अन्नू मलिक म्हणाला होता, “ये लडका स्टार हैं इसे मुंबई लेके आऐं” पण…

एक काळ होता सिनेमाच्या मुख्य हिरोचा आवाज म्हणून त्याला ओळखायचे. आपण पाहिलेला शेवटचा परिपूर्ण सिंगर. तर या सिंगर ने बऱ्याच मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलं. यात लिजेंडरी आर. डी. बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रेहमान पर्यंत प्रत्येकाने त्याचा जादुई आवाज आपल्या गाण्यांमध्ये वापरलाय. रफीशी तुलना केली जाणाऱ्या सोनूने आपला काळ खरोखर गाजवला. पण त्याची जोडी खऱ्या अर्थाने जमली ती अन्नू मलिक बरोबर.

असं म्हणतात की,

आज सोनू निगम जे काही आहे त्या मागे अन्नू मलिकचा मोठा हात आहे. दोघांच्या या प्रवासाचे तीन टप्पे आहेत.

कट वन. दिल्ली !!

तेव्हा दिल्लीमध्ये आगम मलिक नावाचे एक सिंगर खूप प्रसिद्ध होते. ते वेगवेगळ्या शोजमध्ये रफीच्या आवाजात गाणी गायचे. एकदा असच गाता गाता त्यांचा छोटा मुलगा सोनू देखील हट्टाने स्टेजवर आला आणि त्याने गाण गायला सुरु केलं. लोकं म्हणाली पोरग बापापेक्षा भारी गातंय. तिथून छोटा सोनू निगम स्टेज शो करू लागला. वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेऊ लागला.

अशीच एक स्पर्धा होती. या स्पर्धेचा जज्ज होता अन्नू मलिक. तो तो पर्यंत मोठा संगीतकार झाला होता. तो येणार म्हणून खूप गर्दी होती. शेकडो मूले येऊन गाऊन गेली. अन्नूची राहून राहून नजर एका हात प्लास्टरमध्ये गुंडाळलेल्या एका छोट्या मुलावर जात होती. त्या मुलाने जेव्हा गायलं तेव्हा अन्नू आपल्या स्टाईलमध्ये उठून ओरडला,

“ये अगला स्टार है”

तो मुलगा सोनू निगम होता. त्या स्पर्धेच विजेतेपद ऑफकोर्स सोनू निगमला मिळालं. त्याचे काका जेव्हा त्याला स्टेजच्या मागे अन्नू मलिकला भेटवायला घेऊन गेले तेव्हा अन्नू त्यांना आणखी एकदा म्हणाला,

“ये लडका तो स्टार है. कुछ साल बाद इसे बॉम्बे लेके आईये. मै इसे सुपरस्टार बनाऊगा”

खरोखर सोनू निगम हा दहाव्या बाराव्या वर्षी दिल्लीमध्ये स्टार सिंगर झाला होता. त्याचे स्टेज शो हाऊसफुल असायचे. आपले शाळेचे दप्तर सांभाळत आलेला हा मुलगा आपल्या आवाजाने पब्लिकला वेडं करून सोडत होता.

कट टू. मुंबई.

अन्नू मलिकने सांगितल्याप्रमाणे खरोखर सोनू निगम काही वर्षांनी मुंबईला आला. सतरा अठरा वर्षाचा असेल. एवढ्या वर्षात त्याने गाण्याचे कोणतेही प्रॉपर शिक्षण घेतले नव्हते. मुंबईला येण्यापूर्वी काही महिने एका उस्तादांच्याकडे दोन चार महिने शिकला होता. यात फक्त काही रागदारींची ओळख या पलीकडे काही जास्त शिकायला मिळालं नव्हता.

