९ टनाची पार्श्वनाथाची मूर्ती अधांतरी तरंगण्यामागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.

भारत देश ही अद्भुत चमत्कारांची भूमी आहे. आपल्या पूर्वजांनी अशा काही गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत ज्याची उत्तरं आधुनिक विज्ञानाची प्रगती होऊन ही मिळत नाहीत. असे एक आश्चर्य परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे लपले आहे.

“अंतरीक्ष पार्श्वनाथ”

जिंतूरपासून जवळच नेमगिरी नावाच एक जैन तीर्थस्थळ आहे. येथे पुराणकाळातील गुंफामध्ये लपलेल्या लेण्या आहेत. येथे सर्व मिळून सात गुहा आहेत ज्यात जैन धर्मातील वेगवेगळ्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.

यातील पाच नंबरच्या गुहेत एक सव्वा सहा फुटाची ९ टन वजनाची पार्श्वनाथ भगवानांची बैठी मूर्ती आहे. तीच वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती हवेत अधांतरी आहे. म्हणजे काय तर ही साधारण ९००० किलोची मूर्ती एका सुपारी एवढ्या दगडाच्या आधारावर विराजमान आहे. बाकी मूर्ती जमिनीपासून काही बोटे उंच आहे. जे सहज आपल्या डोळ्यांना दिसू शकते. तेथे हजर असलेले पुजारी मूर्ती खालून एक कागदाचा तुकडा फिरवून दाखवतात ज्यामुळे याची खात्री पटते.

हवेत अधांतरी असल्यामुळे या मूर्तीला अंतरीक्ष पार्श्वनाथ म्हणतात.

इथले स्थानिक लोक सांगतात की मध्यंतरी काही वर्षापूर्वी काही वैज्ञानिकांची एक टीम या मूर्तीच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आली होती. त्यांनी लोहचुंबकांचा आधार घेऊन वेगवेगळे प्रयोग केले मात्र हाती काही लागले नाही. या संशोधकांच्या टीमने देखील प्राचीन काळातील शिल्पकारांच्या कौशल्यापुढे हात टेकले. त्याचा सविस्तर रिपोर्ट चित्रलेखा या मासिकात छापून आल होत.

जिंतूरच जुनं नाव जिनपूर. या लेण्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात राष्ट्रकूट कुटुंबातील सम्राट अमोघ वर्षाच्या काळात विकसित झाल्या.

पण मध्ययुगात परकीय जेव्हा परकीय आक्रमणे सुरु झाली तेव्हा सैदुल कादरी नावाचा एक योद्धा अफगाणिस्तानातून दिल्लीला आला होता. त्याला असा आदेश देण्यात आला की, जिंतूरला जाऊन तिथं असणाऱ्या मंदिराची नासधूस करून आपला झेंडा फडकावयाचा. या आदेशानुसार कादरी अजमेरहून खुलताबाद, दौलताबादमार्गे जिंतूरला आला.

तेव्हा जिंतूरमध्ये यमराज आणि नेमीराज नावाचे भाऊ राज्य करत होते. कादरीने गुलबर्ग्याच्या राजा आलमगीरच्या फौजेच्या सहाय्याने यमराज व नेमिराजचा पराभव केला व हा प्रदेश कब्ज्यात घेतला. मंदिर आणि मुर्त्यांचे तोडफोड केली. ही घटना हिजरी सन ६३१ ची आहे.

यानंतरच्या काळात या नेमगिरीच्या सर्व लेण्या काळाच्या उदरात दडून गेल्या.

पुढे १६ व्या शतकात नांदगांव येथून श्री. वीर संघवी आपल्या कुटुंबासह जिंतूरला आले. त्यां त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडा-झुडपांनी वेढलेली होती पण मंदिराचे शिखर दिसत होते. तेव्हा त्यांनीच या मंदिराचा जीर्णोध्दार केला. तेव्हा पासून जैन समाजातील अनेक भाविक या तीर्थाटनासाठी येथे येतात.

फक्त भाविकच नाही तर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून पर्यटक हे आश्चर्य पाहण्यासाठी जिंतूरला येतात. शिवाय परदेशातल्या पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली तर इथं नित्यनेमानं येतच असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.