आजही अनुपम खेरला प्रत्येक सिनेमाच्या मानधनातून काही वाटा महेश भट्टला द्यावा लागतो

बॉलिवुडमध्ये परेश रावल आणि अनुपम खेर हे असे दोन लोकप्रिय कलाकार आहेत, जे कोणत्याही भूमिकेमध्ये एकदम चपखल बसतात. अनुपम खेर यांच्याविषयी सांगायचं झालं तर.. ‘अ वेनस्डे’ सिनेमात ते कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी उत्कृष्टपणे रंगवतात. तर दुसरीकडे ‘खोसला का घोसला’ सिनेमात परिस्थितीने पिचलेला सामान्य माणूस सुद्धा ते खुबीने साकारतात.

अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका सुद्धा त्यांनी केल्या आहेत. भूमिका कोणतीही असो, अनुपम खेर सारख्या कसलेल्या कलाकाराचा अभिनय पाहणं ही एक पर्वणी असते. आज अभिनेता म्हणून यशस्वी असलेल्या अनुपम खेर यांच्यावर एक वेळ अशी आली होती, की ते मुंबई सोडून कायमचे निघून जाणार होते.

सिने कारकीर्द सुरू होण्याआधी अनुपम खेर इकडचा बोजा बिस्तरा बांधून निघण्याच्या तयारीत होते. काय झालं होतं नेमकं?

तो काळ असा होता की अनुपम खेर नुकतेच NSD मधून पास आऊट होऊन कामं शोधण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांची इथे कोणाशीही ओळख नव्हती. कुठेतरी अभिनयाचं छोटंसं काम मिळेल म्हणून अनुपम खेर मुंबईत सर्वत्र फिरत होते. जवळपास ३ वर्ष त्यांचा हा स्ट्रगल सुरू होता. मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी होती, पण संधी मिळत नव्हती. खिशात पैसे नसायचे. कधी राहायला डोक्यावर छप्पर नसायचं. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर झोपणं, मित्रांच्या घरी खाणं अशा गोष्टी ते करायचे.

त्यात आणखी एक अडचण अशी होती की, अगदी तरुणपणी अनुपम खेर यांच्या डोक्यावरचे केस विरळ झाले होते.

‘सब्र का फल मिठा होता हैं, तसंच काहीसं अनुपम खेर यांच्या बाबतीत झालं. महेश भट्ट ‘सारांश’
सिनेमासाठी कलाकारांच्या शोधात होते.

महेश भट्ट यांनी सारांश साठी अनुपम खेर यांची सर्वप्रथम निवड केली. अनुपम खेर यांचं वय त्यावेळी २८ होतं. या वयात त्यांना ६९ वयाच्या वृद्धाची भूमिका साकारायची होती. डोक्यावर केस नसल्याच्या गोष्टीचा अनुपम खेर यांना एकप्रकारे फायदाच झाला. त्यांचं दिसणं सारांश मधील प्रमुख भूमिकेसाठी चपखल बसलं. अनुपम खेर यांची निवड झाल्यावर महेश भट्ट सिनेमाच्या इतर कामांमध्ये व्यस्त झाले.

या काळात अनुपम खेर यांनी भूमिकेची तयारी करायला सुरुवात केली. वयोवृद्ध माणसाचं दिसणं, त्याचं व्यक्तिमत्त्व आत्मसात करणं अशा अनेक गोष्टींची अनुपम खेर जोरदार तयारी करू लागले. पहिलाच सिनेमा होता. प्रमुख भूमिका होती. त्यामुळे कोणतीही कसूर बाकी राहता कामा नये, यासाठी अनुपम खेर प्रयत्नशील होते.

इतक्या वर्षांच्या स्ट्रगल नंतर पहिला सिनेमा मिळाला आहे, याची त्यांना जाण होती.

जवळपास ६ महिने अनुपम खेर भूमिकेची कसून तयारी करत होते. आणि एके दिवशी त्यांना बाहेरून कळलं, की महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांना डावलून संजीव कुमार यांची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली आहे.

अनुपम खेर यांना मोठा धक्का बसला. प्रचंड वाईट वाटलं. ज्या सिनेमासाठी ते इतके महिने मेहनत करत होते, तो सिनेमा अशा शेवटच्या क्षणी महेश भट्ट यांनी दुसऱ्या कलाकाराला दिला. अनुपम खेर हताश झाले. त्यांनी मुंबई सोडायचा निर्णय घेतला. पण जाण्याआधी अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना भेटून, झालेल्या गोष्टीचा जाब विचारायचं ठरवलं.

अनुपम खेर महेश भट्ट यांच्या ऑफिसला पोहोचले. ते महेश भट्ट यांना रागाच्या भरात म्हणाले,

“तुमच्यासारखा फ्रॉड माणूस मी आजवर पहिला नाही. या भूमिकेसाठी मी ६ महिने तयारी करत आहे. मला मान्य आहे, संजीव कुमार मोठे नट आहेत. परंतु ही भूमिका माझ्यापेक्षा चांगली ते करू शकत नाहीत. तुम्ही मला फसवलं आहे.”

असं म्हणत अनुपम खेर यांनी आपला राग व्यक्त केला. हे प्रकरण संजीव कुमार यांच्यापर्यंत गेलं. संजीव कुमार मोठ्या मनाचा माणूस. त्यांनी महेश भट्ट यांना सांगितलं,

“अनुपम माझ्यापेक्षा ही भूमिका चांगली करेल, याचा मला विश्वास आहे.”

कधीकधी आपल्यावर झालेला अन्याय जर व्यक्त केला तर त्यातून चांगलं निष्पन्न होऊ शकतं. अनुपम खेर यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. महेश भट्ट यांनी निर्मात्यांच्या संगनमताने पुन्हा एकदा अनुपम खेर यांना सारांश साठी बोलावले.

आणि अशाप्रकारे अनुपम खेर यांना सारांश मिळाला.

त्यांच्यासोबत निळू फुले, रोहिणी हट्टंगडी सारखे दिग्गज कलाकार या सिनेमात होते. अनुपम खेर यांच्या या पहिल्याच सिनेमावर फिल्मफेअर पुरस्काराची मोहर उमटली. १९८४ साली सारांश साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अनुपम खेर यांना फिल्फेयर मध्ये सन्मानित करण्यात आले.

या गोष्टीला आज ३५ पेक्षाही जास्त वर्ष उलटून गेले. आजही अनुपम खेर महेश भट्ट यांना आपला गुरु मानतात आणि प्रत्येक सिनेमाच्या मानधनातून ५० रुपये त्यांना गुरु दक्षिणा म्हणून देतात. ज्यावेळी त्यांना हे पैसे देण्यास उशीर होतो तेव्हा महेश भट्ट हक्काने त्यांच्याकडून ही गुरुदक्षिणा मागून घेतात.

आपल्या अनेक मुलाखतीमधून अनुपम खेर यांनी याचा गंमतीशीर किस्सा सांगितलेला आहे.

मध्यंतरी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप झाले. अनुपम खेर हे सुशांत सिंगला न्याय मिळावा म्हणून लढा देखील देत होते मात्र त्यांनी अखेर पर्यंत महेश भट्ट यांच्यावर आरोप करायचं टाळलं व त्यांच्यावर विश्वास दाखवला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.