तेरे नामसाठी भाईला छातीवर केस उगव असं सांगणाऱ्या अनुरागला हाकलण्यात आलं होतं.
गोष्ट असेल दोन हजार सालची. दक्षिणेत सेतू नावाचा सिनेमा धुमाकूळ घालत होता. तमिळ पब्लिक तर या पिक्चरसाठी येडी झालेलीच पण सोबतच क्रिटीक्ससुद्धा भारावून गेलेले. तेव्हाच्या फिल्मफेअरपासून नॅशनल अवाॅर्ड पर्यंत सगळे पुरस्कार सेतूने खिशात टाकले.
आता एवढ सगळ झाल्यावर बॉलीवूडवाल्यांचं या सिनेमाकडे लक्ष गेल नसत तर नवल.
रामगोपाल वर्मा तेव्हा तेजीत होता. त्याचे रंगीला, सत्या, कौन, जंगल, शूल असे एकापाठोपाठ एक जबरदस्त सिनेमे रिलीज होत होते. मास आणि क्लास दोन्हीनां खुश करायचं गणित त्याला सापडलं होतं. त्याकाळात त्याचा एक असिस्टंट होता नाव अनुराग कश्यप. सत्या, कौन शूल वगैरेची त्याने स्क्रिप्ट लिहिली होती. या अनुरागने रामू ला सेतूची कथा ऐकवली. तो लंबी रेस का घोडा आहे हे रामूला ठाऊक होते. अनुरागला आश्वासन मिळाल की ,
हा सिनेमा आपण हिंदीत बनवायचा आणि याच फक्त स्क्रिप्ट नाही तर दिग्दर्शनसुद्धा अनुराग करणार.
सिनेमाच्या वेडाने गोरखपूर उत्तरप्रदेशमधून मुंबईला आलेला सिगरेटचा खर्च निघावा म्हणून पिक्चरमध्ये बकग्राउंडचे छोटे रोल करणारा, सिरीयलचे डायलॉग लिहिणारा अनुराग आता थेट सिनेमा बनवणार होता. आपल्याला जी स्वप्ने पडतात ती 70 mm पडद्यावर दाखवायला मिळणार आणि सगळा देश त्यांना बघणार म्हणून गड्याचे हात चंद्राला टेकले होते.
सगळ ठरल. सिनेमा प्रोड्यूस करायला अनिल कपूरचा भाऊ बोनी कपूर तयार झाला. त्याची फक्त एकच अट होती की हिरोचा रोल संजय कपूर करणार.
तामिळमध्ये विक्रमसारख्या तगड्या अभिनेत्याने केलेला रोल हा नाजूक संजय कपूर कसा करेल याबद्दल अनुरागला शंका होती. पण शेवटी प्रोड्युसर देव असतो आणि आपल्याला सिनेमा बनवायला मिळतोय हेच खूप आहे म्हणून अनुराग खुश होता.
पण त्याच्या आणि अख्ख्या भारताच्या नशिबाने संजय कपूरने हा सिनेमा सोडला. याचाच अर्थ निर्माता बोनी कपूर पण प्रोजेक्टमधून बाहेर पडला होता. मग नवीन प्रोड्युसर शोधन आलं. नवीन हिरो शोधन आलं. अनुरागने लिहिलेली स्क्रिप्ट सगळीकडे फिरत राहिली. काहीजण शंका काढत होते. काही जण बदल सुचवत होते जे अनुरागला पटत नव्हतं.
अस करता करता अखेर ही स्क्रिप्ट सुनील मनचंदा यांच्या हातात पडली. त्यांनी थेट सलमान खानला साईन केलं.
सलमानच करीयर तेव्हा विशेष स्पीडमध्ये नव्हत. त्याच फन फोलोइंग जोरदार होत पण काही चुकीच्या सिनेमाच्या निवडीमूळ, वैयक्तिक आयुष्यात चाललेले वाद निरनिराळे कोर्ट केसेस यात अडकल्या मूळ त्याच करीयर गंडत चाललं होतं. सलमानला सुद्धा एक हमखास हिट होईल असा सिनेमा पाहिजेच होता. तो सेतूच्या रिमेकच्या रुपात आपल्याला मिळेल म्हणून त्याने नवीन दिग्दर्शक असूनही पिक्चर साईन केला.
अनुरागला खरतर सल्लूसुद्धा पसंत नव्हता.
सलमानची स्वतःची एक इमेज होती ती मोडून अनुरागच्या अपेक्षेप्रमाणे युपीच्या टिपिकल भैयाच्या रोल मध्ये सलमान बसणार नाही याची त्याला खात्री होती. पण शेवटी काय निर्मात्याच्या मर्जीपुढे कोणाचा काही चालेना या नियमाप्रमाणे त्याच्या पुढे पर्यायसुद्धा नव्हता. आणि कितीही नाही म्हटलतरी सलमान तेव्हा सुपरस्टार होता. फक्त त्याच्या नावावर लोक थिएटरमध्ये येतील एवढी ग्यारंटी होती.
