पृथ्वीराज चव्हाणांमुळे चर्चेत आलेला कथित शिखर बँक घोटाळा नेमका काय आहे ?

काल दिवसभर शिखर बँक घोटाळा गाजतोय. अजित पवार, शरद पवार यांच्यापासून ते विजयसिंह मोहिते पाटील हसन मुश्रीफ या सहकारातल्या दिग्गज नेत्यांवर इडीने गुन्हा दाखल केलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसारख्या जेष्ठ विरोधी पक्ष नेत्यावर ही कारवाई होत असल्यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. बारामती मध्ये तर आज कडकडीत बंद पुकारण्यात आलाय.

नेमका हा कथित शिखर बँक घोटाळा आहे तरी काय? ही शिखर बँक आहे तरी काय?

साधारण विसाव्या शतकाच्या सुरवातीला भारतात सहकार क्षेत्रांच आगमन झालं. इंग्रजांच्या जुलमी राजवटीमध्ये गोरगरीब जनतेचं कल्याण व्हायचं असेल तर सहकारच मदतीला येईल हे त्याकाळच्या नेत्यांना उमजलं होतं. यातूनच खेडोपाड्यात सहकाराची गंगा पसरली. सहकारी तत्वावर वेगवेगळ्या संस्था, साखर कारखाने, सुतगिरण्या स्थापन झाल्या.

याच पद्धतीने ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करणाऱ्यासाठी सहकारी पतसंस्था, बँका सुरु झाल्या. या बँकांवर नियंत्रण राहावं म्हणून आधी जिल्हा बँका आणि त्यांच समन्वय राहण्यासाठी राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. 

काही वर्षांपूर्वी या बँकेतील व्यवहारात घोटाळे असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे प्रकरण लावून धरले. नाबार्डच्या लेखापरीक्षण अहवालात राज्य सहकार बँकेच्या कारभारात अनियमितता समोर आली. यातून काही विशिष्ट संस्थांचा फायदा झाल्याचं दिसून येत होतं.

रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त केलं आणि राज्य सहकारी बँकेवर प्रशासक बसवला. चौकशी सुरु झाली.

माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. जवळपास २५ हजार कोटींचा हा घोटाळा असण्याचे आरोप त्यांनी केले.

बरेच वर्ष सत्तेत असणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यात अडकले होते. या बँकेच्या संचालकांनी आपल्या मर्जीतल्या संस्थावर नियमाविरुद्ध जाऊन पैशांची खैरात केली आहे असं बोललं जात होतं. या प्रकारांमुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर यांनीही २६ आजारी सहकारी साखर कारखाने अगदी कमी किंमतीत खाजगी मालकांच्या घशात घातले गेले असे आरोप केले.

या कथित घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह बाळासाहेब सरनाईक (कोल्हापूर), अजित पवार, हसन मुश्रिफ, दिलीप सोपल, मधुकर चव्हाण (तुळजापूर), विजयसिंह मोहिते पाटील, विजय वडेट्टीवार, आनंदराव अडसूळ, जयंत पाटील (अलिबाग), राजवर्धन कदमबांडे, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, अमरसिंह पंडित, यशवंतराव गडाख, रजनी पाटील आदी नेते अडचणीत आले.

पृथ्वीराज चव्हाणांनी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचं वाढत महत्व कमी करण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढलं असे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. पुढची निवडणुक काँग्रेस व राष्ट्रवादीनी आघाडी न करता लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला.

असं म्हणतात याच घटनेनंतर महाराष्ट्रातील सहकार सम्राटांची व पर्यायाने सहकार क्षेत्राची राजकारणातील अधोगती सुरु झाली.

याचा फायदा २०१४ साली सत्तेत आलेले भाजप शिवसेना युती सरकार घेणार हे साहजिक होतं. पण तसं घडल नाही. कित्येकदा कारवाई करणार याच्या वल्गना झाल्या मात्र प्रत्यक्षरित्या ते घडताना दिसले नाही. सुरिंदर अरोरा यांनी प्रकरण लावून धरले.  अखेर गेल्या महिन्यात २२ ऑगस्टला उच्च न्यायलयाने सरकारला बँकेच्या संचालक मंडळावर पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

याच आदेशाला धरून इडीने काल अजित पवारांपासून ते हसन मुश्रीफ यांच्यावर काल सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. मात्र या यादीत शरद पवारांचे नाव आल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते, कारण शरद पवार हे कधीही राज्य सहकारी बँकेचे संचालक नव्हते. मात्र ते त्याकाळात केंद्रात शक्तीशाली मंत्री होते व सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च नेते या नात्याने त्यांनी या कथित घोटाळ्याकडे दुर्लक्ष केला किंबहुना या सगळ्याप्रकरणाचे ते कर्तेकरविते आहेत असा उल्लेख कोर्टात दाखल झालेल्या आरोपपत्राच्या पान नंबर ६८ वर करण्यात आलाय. त्याला धरूनच शरद पवारांच्यावर इडीने गुन्हा दाखल केला.

मात्र तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेली पाच वर्ष वेळ असताना सरकारने कारवाई साठी निवडणुकीच्या आधीचाच मुहूर्त का पकडला? शरद पवारांचा थेट संबंध नसताना त्यांचे नाव आरोपींच्या यादीत घेणे योग्य आहे का? 

खरं तर या प्रकरणात काँग्रेस राष्ट्रवादींच्या मोठ्या नेत्यांबरोबर शिवसेनेचे काही नेते, भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले नेते सुद्धा आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेल्या या प्रकरणाला कोणते वळण लागेल हे पाहणे संयुक्तिक ठरणार आहे.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.