अप्पा बळवंत चौकात चक्क रणगाडे शिरले होते. गोळीबार देखील झाला होता..

पुण्याला शिकायला आलाय आणि त्याला अप्पा बळवंत चौक माहित नाही असं कधी होत नाही. आपल्या गावाकडं शाळेची वह्या पुस्तक घ्यायचं म्हटल्यावर एक दुकानं असत. पण या विद्येच्या माहेरघरी वह्या पुस्तकांचं एक छोट गावचं वसलंय. त्याला अप्पा बळवंत चौक म्हणतात. 

 याच अप्पा बळवंत चौकात एकदा रणगाडा शिरले होते. ऐकून धक्का बसला ना? तेव्हा नेमकं काय झालं होतं, कस झालं होत सगळं जाणून घेऊ. 

याची सुरवात होते ८ ऑगस्ट १९४२ पासून. मुंबईच्या गवालिया टॅन्कवर झालेल्या भाषणात गांधीजी म्हणाले की,

आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वतंत्र करू वा मरू, या भावनेने या लढ्यात सहभागी व्हा.

हीच सुप्रसिद्ध अशा चले जाव आंदोलनाची सुरवात होती. करेंगे या मरेंगे म्हणत सगळा देश या आंदोलनात उतरला. इंग्रजांनी त्याच मध्यरात्री पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद या नेत्यांना स्थानबद्ध करून त्यांची नगरच्या तुरुंगात रवानगी केली.

 हळू हळू सर्वच जेष्ठ नेत्यांना अटक झाली व लोकांत संतापाची इतकी तीव्र लाट उसळली आणि देशभर राजकीय आंदोलनाचा वणवा पेटत गेला. 

महाराष्ट्रही यात मागे नव्हता. 

दुसऱ्या दिवशी मुंबईत अरुण असफ अली यांच्या हस्ते आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाचा वणवा पुण्यात पसरायला देखील वेळ लागला नाही. पुणे जिल्ह्यातील आंदोलन दडपून टाकण्यासाठी तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी टी.ई.स्रीटफिल्ड यांनी संपूर्ण जबाबदारी मि.हॅमंड या अधिकाऱ्याकडे दिली होती. सोबतच त्यांनी कलम १४४  लावून संपूर्ण पुणे शहर बंद ठेवले होते.

पण याचा काही उपयोग झाला नाही. ९ ऑगस्टपासूनच पुण्यात छोडो भारत आंदोलनाने पेट घेतला. ठिकठिकाणी निदर्शने झाली. काँग्रेस भवन मध्ये तिरंगा फडकवायला गेलेल्या नारायण दाभाडे या तरुणावर इंग्रजांनी गोळ्या झाडून ठार केले. पहिल्याच दिवशी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे एसपी कॉलेजचे तीन चार विद्यार्थी देखील शहिद झाले. 

याचा भडका उडाला १२ ऑगस्ट रोजी. 

पुणे शहरातील आंदोलनाची तीव्रता वाढत होती. डेक्कन जिमखान्याकडील कॅम्प चौकातील तारा तोडण्यात आल्या त्यावेळी पोलिसांनी लाठीमार, गोळीमार केला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू व ५० विद्यार्थ्यांना अटक झाली. लाठीमार व गोळीबाराने पुणे शहरातील आंदोलन आटोक्यात येत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चिलखती रणगाड्यांचा वापर केला. 

हे रणगाडे सेवासदन चौकातून अप्पा बळवंत चौकात आले. तेथून बुधवार चौक, गणपती चौक व लक्ष्मी रस्त्यावर गस्त घालू लागले.

काही वेळ रस्त्यावर शांतता होती पण पुन्हा जमावाने लोक अप्पा बळवत चौक, विश्रामबाग वाडा, जोगेश्वरी, सेवासदन या परिसरात फिरू लागले. रणगाड्यावरील लष्कराने केलेल्या गोळीबार सुरु केला. यात श्री. जोशी, सरस्वती देशपांडे, मथुराबाई माटे, सौ. तिखे. श्री. कर्वे हे सर्वजण बळी पडले. 