मुबईत आल्यावर त्याला कळाल आपण कोणच नाहीय. या गावात कोणीच कोणाच नसतं. त्याचा स्ट्रगल सुरु झाला.  वडिलासोबत रोज वेगवेगळ्या स्टुडियोचे चक्कर काढायचे. बऱ्याच ठिकाणी वॉचमनचं त्यांना शिव्या घालून हाकलून द्यायचा. एवढा अपमान या दोघांनीही कधी पाहिला नव्हता. पण मुंबईने त्यांना सगळ शिकवलं.

अशातच सोनूला ब्रेक मिळाला. आर.डी.बर्मन यांच्या आसमान के पार मध्ये त्याचं पहिलं गाण रिलीज झालं. खर तर सोनूनं या सिनेमाच टायटल सॉंग सुद्धा गायलं होतं. पण नंतर ते काढून टाकलं गेलं आणि त्याच्या जागी बालसुब्रमण्यम यांना गायला लावलं. असले दिवस बघत परिस्थितीशी लढा देत सोनू निगम फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून होता.

अशातच एक दिवस त्याला आपला अन्नू मलिक आठवला ज्याने त्याला फिल्ममध्ये ब्रेक देतो असं सांगितलेलं.

अन्नू तेव्हा आपल्या करीयरच्या टॉपला होता. बरेच सिनेमे चालू होते. इंडस्ट्रीमधल्या सर्वोत्तम गायकांबरोबर तो काम करत होता. अशात एक दिवस हा मुलगा येतो आणि सांगतो की मला तुम्ही वचन दिलय की ब्रेक देतो. अन्नूने आधी तर त्याला वेड्यात काढले. पण खूप प्रयत्नाने सोनूने त्याला आपल्याला एक गाण गाऊ देण्यासाठी तयार केलं.

सिनेमा होता खुद्दार. गोविंदा हिरो होता. रेकोर्डिंग रूममध्ये गाण्याची प्रॅक्टीस सुरु होती. गाण्याचे बोल होते, खत लिखना हमे खत लिखना. सोनू गाण्याचा प्रयत्न करत होता पण काही केल्या अन्नू मलिकला ते पसंत पडत नव्हतं आणि अन्नूला काय हवाय ते सोनुला कळत नव्हतं.

आधीच शोर्ट टेम्पर्ड असणारा अन्नू मलिक प्रचंड खवळला आणि म्हणाला,

“अबे $%## हजाम बनने के लिये आया है या सिंगर बनने के लिये आया है?”

सोनूला प्रचंड मोठा धक्का बसला. अख्ख्या स्टुडियोसमोर एवढा मोठा अपमान, शिव्या? कधीच एवढ्या शिव्या त्याने ऐकल्या नव्हत्या. कसबस रडू आवरत आवंढा गिळत त्याने ते गाण निभावून नेलं. घरी गेल्यावर मात्र तो प्रचंड रडला. ज्या आपल्या गाण्याचा, आपल्या टॅलेंटचा त्याला गर्व होता ते सगळ एकाक्षणात चकणाचूर झालेलं.

सगळ्यात जास्त राग अन्नूचा आला होता. दिल्लीतल्या त्या स्पर्धेतला अन्नू मलिक आणि मुंबईतल्या त्या स्टुडिओ मधला अन्नू मलिक यात जमीन अस्मानाचा अंतर होतं.

सोनूने त्या दिवशी मनाशी काही तरी ठरवलं. रोज जगभरातल्या गायकांची गाणी काढून ऐकू लागला. रफी, किशोर, मन्ना डे कशा हरकती घेतात, कोणत्या अभिनेत्याबरोबर गायचं असेल तर आवाजात कोणते बदल करतात याचा एकलव्यासारखा अभ्यास चालू केला.

