मराठीच काय भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान बनायचं स्वप्न अंतुले बघत होते..

एककाळ होता अहद तंजावर तहद पेशावर मराठा साम्राज्य पसरलं होतं. महादजी शिंदेसारखा शूर योद्धा मुघल बादशाहला अंकित करून भारताचा कारभार हाकायचा. मराठी माणसाची दहशत इंग्रजांपर्यंत पसरली होती. मात्र पुढच्या पाय ओढण्याच्या राजकारणात मराठी व्यक्ती मागे पडत गेली.

लोकमान्य टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशभरात आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं होतं. पण गांधीजी आले त्यानंतर मराठी नेतृत्व काँग्रेस विरोधात अडकलं आणि मागे पडत गेलं.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र मागेच राहिले.

सर्वात जास्त पंतप्रधान पदाच्या खुर्चीच्या जवळ जाऊन पोहचले ते फक्त स्व. यशवंतराव चव्हाण. पण त्यांनी देखील फक्त चांगुलपणापायी दोन वेळा ती संधी सोडली. 

बाकी आज देखील शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांची नावे भावी मराठी पंतप्रधान म्हणून होत असते. पण काही ना काही कारणामुळे ते या खुर्चीवर बसू शकले नाहीत. आज तर खुद्द नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं की,

“महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला पाहिजे, असं मला अजिबात एक टक्काही वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती प्रधानमंत्री झाला पाहिजे.”

असं म्हणतात की क्षमता आहे पण पुरेशी महत्वाकांक्षा नसल्यामुळे नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागे पडले आहेत. त्यांना पंतप्रधानपदापेक्षा बांधकाम आणि रस्ते बांधणीच मंत्रालयचं बरं वाटतं.

पण महाराष्ट्रात एक नेता होता ज्याची महत्वाकांक्षा एवढी प्रचंड होती कि फक्त पहिला मराठीच नाही तर भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान बनायचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं.

नाव अब्दुल रहमान अंतुले

कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंबेत गावचे. एका गरीब मुस्लिम कुटुंबात अब्दुल रहमान अंतुले जन्मले. दारिद्र्याचे चटके सोसूनही शिक्षणाची जिद्द त्यांची कमी झाली नाही. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला अंजुमन इस्लाम शाळेत प्रवेश घेतला. कॉलेजदेखील मुंबईतच झालं.

तो काळ स्वातंत्र्यलढ्याने भारावलेला काळ होता. अंतुलेंनी देखील यात उडी घेतली. कॉलेजमध्ये असतानाच गावात लोकवर्गणीतून छोटीमोठी कामे करत भावी नेतेपदाची पायाभरणी केली.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. गाव पातळीवर, तालुका पातळीवर काम करू लागले. अत्यंत कमी वयात त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता.

पुढे बॅरिस्टर व्हायचं या जिद्दीने अब्दुल रहमान अंतुले इंग्लंडला गेले पण तिथलं शिक्षण पूर्ण करता करता आपलं राजकीय चळवळीचं काम चालूच ठेवलं. 

लंडनमध्ये असताना गांधीजींच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असलेल्या एका पुस्तकाच प्रकाशन झालं, याचा विरोध म्हणून अंतुले यांनी मोठं आंदोलन उभारलं. या आंदोलनाची चर्चा भारतापर्यंत जाऊन पोहचली. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची सुपुत्री इंदिरा गांधी लंडनला आल्या होत्या तेव्हा त्यांनी अंतुले यांची भेट घेतली होती.

राजकीय दबदबा मोठा करूनच अंतुले भारतात परत आले आणि फक्त २७-२८ वर्षाचे असताना थेट काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीवर निवडले गेले. दिल्लीमध्ये कष्टाने, आपल्या चातुर्याने त्यांनी खास स्थान निर्माण केलं.

याच बक्षीस म्हणून त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांनी केलेल्या मेहनतीला फळ आले. १९६२ला अंतुले विधानसभेवर निवडून आले. सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यावर वसंतराव नाईकांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं.

पुढे अंतुले राज्यसभेच्या मार्फत राष्ट्रीय राजकारणात गेले. आणीबाणी नंतर जेव्हा काँग्रेस फुटली, तेव्हा इंदिरा गांधी यांच्या पाठीशी राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये अंतुलेंचा समावेश होत होता. त्यांच्याच घराला ऑफिस बनवून इंदिरा काँग्रेस सुरु झाली. संजय गांधींचे ते खास बनले.

