मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून हिणवलं पण त्यांच्यामुळेच उत्तरेत शिवदर्शनाचा कार्यक्रम गाजला…
मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले. धर्माने ते मुस्लीम होते. लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. राजकारणात कटकारस्थान करायचे पण ते राजकारणात टिकूनच राहिले नाहीत तर आपल्या मनगटाच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून दाखवलं.
तुमच्या लक्षात आलच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय,
बॅरिस्टर ए.आर. अंतुले.
अंतुले मुस्लीम होते. महाराष्ट्राचे पहिले आणि आजतागायतचे एकमेव मुस्लीम मुख्यमंत्री. त्यानंतर महाराष्ट्रात अंतुलेंच्या तोडीस तोड अस मुस्लीम समजातून नेतृत्व निर्माण होवू शकलं नाही. कुलाबा जिल्ह्याच नामकरण रायगड करण्याच काम देखील त्यांनीच केलं. छत्रपती शिवरायांचीभ भवानी तलवार ब्रिटनला जावून आणण्यासाठी त्यांनी व्यापक जनआंदोलन उभा केलं. तलवारीचा खरा इतिहास सापडला नाही पण भवानी तलवारीची अस्मिता तरुणांमध्ये त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण होवू शकली.
आणखी एक महत्वाचं म्हणजे बॅरिस्टर अंतुलें यांच्या प्रयत्नामुळेच शिवाजी महाराजांची ख्याती अटकेपार पोहचवण्यात देखील त्यांचा हातभार लागला आहे.
तर झालं असं १९८०-८१ मध्ये शिवाजी महाराजांची त्रिशतकी जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम झाले, त्यात पुण्याच्या राष्ट्र सेवादलाने ‘शिवदर्शन’ हा कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर करायचं ठरवलं.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेंना हा कार्यक्रम प्रचंड आवडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा देशभरात पोहचवण्यासाठी त्यांनी शिवदर्शन हा कार्यक्रम उत्तर भारतातील काही महत्त्वाच्या शहरांत महाराष्ट्र सरकार स्पॉन्सर करेल असा निर्णय घेतला. त्यासाठी इंदोर, आग्रा, चंडीगढ ही शहरे निवडण्यात आली.
गीतकार वसंत बापट आणि लोकशाहीर लीलाधर हेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिवदर्शनाचा कार्यक्रम उत्तर दिग्विजयासाठी निघाला.
सेवादल पथक प्रथम नागदा, इंदोर, आग्रा येथील कार्यक्रम उरकून चंडीगढमध्ये येईल असा कार्यक्रम ठरला. पण अगदी निघायच्या वेळी मात्र मोठेच विघ्न आले, त्यामुळे सेवादल हा कार्यक्रम करू शकेल का याविषयी शंका निर्माण झाली.
झाले असे की, डिझेलच्या किंमती अचानक वाढल्याने सेवादलाची बस आणि नाट्यप्रयोगाचा खर्च अचानक रुपये पंधरा हजार रुपये इतका वाढल्याने खर्चाचे बजेट कोडमडले. कारण महाराष्ट्र शासनाच्या स्पॉन्सरशिप फीमध्ये ते बसत नसल्याने सेवादलावर सर्वच दौरा रद्द करण्याची वेळ आल्याचे लीलाधर हेगडे यांनी कळवल्याने, काही तरी तातडीने करण्याची वेळ आली.
कार्यक्रमाची घोषणा आधीच झाल्याने तिकीटविक्री व इतर सर्व व्यवस्था सुरू झाली होती. याप्रसंगी चंडीगड कार्यक्रमाचे आयोजक रमेश आगाशे हे मूळचे सातारचे असल्यामुळे त्यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न सुरु केले.
सातारच्या राजमाता श्रीमंत सुमित्राराजे भोसले यांचे आगाशे कुटुंबीयांशी जवळचे संबंध होते.शिवरायांच्या त्रिशत सांवत्सरी योजनेसाठी नेमलेल्या समितीच्या सुमित्राराजे अध्यक्ष्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांजवळ ही अडचण मांडली. अंतुले यांनी ताबडतोब बजेट ४००० रुपयाने वाढवले व सेक्रेटरी देशमुख यांना तसे कळवले. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की होता होता वाचली.
ठरल्याप्रमाणे वसंत बापट व हेगडे यांच्या नेतृत्वात 25 कलाकारांची बस व ट्रक येऊन पोहोचले. त्यांची राहण्याची व्यवस्था प्रोफेसर कुलकर्णी यांनी टेक्निकल टीसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या होस्टेलवर केली व महामंडळाच्या कर्तबगार महिला सदस्या सौ.प्रमिला मेहेंदळे व त्यांची बहीण सौ.मांडे व सुनंदा कुलकर्णी यांनी अंगावर घेऊन चार दिवस श्री.मेहेंदळे, चीफ इंजिनियर यांच्या बंगल्याच्या लॉजवर बसून त्यांना जेऊ घातले.
ठरल्या दिवशी शिवदर्शनचा बहारदार प्रयोग चंडीगढमध्ये खूप गाजला. कार्यक्रमाला मूळचे साताऱ्याचे, हरियाणाचे राज्यपाल गणपतराव तपासे उपस्थित होते. त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला की, मध्ये एक दिवस सोडून तोच प्रयोग हरियाणा सांस्कृतिक विभागामध्ये पुन्हा होणार असल्याचे जाहीर केले.
पुढचा दिवस रिकामा असल्याने दुपारचे भोजन हरियाणा राजभवनावर होते.
कार्यक्रमातील सर्व मुलेमुली यांच्यासाठी आयोजित केलेलं भोजन उत्तम होते. बापटांना तपासेंनी आपल्याबरोबर जेवायला आत नेले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये एकत्र असल्याने त्यांचा मोकळेपणाने संवाद झाला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हरियाणातर्फे पुन्हा प्रयोग झाला. प्रयोगाच्या शेवटी तपास्यांच्या सुनेने जिजाबाईंचा रोल करणाऱ्या महिलांची महाराष्ट्रीय पद्धतीने ओटी भरून व साडीचोळी देऊन वाकून नमस्कार केला. ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने तपास्यांनी स्थानिक प्रेक्षकांना सांगितले.
मंडळाचे एक चाहते दिल्लीमधून आले होते. त्यांना हा प्रयोग इतका आवडला की, परतीच्या प्रवासात त्यांचा आणखी एक प्रयोग मी ठरवतो असे सांगून पुढे गेले. दिल्लीमध्ये दोन दिवसांच्या नोटिसीवर हॉल, थिएटर कठीण असूनही श्री.गुप्तांनी सर्व खटपट करून गुजराती समाजाचा हॉल मिळवल्याने आमची दोन-तीन दिवसांची सोबत संपली. दोन जादा प्रयोग मिळाल्याने सेवादलाचा फायदाच झाला. चंडीगढ महाराष्ट्र मंडळालाही जाहिरातींमधून ७०००० रुपयांची कमाई झाली. त्याचा उपयोग मंडळाची वास्तू उभारण्यात झाला.
संदर्भ-साधना मासिक
हे हि वाच भिडू :
- साडे तीन तास पोवाडे गात राहिले आणि त्यातून थेट संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा केला.
- पंतप्रधानांशी नडणारे अत्रे एकाच व्यक्तीपुढे शांत व्हायचे. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- आजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका.