तब्बल २१ वर्षे एखाद्या ऋषीप्रमाणे जगून अप्पांनी ज्ञानप्रबोधिनीचा वटवृक्ष निर्माण केला
ज्ञान प्रबोधिनी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? पुण्याच्या भरवस्तीत असणारा ज्ञानाचा अखंड तेवणारा दिवा. पुण्याच्या मध्यवस्तीतील वैशिष्ट्यपूर्ण इमारत आणि तिथे चालणारी नामवंत शाळाच चटकन डोळ्यासमोर येत असली तरी ही शाळा ज्यांच्या कष्टाचं फलित आहे ते म्हणजे डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ आप्पा पेंडसे.
डॉ. विनायक विश्वनाथ (अप्पा) पेंडसे यांनी १९६२ साली लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय.
अप्पा पेंडसे हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या अप्पा पीएचडी सोबतच संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस घेणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
अब्दुल रशीद या माथेफिरूने स्वामी श्रद्धानंदांचा गोळ्या घालून खून केल्याचे वृत्त आले नि अप्पांना मोठा धक्का बसला. काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, खिलाफत चळवळीतही सहभागी झालेले हे दयानंद शिष्य हिंदूकरणाचे महत्त्व जाणून त्या कामात हिरिरीने पडले होते. अशा या नेत्याचा, त्याच्या आजारपणात जो अमानुष खून करण्यात आला त्याचा बालमनावर खोल आघात होऊन त्यांनी वयाच्या १० व्या वर्षीच ‘मी श्रद्धानंदांची जागा घेईन! त्यांचं अपुरं काम मी पूर्ण करीन!’ ही प्रतिज्ञा उत्स्फूर्तपणे घेतली.
ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते.
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.
अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते.
दलाच्या बँड पथकात ते बँड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने त्यांना ग्रासले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळता क्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली ८ ऑगस्ट १९६२ या दिवशी ज्ञानप्रबोधिनीचे कार्य सुरू झाले.
आरंभी १४० बुद्ध्यांकाचे विद्यार्थी निवडून घेण्याचे, सायंकाळी तासभर खेळ आणि नंतर दोन तासिका शालेय विषयांचे अध्यापन करण्याचे तंत्र या प्रबोधन शाळेसाठी योजले होते. आठवीत घेतलेले विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला अशोक निरफराके यासारखा पुण्याच्या पूर्वभागातील विद्यार्थी चमकला !
अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी जीवन देशकार्यार्थ झोकून द्यावे या अपेक्षेने अप्पांनी या सुमारास समर्पणाचा आदर्श असे ‘विवेकानंद कन्या निवेदिता’ हे पुस्तक लिहिले. १९६८ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या संघटनेच्या मान्यतेने ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा प्रारंभ झाला.
अप्पा आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. उषा खिरे, डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अशोक निरफराके यांनी १४० बुद्ध्यांकाचा निकश कालबाह्य ठरवून १२० पैलूंच्या आधारावर प्रबोधिनीचे प्रवेशाचे तंत्र सुरू केले. त्यासाठी डॉ. गिलफर्डने मांडून ठेवलेल्या या पैलूंचे प्रत्यक्ष मोजमाप करणार्या शास्त्रीय चाचण्या प्रज्ञा मानस संशोधिकेद्वारा विकसित केल्या व डॉ. गिलफर्ड यांच्याकडून त्यासाठी प्रशंसा प्राप्त केली.
प्रबोधिनी अशा प्रकारे शिक्षणाच्या आणि मानसशास्त्र संशोधनाच्या जागतिक नकाशावर दिसू लागली. युरोपचा प्रवास करून अप्पांनी इंग्लंड, फ्रान्स देशातील शिक्षण पद्धती पाहिली व आपल्या कल्पनांचे वेगळेपण त्यांना अधिकच भावले!
अप्पांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक करताना मोरारजी देसाई म्हटले होते,
आमच्या देशात बुद्धिमत्तेची कमतरता नाही तथापि बुद्धीचा सदुपयोग करणं आम्ही विसरतो आहोत. आपण हे काम अतीव कौशल्याने करता आहात यासाठी आपल्याला मी धन्यवाद देतो.
भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी २१ सप्टेंबर १९७१ रोजी संस्थेला दिलेल्या भेटीतला हा संवाद होता.
ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर तब्बल २१ वर्षे एखाद्या ऋषीप्रमाणे आप्पा जगले. त्या २१ वर्षांतला प्रत्येक क्षण विद्यार्थी-कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांनी वेचला. त्याचीच फळं आज दिसत आहेत, यापुढेही दिसत राहतील.
हे ही वाच भिडू
- आरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात ?
- सी.वी. रमन यांची ऑफर डावलून ते संघात गेले आणि पुढे सरसंघचालक बनले
- पंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती