अंतुले म्हणाले,” लोकांची गैरसोय करून उत्पन्न खाणारा देव मी मानत नाही..”

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वाद, आरोप झाले पण अंतुलेंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुढेच सरकू शकत नाही. फक्त अठरा महिने ते मुख्यमंत्रीपद राहिले. या अठरा महिन्यात अठरा वर्षात होणार नाहीत एवढं कार्य केलं आणि आपली छाप पाडली.

कोणतंही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अल्पसंख्यांक समाजातले ए.आर.अंतुले मोठमोठ्या पदापर्यंत कसे पोहचले हे अनेकांसाठी धक्कादायक आणि प्रेरणादायी आहे.

कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं आंबेत. समुद्राची खाडी, अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेलं सुंदर गाव. इथल्याच एका गरीब मुस्लिम कुटुंबात अब्दुल रहमान अंतुले जन्मले. दारिद्र्याचे चटके सोसूनही शिक्षणाची जिद्द त्यांची कमी झाली नाही. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला अंजुमन इस्लाम शाळेत प्रवेश घेतला. कॉलेजदेखील मुंबईतच झालं.

तो काळ स्वातंत्र्यलढ्याने भारावलेला काळ होता. आबालवृद्ध स्त्री पुरुष या लढ्यात उतरले होते. गांधीजींच्या चरखा चला के आझादी लेंगेची स्वप्न प्रत्येकाला आपलीशी वाटत होती. अंतुले यापासून वेगळे नव्हते.

मुंबईत शिकत असताना आजूबाजूला होत असलेली स्थित्यंतरे ते अनुभवत होते. राजकारणात समाजकारणात काही तरी करायची खुमखुमी अगदी पहिल्यापासून होती. याची सुरवात गावातच केली.

झालं असं होतं आंबेतला सुंदर समुद्र किनारा होता मात्र तिथे बोटी लावण्यासाठी धक्का नव्हता. त्यामुळं बोट मालक तसंच नागरिकांचीही मोठी पंचाईत होत होती. यावर उपाय म्हणून अंतुले यांनी लोकांच्या कडून वर्गणी गोळा करून धक्का बांधायचं ठरवलं. गावातले मित्रमंडळ त्यांच्या मदतीला आलं.

अख्ख गावच गरीब होतं, वर्गणी देऊन देऊन किती देणार पण अंतुलेंकडे चिकाटी मोठी होती. त्यांनी प्रत्येकाकडून १ रुपया ते ५ रुपये अशी वर्गणी गोळा केली. ज्यांना पैसे देता येत नाहीत त्यांना श्रमदान करायला लावलं. हे सगळं करणारा अब्दुल रहमान अंतुले वय असेल फक्त सतरा अठरा.

त्यांच्या संघटन कौशल्यामुळ संपूर्ण गाव कामाला लागलं. स्वतः अंतुलेंनी देखील पाठीवर सिमेंटची गोणी उचलून बांधकामाच्या ठिकाणी आणली. आंबत येथे धक्का उभा राहिला. हे बांधकाम म्हणजे सार्वजनिक जीवनाची सुरवात होती.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. गाव पातळीवर, तालुका पातळीवर काम करू लागले. अत्यंत कमी वयात त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. १९५२ साली त्यांच्या कुलाबा मतदारसंघातुन जेष्ठ अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुख निवडणुकीस उभारले होते. अंतुले यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला.

चिंतामणराव देशमुख निवडून आले, पुढे देशाचे अर्थमंत्री बनले. त्यांना प्रचारावेळी काम करणारा हा चलाख तरतरीत तरुण नजरेत भरला. त्यांनी दिल्लीच्या श्रेष्ठींपर्यंत त्यांचं नाव पोहचवलं. मधल्या काळात अंतुले लंडनला आपलं उच्चशिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर झाले. अंतुले तिथे मिळणाऱ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांना लाथ मारून समाजकारण करण्यासाठी भारतात परतले.

अंतुले गावाकडे परतल्यावर त्यांनी काम करण्यास सुरवात केली. शेकापचं प्राबल्य असलेल्या या भागात त्यांनी खेडोपाडी काँग्रेसला नेऊन पोहचवलं.

