अंतुलेंमुळे कॉंग्रेस पक्षाला एकदा माफी मागावी लागली होती.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत १० दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यात  आपण अनेक शूरवीर अधिकारी गमावले.  त्यात पोलिस दलातील अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे असे धडाडीचे अधिकारी शहिद झाले होते. या हल्ल्यामध्ये आपलं भरून न निघणारं नुकसान झालं.  

या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. सामजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. संपूर्ण देश दुखात होता आणि इकडे राजकारणी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत होते. 

यातलंच एक म्हणजे तत्कालीन अल्पसंख्याक व्यवहार मंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी अंतुले याचं एक  वादग्रस्त वक्तव्य हे राजकारण तापवणारं ठरलं होतं.

महाराष्ट्र एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या हौतात्म्यावर अंतुले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अंतुले यांनी करकरे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी केली होती. थोडक्यात हेमंत करकरे यांच्या निधनावर त्यांनी अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या होत्या. 

अंतुले यांनी पत्रकारांशी बोलताना अंतुले यांनी सांगितलं होतं की, “२६ नोव्हेंबरला करकरे यांच्या मृत्यूमागे दहशतवाद कारणीभूत असल्याचा मला संशय आहे. तसेच हे प्रकरण मालेगाव स्फोटाच्या तपासाशीही संबंधित असू शकते”. 

अंतुले यांनी म्हणलं होतं की, दहशतवाद्यांनी करकरे यांना मारण्याचे कोणतेही असे ठोस कारण नाही. करकरे हे दहशतवादाचे बळी होते की त्यांच्या हत्येमागे अन्य काही कारणे होती हे मला माहीत नाही. करकरे यांना एका प्रकरणाच्या तपासादरम्यान दहशतवादी कारवायांमध्ये गैर-मुस्लिमांचा सहभाग असल्याचे आढळून आलं होतं. आतापर्यंत दहशतवादाच्या मुळापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येकाला नेहमीच टार्गेट केले जात आहे.

अंतुले यांनी असंही सूचक वक्तव्य केलेलं की, आपल्या डोळ्यांसमोर जे घडते त्यापेक्षाही त्यामागे बऱ्याच मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात.

मग काय अंतुले यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वातावरण तापलं. या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. तसेच अंतुले यांच्या या सर्व वक्तव्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली होती.

 अंतुले एवढ्याच वक्तव्यावर थांबले नव्हते तर त्यांनी असं देखील भाष्य केलं होतं कि,

अंतुले यांनी माध्यमांना बोलतांना सांगितले होते की, त्या हल्ल्यात जे दहशतवादी होते त्यांना समोर कोण आहे हे माहीत नव्हतं  पण तरीही करकरे यांना मारण्याचे त्यांच्याकडे काहीच कारण नव्हते. आपण असं मानू कि, ते दहशतवादी हिंदूविरोधी असतील तर मग सीएसटी स्टेशनवर मरण पावलेल्यांमध्ये ४० मुस्लिम कसे काय होते? समोर कोण आहे हे दहशतवाद्यांना जरी दिसत नव्हते तरी पण करकरे हा त्यांना माहीत असलेला माणूस होता. ते दहशतवादी सर्व तयारीनिशी आले होते. त्यांना सर्व काही माहीत असून देखील त्यांनी करकरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.

अंतुले यांच्या या वक्तव्यामुळे दहशतवादी अजमल कसाबच्या कबुलीजबाबावरही प्रश्न उपस्थित झाला होता.

कारण कसाबने करकरे आणि त्याच्या साथीदारांनी करकरे यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली होती पण कसाबचा साथीदार इस्माईलने करकरे यांना त्याच्या AK47 ने टार्गेट केलं होतं. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात करकरेंसोबत एसीपी अशोक कामटे आणि इन्स्पेक्टर विजय साळसकर हेही शहीद झाले होते.

करकरे यांच्यावर केलेल्या या वक्तव्याचा विरोधकांनी मुद्दा बनवला होता. संसदेतील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला होता, करकरे यांची हत्या दहशतवाद्यांनी केल्याचे स्वतः पंतप्रधानांनी सांगितले असताना, त्यांचा कोणताही मंत्री असा प्रश्न कसा उपस्थित करू शकतो. याचं पंतप्रधानांनी उत्तर द्यावे असं त्यांनी म्हणलं होतं. 

तर भाजपच्या नेत्यांनी तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी देखील   “हे वक्तव्य घृणास्पद आणि अत्यंत बेजबाबदार आहे. पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.” निषेध केला होता.

समाजवादी पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस अमर सिंह यांनीही अंतुले यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले होते, करकरे यांच्या हौतात्म्यावर प्रश्न उपस्थित करणे पोलिस दलाचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. मानवी हक्कांचे रक्षण झाले पाहिजे आणि चुकीची कारवाई झाल्यास निषेध व्हायला हवा. बाटला हाऊस चकमकीनंतर मुंबई दुर्घटनेवर बोलण्याचे धाडस माझ्यात झाले नाही. अशा मुद्द्यांवर राजकारण होता कामा नये, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

प्रचंड प्रमाणात विरोध झाल्यानंतर अंतुले यांनी सभागृहात स्पष्ट केले होतं कि, हेमंत करकरे यांची हत्या दहशतवाद्यांनी केली नाही, असे मी म्हणतच नाही, तर त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नेमकी अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे हेमंत करकरे यांच्यासह तीन उच्चपदस्थ अधिकारी प्रोटोकॉलच्या विरोधात असताना एकाच वाहनातून एकाच ठिकाणी पोहोचले?  ताज आणि ओबेरॉय हॉटेलवर हल्ला झाला असताना तिन्ही अधिकाऱ्यांना कामा हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगणारे कोण होते? हा आदेश कोणत्या परिस्थितीत देण्यात आला याची चौकशी झाली पाहिजे.

पण अंतुले यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे ते काँग्रेसपासून दुरावले होते. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस अंतुले यांच्या विधानाशी आम्ही कुणीही सहमत नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते” असं म्हणत पक्षाने अंग काढून घेतलं होतं तरी देखील अंतुलेंमुळे कॉंग्रेस पक्षाला एकदा माफी मागावी लागली होती.

तत्कालीन संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेत याबाबत पक्षाची भूमिका मंडळी होती.  भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी अनेक वेळा तहकूब करण्यास भाग पाडल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली होती.  तर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत  “श्री करकरे किंवा इतरांना संपवण्याचा कट होता या संशयामध्ये काहीही तथ्य नाही या निष्कर्षापर्यंत तपासकर्ते पोहोचले आहेत.” असं म्हणत अंतुले यांच्या भूमिकेवर पक्षाने विश्वास दाखवला नव्हता.

 हे हि वाच भिडू :

  •  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.