जुनी भांडणं विसरून त्या रात्री पोटभर दारू पिऊन दोघांनी वासेपूरची डील फायनल केली….

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल, सक्सेस यावर सगळा खेळ चालतो. यात स्पर्धा जास्त असल्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं अभिनय करणाऱ्या लोकांना जरुरीचं असतं. यात अनेकांचे कोल्ड वॉरसुद्धा असतात असाच एक किस्सा आहे अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा. मनोज वाजपेयीने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

मनोज वाजपेयीच्या आयुष्यातला सगळ्यात टॉपचा सिनेमा कुठला असेल तर तो म्हणजे सत्या. मुंबई का किंग कौन म्हणत सत्याने मनोज वाजपेयीच्या करियरला यशाच्या शिखरावर नेलं होतं. पण याच सिनेमाचा लेखक होता अनुराग कश्यप. बॉलिवूडमध्ये सुरवातीला स्ट्रगल करणाऱ्या अनुराग कश्यपला सत्यामुळे चांगली ओळख मिळाली. मनोज वाजपेयी आणि अनुराग कश्यप हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. 

चांगले मित्र असूनही दोघांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल आणि यातला अबोलपणा पुढे ११ वर्षांपर्यंत चालू राहील.

या घटनेबद्दल सांगताना मनोज वाजपेयी सांगतो कि अनुराग कश्यप इतरांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवणारा माणूस आहे. या गल्लीतून त्या गल्लीत जायच्या मामल्यामध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही. जर त्याला माझ्याबद्दल कोणी सांगितलं तर तो त्यावर लगेच विश्वास ठेवतो.

त्यावेळी अनुरागला काय झालं काय माहिती कि त्याने मनोज वाजपेयीसोबत बोलणं टाकलं. अनुरागला वाटलं कि मनोज आता माझ्या बाजूने नाहीए. याचा राग मनोजलासुद्धा आलाच होता तेव्हा त्यानेसुद्धा हे प्रकरण सिरियसली घेतलं आणि दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं.

हा अबोलपणा तब्बल ११ वर्षे चालू राहिला. त्याच काळात मनोज वाजपेयीचा वाईट काळ सुरु होता. बरेच सिनेमे मनोजचे फ्लॉप जात होते आणि त्याला काम मिळणं बंद झालं होतं. याच काळात अनुराग कश्यपचा देव डी रिलीज झाला होता आणि त्या सिनेमाची भरपूर चर्चा सुरु होती. त्यावेळी मनोजने ज्या ज्या दिग्दर्शकांचे सिनेमे त्या काळात चालत होते त्या त्या दिग्दर्शकांना कामासाठी फोन केला होता.

आता मनोजला कामाची गरज होती पण त्याने अनुरागला एके दिवशी फोन केला आणि सांगितलं कि तू बनवलेला देव डी सिनेमा कमाल आहे. अनुरागला शुभेच्छा देऊन त्याने कॉल बंद केला. नंतर काही दिवसांनी अचानक रात्री साडे दहा वाजता मनोज वाजपेयीला एक फोन आला तो होता अनुराग कश्यपचा.

अनुरागने सांगितलं कि एक स्क्रिप्ट आहे आणि तुला ती वाचून दाखवायची इच्छा आहे.

दोघेजण रात्री भेटले आणि स्क्रिप्ट ऐकून झाल्यावर अर्ध्यातच मनोज वाजपेयीने अनुरागला थांबवलं. नंतर दोघांनी भरपूर गप्पा मारल्या, दारू प्यायले आणि पुढे या जोडीने आपापसातले मतभेद दूर सारले आणि एका अशा सिनेमाला बॉलिवूडमध्ये आणलं त्याच्यासारखा गँगस्टरपट दुसरा कुठलाही झाला नाही, तो सिनेमा होता गँग्स ऑफ वासेपूर.

वासेपूरमुळे मनोज वाजपेयी आणि अनुराग कश्यप हि जोडी सत्या सिनेमानंतर पुन्हा एकदा एकत्र आली. ११ वर्षे दोघे बोलत नव्हते मात्र जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी एक मास्टरपीस सिनेमा बॉलीवूडला दिला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.