फक्त एका चिठ्ठीवरून मागणी गेली, अंतुलेंनी नागपूरला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभं केलं

गेले वर्षभर झालं संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरू आहे. साध्या साध्या वैद्यकीय सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापासून आज पर्यंत आपल्या कोणत्याच सरकारने आरोग्य सुविधा मजबूत करण्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

असे काही मोजकेच राज्यकर्ते होते ज्यांनी जो काही कार्यकाळ मिळाला त्याचं जनतेची कामे करून त्याच सोनं केलं. फक्त रस्ते, पूल, धरणे बांधली नाहीत तर आरोग्य सुविधांचा देखील डोंगर उभा केला.

यातच प्रमुख नाव येतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचं.

गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी सालची. नेहमीप्रमाणे नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन भरलं होतं. अंतुले नव्यानेच मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते मागच्या काही काळापूर्वी काँग्रेस सोडून वेगळ्या पक्षात गेले होते. त्यांचं हळूहळू पुनरागमन होऊ लागलं होतं. पण अंतुलेच्या नेतृत्वाला विरोध असणारे कित्येक विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसमध्ये देखील आपल्या कुरघोडी करत होते.

या सगळयाचा सामना करत सरकार चालवण्याच शिवधनुष्य अंतुले यांनी उचलल होतं पण त्यांची खरी परीक्षा नागपूर अधिवेशनात होणार होती.

त्याकाळी शेतकरी चळवळ ऐनभरात होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेस , शरद जोशींची शेतकरी संघटना यांनी राज्यभरात अनेक आंदोलने सुरू होती.शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा ऐरणीवर होता.

याच अधिवेशनात अंतुले यांनीविरोधकांना धक्का देत झटक्यात कर्जमाफीची घोषणा केली.

अंतुलेंचा धडाका उभ्या महाराष्ट्राला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. त्याकाळी त्यांच्या इंदिरा काँग्रेसला सर्वात मोठा पाठिंबा विदर्भातल्या आमदारांचा होता. आणीबाणीनंतरच्या काळात संपूर्ण देशात पराभव झाला तरी विदर्भात इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेला जराही धक्का लागला नव्हता.

काँग्रेसच्या इथल्या तडफदार नेत्यांमध्ये होते ऍड. मधुकर किंमतकर. वेगळ्या विदर्भाची मागणी पहिल्यांदा जोरदारपणे उचलून धरणारे आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं.

ऍड. मधुकर किंमतकर यांचा जन्म 10 ऑगस्ट 1932 साली रामटेक येथे झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते नागपूरला आले.एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली सुरू केली. कॉंग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी सुरू केलेल्या मॉडेल मिलच्या कामगाराच्या चळवळीत ते उतरले. येथूनच त्यांची राजकीय कारर्कीद सुरू झाली.

इंदिरा गांधींच्या विश्वासातील नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत साठे यांच्या आग्रहामुळे त्यांना १९८० सालच्या विधानसभा निवडणुकीत रामटेक येथून तिकीट मिळालं. ते जोरदार मतांनी निवडून देखील आले.

पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री पदाचा कार्यभार मिळाला.

या आमदारकीच्या काळात विधिमंडळात विदर्भाच्या बॅकलॉगचा आवाज त्यांनी बुलंद केला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदार किंमतकर बोलायला उभे झाले की, ‘बॅकलॉग आमदार आले’ अशी टिपणी करायचे. पण त्यांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिले नाही. ते आपला मुद्दा जोरकस मांडत असत.

विदर्भाच्या अनुशेषावर बोलण्यासाठी मधुकर किंमतकर यांनी विदर्भाच्या आमदारांचा एक गट तयार केला होता.

यात बी. टी. देशमुख, नानाभाऊ एंबडवार, वामनराव चटप, सरोज काशीकर यांचा समावेश होता. एवढेच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते आमदारांची कार्यशाळा घ्यायचे.

या नेत्यांच्या प्रयत्नामुळेच विदर्भ विकासाचा कार्यक्रम तयार झाला होता. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री ए.आर.अंतुले हा कार्यक्रम वाचून दाखवत होते. वेगळ्या गडचिरोली जिल्ह्याची घोषणा त्याच वेळी करण्यात आली. विदर्भात ३० ते ४० नवीन तालुके निर्माण झाले, ८ आयटीआय सुरू झाले.

विधानसभेत मुख्यमंत्र्यांच भाषण चालू असताना ऍड. किंमतकर यांच्या लक्षात आलं की संपूर्ण विदर्भात एकही सुसज्ज रुग्णालय नाही.

मोठे ऑपरेशन अथवा कोणतीही इमर्जन्सी असली तर मुंबईसारखे महानगर गाठावे लागायचे. किंमतकर यांनी एका साध्या कागदावर आपली मागणी लिहिली आणि ती तत्कालीन आरोग्यमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याकडे दिली.

चतुर्वेदीनी तो कागद भाषण करत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ सोपवला. अंतुलेंनी क्षणभर तो कागद पाहिला आणि पुढच्या वाक्यात नागपूर येथे महाराष्ट्र शासनातर्फे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा केली.

मधुकर किंमतकर यांना देखील धक्का बसला. इतकी वर्षे भांडल्याशिवाय विदर्भाला काहीही मिळू शकत नाही असं वाटत होतं आणि एका साध्या चिठ्ठीवर काही सेकंदात हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला होता.

नुसता आश्वासन दिलं नाही तर विक्रमी वेळेत नागपूर मधते सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभं देखील राहिलं. कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, न्यूरॉसर्जरी, रेडिओ डायग्नोसिस या पासून प्रत्येक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत.

आजही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, वेल इक्विप्ड ऍडव्हान्स लॅबोरेटरी, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन यासाठी देशभरात ओळखले जाते आणि याचे श्रेय जाते अंतुलेंच्या कल्पक नेतृत्वाला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kunal shahuraje says

    महाराष्ट्र राज्य सरकार प्रत्येक गोष्टीसाठी फक्त केंद्राला दोष देत आहेत,ऑक्सिजन नाही हे नाही ते नाही,मग हे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री त्या पदावर बसून काय करत आहेत?त्यांच्या हातात इतकीही पॉवर नाही की ते ऑक्सिजन प्लांट वैगेरे तयार करू शकतील?कृपया यावर लेख लिहावा!

Leave A Reply

Your email address will not be published.