१९५७ साली त्यांना थेट आमदारकीचं तिकीट मिळालं. संयुक्त महाराष्ट्र समितीचा वणवा महाराष्ट्रभर पेटलेला होता. तरुण बॅ. अंतुले यांना काँग्रेसने श्रीवर्धन मतदारसंघात उभे केले. सुरबानाना टिपणीस यांच्या विरुद्ध १० हजार मतांनी अंतुलेसाहेब ही निवडणूक हरले; पण, हरलेला उमेदवार पुढच्या पाच वर्षात जिंकलेल्या उमेदवारापेक्षा शेकडोपटीने कामे करून गेला आणि पुढच्या सलग तीन चार निवडणूक हमखास विजयी होऊ लागला.

जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कारकीर्द सुरु झाली. मग आमदार, मग राज्यमंत्री असं करत करत १९७२ साली महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पोहचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली.

मंत्रिपद स्विकारल्या स्विकारल्या त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बांधकाम खात्याचा सचिव ‘आय. ए. एस.’ आहे. या खात्याला ‘आय. ए. एस.’ हा सचिव कशाला? मुख्य अभियंता हा तांत्रिक अधिकारी आहे. तोच सचिव असला पाहिजे.

हे मनात आल्याबरोबर वसंतराव नाईक यांच्या मागे लागून अंतुले यांनी ‘बांधकाम आणि पाटबंधारे या दोन खात्यांचा सचिव मुख्य अभियंता असेल,’ हा निर्णय करून घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्रालयातल्या आय. ए. एस. लॉबीला जबरदस्त धक्का बसला पण अंतुलेंना याची पर्वा नव्हती.

आपल्या या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी कोकणात अनेक रस्ते उभारले, पूल बांधले. ज्याकाळी उड्डाणपूल म्हणजे काय हे कोणाला माहित देखील नव्हते अशा काळात म्हणजे १९७२ साली रेवदंडा-साळाव या मार्गावर पहिला उड्डाणपूल रायगडमध्ये उभा केला तो अंतुले यांनी.

असं म्हणतात की रायगड जिल्ह्यातील अनेक रस्ते कोणत्याही इंजिनियरनी नाही तर अंतुलेंनी कागदावर रेषा मारून बनवलेत. आंबेत यंत्रसामग्रीत तांत्रिकता नसताना केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर साळाव, मुरुड, गोरेगाव खाडी, भाट्याची खाडी यावरील पूल उभे राहिले.

त्यांच्यामुळे जिल्ह्यातील गावे एकमेकांना जोडली गेलीकुंडलिका नदीवर साळाव येथे बांधलेल्या पुलामुळे अलिबाग– मुरुड हे दोन तालुके जोडले गेलेसावित्री नदीवर आंबेत येथे बांधलेल्या पुलामुळे रत्नागिरी आणि रायगड हे दोन जिल्हे जोडले गेलेगोरेगाव– म्हसळा मार्गावर काळ नदीवर बांधलेल्या पुलामुळे म्हसळा व माणगाव हे दोन तालुके जोडले गेले

श्रीवर्धनच्या खाडीचा पूल तर त्यांच्यासाठी राजकीय परीक्षेचा होता. त्या ठिकाणी प्रवासी वाहतुकीकरता जो तराफा चालत होता त्याचे उत्पन्न एका पिराला जात होते. जेव्हा पूल बांधायचा निर्णय अंतुले यांनी केला, तेव्हा त्यांच्याच समाजातील मुस्लीम बांधवांनी या पुलाला विरोध करून ‘पिराचे उत्पन्न बुडेल,’ अशी तक्रार अंतुलेसाहेबांकडे केली.

त्यावर अंतुले ठामपणे म्हणाले की, ‘लोकांची गैरसोय करून उत्पन्न खाणारा देव मी मानत नाही..’ आणि कित्येकांचा विरोध पत्करून त्यांनी हा पूल उभा केला. खरे पुरोगामी विचार काय असतात हे अंतुलेंनी दाखवून दिलं. 

त्यांच्या या निर्णयाचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला पण ते डगमगले नाहीत. पुढे ते जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा आपली अनेक अर्धवट राहिलेली कामे झपाट्याने पूर्ण केली. त्यांच्या कामाच्या स्टाईलमुळे हुकूमशाहीच्या त्यांच्यावर टीका झाली पण मागे हटने हा त्यांचा स्वभावच नव्हता.

सिमेंट घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांची कारकीर्द अल्पजीवी ठरली पण एका अल्पसंख्यांक समाजातला कोकण सारख्या राजकीय प्रभाव नसलेल्या भागातून आलेला तरुण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो आणि त्याही काळात अनेक वर्षे पुसता येणार नाही असा ठसा उमटवतो हा ही एक चमत्कारच  मानला गेला होता हे नक्की. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.