पुढे जनता पक्षाचे सरकार उलथवून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. या अखंड निष्ठेचं फळ म्हणून अंतुलेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. अल्प काळात त्यांनी ते गाजवलं देखील. त्यांचा झपाटा प्रचंड होता. त्यांनी सुरु केलेली संजय गांधी निराधार योजना असो किंवा कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड करणे असो, अंतुलेंच्या निर्णयक्षमतेची चर्चा देशपातळी वर होत होती.

एका फटक्यात कर्जमाफीचा तडकफडकी निर्णय घेणारा हा मुख्यमंत्री पुढे मात्र एका मोठ्या घोटाळ्यात अडकला.  

इंडियन एक्स्प्रेसच्या अरुण शौरी यांनी एक बातमी लावून संपूर्ण देशावर बॉम्ब टाकला होता. यात आरोप होते की मुख्यमंत्री अंतुले यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ स्थापन केली,  याच्या मार्फत अनेक कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात सिमेंटचा पुरवठा करण्याच्या बदल्यात निधी गोळा केला.

हाच तो कुप्रसिद्ध सिमेंट घोटाळा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकतो ही पहिलीच घटना होती. इंदिरा गांधींनी अंतुलेंना राजीनामा द्यायला लावला. अंतुलेंच्या राजकीय कारकिर्दीवर लगाम बसला.

अंतुलेवरचा आरोप सिद्ध झाला नव्हता. पण तरीही इंदिरा गांधींनी जर ठरवलं असतं तर अंतुलेंच्या खुर्चीला धक्का देखील बसला नसता. पण एक बातमी अंतुलेंचा घात करून गेली. ही बातमी अरुण शौरींची नव्हती तर भारताबाहेरून आली होती.

झालं असं होतं की मुख्यमंत्री असताना अंतुलेंची प्रसिद्धी इतकी प्रचंड वाढली होती कि त्यांना भारताचा हारून अल रशीद म्हणून ओळखलं जायचं. हारून अल रशीद हा सातव्या शतकातला बगदादचा खलिफा होता. तो वेषांतर करून फिरायचा आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचा. अंतुले देखील मुंबईत हेच करायचे.

यातूनच त्यांची ख्याती अरब देशांमध्ये जाऊन पोहचली. जेष्ठ पत्रकार शां.मं. गोठोसकर यांनी आपल्या एका लेखात एक आठवण सांगितली आहे. 

ऐंशीच्या दशकात First Muslim Prospective Prime Minisger of India अशा मथळ्याची पत्रके पश्चिम आशियातील मुस्लिम देशांमध्ये वाटण्यात आली होती. अंतुले हेच ते उमेदवार होते.

अंतुलेंची अरब देशांमध्ये राजकीय नेत्यांशी ओळखी होत्या. त्यांनी कमी  प्रगती केली होती कि त्यांना भारताच्या पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली होती. त्यांचे राजकीय गुरु संजय गांधी यांचं निधन झाल्यावर काँग्रेसमध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती. राजीव गांधी अननुभवी होते. इंदिरा गांधींच्या नंतर संजय गांधी गटाचे नेतृत्व हाती घेऊन भारताचा पंतप्रधान बनायची तयारी अंतुले यांनी सुरु केली होती असं म्हणतात.

इंदिरा गांधी यांना त्या अरब देशांमध्ये छापून आलेल्या बातमीची प्रत मिळाली. अंतुलेंच्या विरोधकांनी तशी व्यवस्थाच केली होती. सिमेंट घोटाळ्याचे आरोप होत असूनही बिनधास्त असलेल्या अंतुलेंचा घडा भरला. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल थेट राष्ट्रपतींना अंतुलेंच्या कारभाराबद्दल अहवाल पाठवत होते. राज्यातले इतर नेते देखील अंतुलेशही वर वैतागले होते. त्यांनी इंदिरा गांधींकडे तक्रारी चालूच ठेवल्या होत्या.

अंतुलेंची महत्वाकांक्षा जड जायला नको म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना तडकापडकी खुर्चीतून पाय उतार व्हायला सांगितलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.