याचार करत होत्या. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम ही ट्रम्प यांना निवडणुकीत हरवण्याची पूर्वतयारी होती.

आणि हे काम करणारी संस्था होती अँटीफा.

नुकताच ट्रम्प यांनी या संस्थेवर आपल्या समर्थकांना हाणामारी केल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये काही लोक “तात्याच निवडणूक जिंकले आहेत” म्हणून मोर्चे काढत आहेत.

या मोर्चावर थेट हल्ला करून ट्रम्प समर्थकांचे डोके फोडण्याचं काम अंतिफाने केलं आहे. तसेही ही संस्था गोऱ्या रंगाच्या वर्चस्ववादी लोकांना नेहमीच या पद्धतीने धडा शिकवत आली आहे.

हजारो रिपब्लिकन पक्षाचे समर्थक सध्या आपल्या घरातून बाहेर पडत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात उतरले आहेत. राजधानी वॉशिंग्टनवर मोर्चा काढत आहेत. निवडणुकीत गफला झाला असून पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.

या रॅलीमध्ये अंतिफावाल्यांचा सामना या समर्थकांशी झाला.

ट्रम्प यांच्या या रॅलीविरुद्ध उतरण्याची हिंमत इतर कोणत्याही संघटनेकडे नव्हती. पण अंतिफा ही संघटनाच अशी आहे की तिने वेळोवेळी सारख्या अनेक वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या लोकांशी थेट रस्त्यावर येऊन लढा दिला आहे.

2016 सालापासून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा या संघटनेने आपले काम वेगाने करायला सुरुवात केली.

“जिथे तुम्ही तिथे आम्ही” या न्यायाने जिकडे जिकडे ट्रम्प समर्थक गोंधळ घालतील तिथे जाऊन त्यांना फटकावण्याचं काम ही संघटना करते. 2017 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या संघटनेच्या लोकांनी बर्कले शहरांमध्ये मोठा उठाव केला होता तेथे एका संघटनेने काळ या लोकांविरुद्ध प्रक्षोभक भाषण करणाऱ्या विलो यांनापुलोस त्या माणसाला बोलावले होते त्या कार्यक्रमात अचानक अंतिफा संस्थेचे लोक जाऊन पोहोचले.

या कार्यक्रमात त्यांनी प्रचंड मोठा राडा घातला. त्यांनी स्टेजची तोडफोड केली. इमारतीच्या खिडक्या आणि इतर वस्तू मोडून टाकल्या. या कामात त्यांनी फॅसिस्ट लोकांचे तब्बल एक लाख डॉलर्स एवढं प्रचंड नुकसान केलं होतं.

या जागेत फॅसिस्ट संघटनेला परत कधीच कार्यक्रम घेता आला नाही.

या लोकांच्या विरोधात बोलताना ट्रम्प यांनी या संघटनेला डायरेक्ट शिव्या दिल्या आहेत.

“हे घाणेरडे लोक लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणत आहेत. माझ्या समर्थनार्थ रॅली काढणाऱ्या समर्थकांवर त्यांनी हल्ला केला आहे. 99 टक्के लोक घरी गेल्यानंतर केवळ तेथे उरलेल्या राष्ट्रप्रेमी म्हाताऱ्या कोताऱ्या अमेरिकन नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न या संघटनेकडून झाला आहे. तसेच वॉशिंग्टन शहराच्या मेयरबाई या सुद्धा आपलं काम करत नाहीत.”

असा आरोप त्यांनी केला आहे.

या संघटनेचं नावही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिटलरने जेव्हा जर्मनीमध्ये निवडणुका जिंकल्या तेव्हाच्या त्यांच्या पक्षाचे नाव होतं ‘नाझी’ पक्ष. याच काळामध्ये त्याने राबवलेल्या योजनांना ” फॅसीझम ” या नावाने ओळखले जाऊ लागले.

मग काही शहाण्या लोकांनी त्याकाळात जर्मनीमध्ये याच्या विरोधामध्ये एक गट बनवला.

या गटाचे काम होते हिटलरच्या पक्षाच्या काही सभा उधळून लावणे व त्याच्यामध्ये अडथळे आणणे. नाझी पक्षाची कुठेही सभा असली की या संघटनेचे कार्यकर्ते एकत्र जमत. काही तरी योजना बनवत. आणि त्या सभेमध्ये घुसून गोंधळ करून सभा उधळून लावत. या गटाचे नाव होते अँटीफॅसिस्ट ग्रुप.

Antifaschistisch नावानेच ही मंडळी ओळखली जायची.