अशातच एक दिवस त्याच्यावर टि-सिरीजच्या गुलशन कुमार यांची नजर पडली. कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून आणणारा हा जोहरी होता. तो त्यावेळी आपल्या भावाला किशनकुमारला हिरो म्हणून लॉंच करण्यासाठी सिनेमा बनवत होता. पिक्चरचं नाव होतं बेवफा सनम. यात सोनुला गाण्याची संधी मिळाली. सोनूने त्याच सोनं केलं. सिनेमा फ्लॉप झाला. किशनकुमारला कोणी बघितलं पण नाही. पण एक गाण सुपरहिट झालं होतं,

“अच्छा सिला दिया तुने मैने प्यार का. यार ने ही लुट लिया घर यार का”

आजही ब्रेकअप झालेली नाईनटीज किड्स हे गाण ऐकून आपला दर्द डब्बल करतात. सोनू निगम नावाचा सिंगर यामुळे लोकांच्या चर्चेत आला. त्यालाही मोठे स्टार असलेले चांगले सिनेमे मिळू लागले. पण अच्छा सिला मुळे एक वाईट झालं की त्याला फक्त दर्दी गाणे मिळू लागले. लोक म्हणायचे हा पुढचा रफी आहे. हा लोकांना तसच रडवणार.

सोनूला आपली तुलना रफीबरोबर केल्यामुळे भारी तर वाटायचं पण आपण फक्त सॅड गाणी गाणारे नाही आपण रफी सारखेच व्ह्रॅर्साटाईल देखील आहोत हे सुद्धा त्याला सिद्ध करायचं होतं. अशातच त्याला सारेगामा नावाचा म्युजिक शो देखील मिळाला. त्याचा होस्ट म्हणून तो घराघरात पोहचला.

कट थ्री. १९९७

जेपी दत्ता एक वॉरफिल्म बनवत होते. बॉर्डर. संगीतकार होता अन्नू मलिक. या सिनेमामध्ये एक सिच्युएशन होती जिथे युद्धभूमीवर असलेल्या जवानांना घरातून पत्र आलेली असतात. ते वाचताना त्यांची जी भावना झालेली असते, घरची आठवण, घुसमट वगैरे सगळ त्या गाण्यात होतं.

अन्नू मलिकने ठरवलेलं की हे गाण रूप कुमार राठोड म्हणणार. गाण्याचे बोल होते,

“संदेसे आते है”

गाण्याच रेकोर्डिंग सुरु होतं. तिथे सोनू निगमसुद्धा एका वेगळ्या गाण्यासाठी आला होता. रूप कुमार राठोडनी जबरदस्त गायलं होता. सगळेजण वाहवा करत होते. अन्नू टेक फायनल करणार इतक्यात त्याच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. त्याने तिथे उभ्या असलेल्या सोनू निगमच्या हातात एक कागद दिला आणि सांगितलं,

“आत जाऊन या ओळी गा.”

जे.पी. दत्ता पासून सगळे जण शॉक झाले. गाण तर भारी झालय आता सोनूला आणखी का गायला लावतोय हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता. अन्नू मलिक आपल्या स्टुडियोचा राजा असतो त्याला कोण काय विचारणार. सगळे गप्प राहिले. सोनूने ते गाण गायलं. ते ऐकून मात्र अख्ख स्टुडियो स्तब्ध झालं. सोनूने ते गाण कोणालाही अपेक्षा नव्हती एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं.

सुपरस्टार सोनू निगमचा जन्म झाला होता.

अन्नू मलिक बरोबर सोनू ने प्रचंड गाणी गायली. इंडियन आयडॉलचे एकत्र जज बनले. दोघ जीवाभावाचे दोस्त झाले. एकमेकांशी भांडणे देखील केली. सोनू कायम अन्नू मलिकची  नक्कल करत असतो. असं म्हणतात की स्वतः अन्नू मलिक गातो त्यापेक्षा सोनू त्याची भारी नक्कल करतो. आणि चिडका अन्नू कसनुस हसत ते सहन करतो.

हे दोघांच टॉम आणि जेरीच रिलेशन आजही चालू आहे. आता या दोघांचाही एरा संपला. आता उरल्या आहेत त्या आठवणी.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.