गोळीबारातील गोळ्यांची ताकद ही अत्यंत भयानक होती. टेलिफोनच्या खांबातून गोळी शिरून, सेवासनदनच्या भिंतीतून गोळी जात, दोनशे यार्डपर्यंत सर्व अडथळे पार करून गोळी  गेली. एवढ्या वेगवान गोळ्या किंवा बंदुका वापरण्याची लष्कराला कोणतीही गरज नसताना केवळ शांततेच्या नावाखाली हा गोळीबार झालेला होता.

शहरातील अनेक विद्यार्थ्यानी शाळा, कॉलेजकडे पाठ फिरवून आंदोलनात सहभाग घेतला. पुण्यातील कॉलेजे तर बंद पडलीच होती पण त्याचबरोबर भारत हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, आगरकर हायस्कूलचे वर्गदेखील बंद पडले होते. १२ ऑगस्ट रोजी लाल महालच्या कोपऱ्यावरील टेलिफोनच्या तारा तोडताना विष्णू. रामचंद्र समुद्र यांना पकडले. त्यांच्यासोबत मधुकर अंबिके, सोनू वाब्हळ होते. या सर्वांना फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये नेले.

जिल्हाधिकारी टी. ई. स्ट्रीटफील्ड यांनी पुण्यातला कर्फ्यू कडक केला. ही ऑर्डर १२ तारखेपासून पुढे एक आठवडा राहणार होती. याशिवाय लाठ्या, काठ्या व दगड घेऊन रस्त्याने फिरण्यासदेखील बंदी घातली होती. दिवसभर ४० लोकाना अटक झालेली होती. 

अप्पा बळवत चौक व परिसरातील गोळीबारात मृत्यू पावलेल्या व अटक झालेल्या लोकांबद्दलचे पडसाद १३ ऑगस्ट रोजी उमटले होते. 

या दिवशी महात्मा फुले मंडईतून मिरवणुका निघत होत्या. लाठीमाराला सुरुवात होताच चिडलेल्या आंदोलकांनी मंडईपूढील पोलीस चौकीस आग लावली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीवर लोकांनी दगडफेक केली. आतापर्यंत पुणे शहरात झालेला गोळीबार व त्यामध्ये झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी हिंदूमहासभेतर्फे चौकशी कमिटी नेमली. 

केसरीचे संपादक ज. स. करंदीकर हे कमिटीचे अध्यक्ष, ग. म. नलावडे (नगराध्यक्ष), शं. रा. दाते (संपादक काळ), वा. ब. गोगटे (वकील) असे चार सभासद होते. कमिटी नेमण्यात ल. ब. भोपटकर मुख्य होते. पुढे कमिटीने चौकशी करून आपला अहवाल गव्हर्नरकडे सादर केलेला. 

गोळीबारात धारातीर्थी पडलेल्यांना आर्थिक अनुदान मिळावे व गोळीबार केलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी हेच मुख्य सार या अहवालाचे होते. लोकांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु ज्या अधिकार्यांनी लोकांवर लाठीमार, गोळीबार केला त्यांना मात्र कोणतीच शिक्षा झालेली नव्हती.

महाराष्ट्र महिला मंडळाच्या वतीनेदेखील पुण्यातील गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी केली. इंग्रज सरकारचा जनतेमध्ये दहशत बसवण्याचा प्रयत्न होता. मात्र या गोळीबाराला न घाबरता पुण्यातील स्त्रिया प्रभात फेऱ्या काढतच होत्या. अटकसत्रे सुरूच राहिली

आज अप्पा बळवंत चौकाकडे पाहिलं तर इथे देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातल्या एवढ्या मोठ्या घटना घडल्या होत्या, इंग्रजांनी रणगाडा चालवला होता, त्याच्यापुढे उभं राहून लोकांनी आपलं रक्त सांडलं होतं हे सांगितलं तर किती जणांचा विश्वास बसेल. 

चले जाव आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या या शहिदांचे एक स्मारक उभारलं जावं म्हणजे येणाऱ्या पिढयांमध्ये त्यांच्या स्मृती जपल्या जातील हे निश्चित.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.