या लोकांपासून प्रेरणा घेऊन अमेरिकेतील काही लोक प्रभावित झाले. त्यांनी याच नावाने अमेरिकेत वाढणाऱ्या धर्मवेडाच्या विरोधामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

याच संघटनेच्या नावाखाली सुरुवातीची अक्षरे वापरून त्यांनी अँटीफा नावाचा ग्रुप तयार केला.

1930 च्या काळामध्ये हिटलर आणि मुसोलिनी च्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांचे वारसदार म्हणून ही संघटना स्वतःची ओळख सांगते ती नेमकी कधी सुरू झाली याविषयी लोकांचे मतभेद आहेत. कारण ही संस्था नोंदणीकृत नाही त्याचे कामकाजही गुप्त पद्धतीने केले जाते ज्या लोकांना यात उतरायचे आहे ते आपले नाव कुणालाही कळू देत नाहीत आणि थेट रस्त्यावर लढण्यासाठी येतात. 1970 आणि 80 च्या दशकामध्ये अमेरिका आणि युरोप मध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद पुन्हा डोके वर काढू लागला होता या घटनांना उत्तर म्हणून ‘अँटीफा’ संस्थेने आपलं काम सुरू केलं.

अशाप्रकारे ही संघटना युरोपमधून अमेरिकेपर्यंत हळूहळू पसरत गेली.

सुरुवातीच्या काळात ही संघटना एकदम शिवसेने सारखी होती. काळ्या माणसांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पांढऱ्या लोकांना फोडायला सुरुवात केली. या संघटनेचे सुरुवातीचे नाव  Anti-Racist Action (ARA) असे होते.

सुरुवातीच्या काळात फक्त वर्णद्वेषाविरोधात लढणारी लोकं एकत्र घेऊन येणे एवढेच संस्थेचे काम होते. पण नंतर त्यांनी अमेरिकन राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला सुरुवात केली.

या संघटनेला सैनिकी शक्तीची राजकीय कार्यकर्ते घडवणारी संघटना म्हणून ओळखली जाते.

अतिप्रमाणात डावीकडे गेलेल्या लोकांनी या संघटनेची स्थापना केली आहे. हे लोक स्वतःला क्रांतिकारक म्हणून घेतात. अमेरिकेतील भांडवलशाही आणि तेथील सरकारच्या नेहमी विरोधात राहून काम करणारी ही संघटना समाजाच्या एका विशिष्ट गटात प्रचंड लोकप्रिय आहे.

ही लोक आपल्या विरोधकांशी गनिमी काव्याने लढत देतात. एखाद्याची सभा असली तर ती कशी उधळून लावावी याचं सविस्तर ट्रेनिंग ग्रुपच्या सदस्यांना दिलं जातं. अमेरिकेत काही अति उजवीकडे असलेल्या संघटना निरनिराळ्या सभा आणि आंदोलने आयोजित करत असतात हे लोक सुरुवातीपासून मारामाऱ्या आणि व्यवस्थेचा वापर करायचे. हे लोक हिंसेचा प्रचंड वापर करायचे.

म्हणून मग अँटीफा लोकांनी यांच्याविरुद्ध मारामारीच्या भाषेतच उत्तर देण्याला सुरुवात केली.

पेपर स्प्रे, चाकू विटा चैन आणि काठ्या या संघटनेची ऑफिशियल शस्त्रे म्हणून ओळखली जातात. या संघटनेचे सदस्य काळ्या ड्रेसमध्ये येतात. काही ठराविक वर्ष अनुभव असलेल्या लोकांनाच शस्त्रे वापरण्याची परवानगी असते.

“जर आमच्या विरोधातली लोक काठ्या वापरत असतील तर आम्ही का नाही”

असा सवाल करून या लोकांनी ही मग आपल्या हिंसेचं समर्थन केलं.

अमेरिकेतले पोलीस खातं काळ्या लोकांवर आणि सामान्य माणसावर हल्ले करण्यासाठी बदनाम आहे. अशा पोलिसांना धडा शिकवायला ही संघटना काम करते.
ट्रम्प यांच्या काळामध्ये जनतेवर प्रचंड अन्याय झाला असं या लोकांचं मत आहे. लोकांच्यावरती सरकारी निगराणी वाढली. पोलिसांचे हल्ले तसेच चांगल्या माणसांना हद्दपार करणे असे उद्योग झाले. अल्पसंख्यांक समुदायाला याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

म्हणून आम्ही या संघटनेमार्फत त्यांच्या विरोधात लढत आहोत असे त्यांनी आपल्या वेबसाईटवर लिहिलं आहे.

आता येत्या काळात ही संघटना आणि ट्रम्प तात्यांचे समर्थक यांच्यात काय होतं याच्याकडं सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.