अनुरागला सलमानला स्क्रिप्ट नरेट करण्याच्या मोहिमेवर धाडण्यात आलं.
तस बघायला गेल तर अनुरागला रामूच्या सिनेमाला असिस्ट करण्याचा अनुभव होता मात्र आता पर्यंत एकदाही सलमानएवढ्या मोठ्या स्टारला स्टोरी सांगायची तयची पहिलीच वेळ होती. अनुराग सलमानच्या घरी गेला. त्याला स्टोरीच नरेशन सांगितलं.
सांगता सांगता वास्तववादी सिनेमा बनवण्याच्या भावनेच्या भरात अनुराग विसरला की समोर इंडस्ट्रीचा भाई बसला आहे. नेहमी अभिनेत्यांना जशा सूचना देतो तशा सूचना त्याने सलमानला दिल्या. यातली तर एक खूप गंमतीशीर होती.
“भाई आपको इस सिनेमाके लिये छातीपर बाल बढाने होंगे. अपना हिरो गांव का है, उसकी क्लिन शेव चेस्ट स्क्रिप्ट के हिसाबसे नही जायेगी.”
सलमान काहीच बोलला नाही. तो फक्त सरळ चेहरा करून सगळ ऐकत होता. अनुरागला काही कळलच नाही. त्याची बडबड चालूच राहिली. अखेर काही वेळाने त्याने आपल नरेशन अवरल आणि घरी आला. पोचताच त्याच्या फोनची घंटी वाजत होती. प्रोड्युसरन भेटायला बोलवल होतं.
अनुराग त्याच्या घरी गेला, रात्रीची वेळ होती. प्रोड्युसर साहेब निवांत व्हिस्कीचे घोट घेत बसले होते.
अनुरागला बघितल्यावर मात्र त्याची सटकली. दारातून आत येत असलेल्या अनुराग कश्यपला त्याने व्हिस्कीचा ग्लास फेकून मारला. आणि एकापाठोपाठ एक अस्सल अस्सल शिव्या दिल्या.
“साले अब तू सलमान छाती पर बाल उगाना सिखायेगा? तू है कोण *$%#”
त्याच्या त्या शिव्या ऐकून अनुराग तिथून सटकला. पुढे काही दिवसांनी त्याला कळाल की हा सिनेमा सतीश कौशिक दिग्दर्शित करत आहेत. अनुरागला काढून टाकलय हे सांगायची सुद्धा तसदी कोणी घेतली नाही. सेतूचा रिमेक बनला, नाव देण्यात आलं
“तेरे नाम”
सलमानचा डोळ्यात पाणी आणणारा राधे, त्याची अॅक्शन, त्याची ती विचित्र हेअरस्टाईल, हिमेशच संगीत, आणि निरागस भूमिका चावला या सगळ्यांनी पब्लिकवर जादू केली.
सेतू प्रमाणेच हा देखील सिनेमा जबरदस्त गाजला. ऐश्वर्याबरोबर ब्रेक अप झालेल्या आणि वेगवेगळ्या केसमध्ये अडकलेल्या सलमानला त्याच्या फॅन्सची सहानुभूती मिळाली, त्याच करीयर परत रुळावर आल.
आणि अनुराग?
अनुराग चा स्ट्रगल चालूच होता. सलमानला शहाणपणा शिकवायला जाऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारा दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर अख्खी इंडस्ट्री त्याच्यावर हसत होती.
पुढे अनेक वर्षे त्याने बनवलेले सिनेमे रिलीज करायला थिएटर मिळत नव्हत. पण अनुराग सुद्धा प्रचंड हट्टी होता. त्याने कुठल्याच बाबतीत तडजोड केली नाही. वास्तववादी प्रयोगशील सिनेमा बनवायचं तो थांबला नाही.
अखेर १० वर्षांनी देव डी, गुलाल, वासेपूर अशा सिनेमांनी त्याच्या टॅलेंटवर शिक्कामोर्तब केलं. आज तो भारतातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. पण आजही सलमान त्याच्यासोबत बोलत नाही. अनुरागने मध्यंतरी अनुरागच्या भावाने सलमान साठी दबंग बनवला पण दबंग २ च्या वेळी तो बाहेर पडला आणि अनुरागने सलमानला जाहीरपणे शिव्या घातल्या.
स्वतः अनुराग कश्यपने नेहा धुपियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा तेरे नामचा किस्सा सांगितला आहे.
हे ही वाच भिडू.
- निर्जरा सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.
- हिट एन्ड रन मधून वाचवणाऱ्यासाठी सलमान एक गाणं राखून ठेवतोच ?
- बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर सलमान खान एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला हजर झाला !