एका इंजिनिअरने सगळ्या बॉलिवूडला दाखवून दिलं, सामाजिक प्रश्नांवर कसा सिनेमा बनवतात…

इंजिनिअर नुसते आळशी असतात हा सामान्य पूर्वग्रह. त्यात मेकॅनिकलवाला तर ओवाळून टाकलेला. चित्रपट आणि त्यांचा संबंध फक्त हॉस्टेलवर एका लॅपटॉपवर अख्ख्या हॉस्टेल लॉबीनं बघण्यापुरताच, पण अशाच एका मेकॅनिकल इंजिनिअरनं सगळ्या बॉलीवूडला दाखवून दिलं की, सामाजिक प्रश्नांवर कसा सिनेमा बनवतात ? त्याचं नाव अनुभव सिन्हा.

लॉकडाऊन ही एकविसाव्या शतकातली एक निर्णायक घटना होती. शुकशुकाट असलेल्या रस्त्याच्याकडेने हजारो मैल चालत निघालेले स्थलांतरित मजूर आपण डोळ्याने पहिले. त्यावर आता अनुभव सिन्हा सिनेमा घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे ‘भीड’. आता अनुभव सिन्हाचा पिच्चर येणार आणि दंगा नाही होणार असं असतंय होय ? दंगा सुरु झालाच की…

‘भीड’ मध्ये अनुभव सिन्हानं लॉकडाऊनमध्ये मजुरांचे झालेले हाल, त्रास याची तुलना स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीशी केली आहे. हा मुद्दा कितीतरी समीक्षकांना पटला नाही. त्यांनी अनुभव सिन्हावर राईचा पर्वत केल्याचा आरोप लावला. आता काय खरं आणि काय खोटं हे चित्रपट आल्यावरच कळेल.

‘भीड’मध्ये राजकुमार राव, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा आणि पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका असतील. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्रपट हा कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आला आहे. आपल्या शिंडलर्स लिस्टसारखा.

पण समीक्षकांनी केलेल्या टीकेमुळं वादाला सुरुवात झाली, खरंतर अशा वादांमध्ये अडकण्याची अनुभव सिन्हाची पहिलीच वेळ नाहीये. 

मूळचा वाराणसीचा, अगदी हिंदू धार्मिक वातावरणात वाढलेला हा माणूस. त्यानं मेकॅनिकल इंजिनीरींग  केलं ते थेट अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून. अनुभव सांगतो की, ‘अलिगढमध्ये शिकत असताना  विविध धर्मांचे आणि विचारांचे मित्र मैत्रिणी असल्यामुळे मला खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचा अनुभव आला. त्यातूनच माझी विचारशक्ती चौफेर झाली.’

याचंच प्रतिबिंब आपल्याला मुल्क, आर्टिकल १५, अनेक, थप्पड, अशा देशापुढच्या सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणाऱ्या अनुभवच्या सिनेमांमध्ये दिसलं.

सिन्हानं मुल्कमध्ये एका भारतीय मुसलमान बापाचं  आपली ओळख, आपला देश आणि त्याच्यावरचं प्रेम दाखवलंय. तर थप्पडमध्ये कौटुंबिक हिंसाचार त्यातही उच्चभ्रू आणि शिक्षित कुटुंबात होणाऱ्या हिंसाचारावर भाष्य केलंय. आर्टिकल १५ मध्ये जात, लिंग याभोवती फिरणारी सामंती हिंसा हा विषय त्यानं हाताळला. अनेक मध्ये भारतीय लोकं ईशान्य भारतातल्या आपल्याच बांधवाना कसं दुजे मानतात हे दाखवलंय.

यामुळे येणारा भीड हा सुद्धा तेवढाच संवेदनशील आणि भावणारा असेल, अशी चर्चा आहे. सुरवातीचे काही अपवाद वगळता अनुभव सिन्हा कायमच त्याच्या चित्रपटात बेधडक भूमिका घेत आलाय. 

पण त्याच्या या बेधडक चित्रपट बनवण्याचा त्याला त्रासही  झालाय. त्याच्यावर कायम आरोप केला जातो की, तो नेहमी उजव्या विचारसरणीच्या विरोधात चित्रपट बनवतो. त्याच बरोबर आर्टिकल १५ च्या वेळी आंबेडकरी चळवळीतून बॉलीवूडमध्ये कायम सवर्ण तारणहारच का दाखवला जातो ? असा प्रश्न सिन्हाला करण्यात आला.

थप्पडच्या वेळी अनुभव म्हटलेला की, स्त्रियाच त्यांच्यावरच्या अत्याचारांचे सामान्यीकरण करतात आणि एकाच हलकल्लोळ माजला. 

त्यामुळे अनुभव सिन्हाला असले राडे काही नवीन नाहीत हे नक्की.

बॉलिवूडवर कोणतेही सामाजिक आशय असलेले चित्रपट न बनवता तेच तेच मसाला आणि धंदेवाईक चित्रपट बनवण्याचा आरोप केला जातो. यात अनुभव सिन्हासारखा चित्रपट दिग्दर्शक निराळाच, आता हे निराळेपण कदाचित त्याच्या इंजिनिअर आणि त्यात पण मेकॅनिकल इंजिनिअर असण्यामुळं आलंय का ? हा तेवढा भारी प्रश्न आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.