रयतमधून नोकरकपातीची वेळ आली तेव्हा कर्मवीर अण्णांनी आपल्या मुलाला काढून टाकलं

ऐतवडे गावच्या पाटलाच्या कुळात जन्मलेला, वडील ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला, घर खाऊनपिऊन सुखी, शिकायला कोल्हापूरला धाडलं तर तिथं शाहू महाराजांच्या तालमीत घुमला, महाराजांच्या लाडक्या पहिलवानापैकी एक झाला, किर्लोस्करांच्या नांगराचा एकेकाळचा सेल्स मॅनेजर.

मनात आणलं असत तर खोऱ्याने पैसा छापला असता, कमीतकमी गावपाटीलकी करत राजकारणी तर बनलाच असता.

पण हे सगळं सोडून अनवाणी पायाने महाराष्ट्रभर हिंडला, गोर गरिबांची, शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची उघडी वागडी पोरं खांद्यावर उचलून शाळेत आणली. त्यांना शिकवलं, स्वावलंबी बनवलं.

कर्मवीर भाऊराव पाटील.

कर्मवीर अण्णांनी हाडाची काडं करून उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडवल्या. गोरगरीब विद्यार्थ्यांचे आईबाप झाले. अक्षरशः मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांच्या पत्नीने वसतिगृहाच्या मुलांना जेऊ घातलं. स्वतःच्या घरदाराचा त्याग त्यांच्या रक्तात भिनला होता.

कर्मवीर अण्णांना तीन मुलं. शकुंतला, बेबी आणि मुलाचं नाव आप्पासाहेब.

आप्पासाहेब लहान होते तेव्हाच लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. भाऊरावांनी आपल्या मुलांना रयतच्या बोर्डिंग मधल्या इतर मुलांप्रमाणेच वाढवलं. सगळ्यांच्या प्रमाणे बोर्डिंगचे जेवण,साफसफाई, गोठ्यातल्या जनावरांचे शेणघाण काढणे, भाकऱ्या थापणे ही सगळी कामे केली.

आप्पासाहेब हुशार होते. पुढे त्यांना कोल्हापूरला शिकायला घातलं. त्यांची हुशारी बघून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना १० रुपयांची स्कॉलरशिप मंजूर केली.

अण्णांना ही गोष्ट कळाली, ते लगेच कोल्हापूरला गेले. त्यांनी आप्पांना महिन्याचा खर्च किती अस विचारलं. अप्पासाहेबांचा कोल्हापुरातील खर्च ३ रुपयात भागत होता. अण्णांनी त्यांना वरचे सात रुपये रयत शिक्षण संस्थेत जमा करायला सांगितलं.

स्वतःच्या मुलाच्या हक्काचे स्कॉलरशिपचे पैसे देखील संस्था उभारणी साठी वापरणारा हा आगळावेगळा कर्मवीर होता.

अप्पासाहेबांच शिक्षण पूर्ण झालं. त्याकाळी सुप्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी बेंगलोर येथे विमानाचा कारखाना सुरू केला होता. अप्पासाहेबांना तिथे नोकरी करायची इच्छा होती. त्यासाठी वडिलांनी वालचंद यांना एक चिठ्ठी लिहावी अशी त्यांना वाटत होते.

वालचंद यांच्याशी अगदी मैत्रीचे संबंध असूनही कर्मवीरांनी त्याला नकार दिला.

पुढे आप्पासाहेब पाटील रयत शिक्षणसंस्थेच्या स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला लागले. हे स्टोअर ना नफा ना तोटा तत्वावर चालवले जायचे. काही काळाने खर्च वाढल्याने ते चालवणे अत्यंत जिकरीचे बनले. तेव्हा भाऊराव पाटलांनी नोकरकपात करायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला बोलवून घेतलं,

तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे.”

विमाकंपनीमध्ये काम करताना देखील मिळालेला नफा भाऊरावांनी त्यांना संस्थेतच जमा करायला लावला.

आपल्या उक्तीतून व कृतीतून आदर्श घालणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच पावलावर पाऊल टाकून आप्पासाहेब पाटील यांनी पुढचा प्रवास केला.

कर्मवीर अण्णांच्या मृत्यूनंतर यशवंतराव चव्हाण यांना रयत शिक्षणसंस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले तर आप्पासाहेब पाटलांनी संघटक म्हणून जबाबदारी उचलली.

त्यांची लोकप्रियता पाहून यशवंतरावांनी त्यांना आमदारकीचं तिकीट देऊ केलं होतं. निवडून आल्यावर मंत्री करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं पण त्यांनी राजकारणाच्या दलदलीत जाण्यास नकार दिला.

स्वातंत्र्यानंतर अनेक शिक्षणसम्राटांनी करोडो रुपये कमावले, गाड्या बंगले उभारले, राजकारणात मंत्रीपदे उपभोगली मात्र कर्मवीरांचे संस्कार असणाऱ्या आप्पासाहेब पाटलांनी हे सगळं सुख पायाशी लोळण घालू शकत असतानाही त्याला लाथाडलं. त्यागाचं व्रत हे रक्तातच होतं.

संदर्भ-‘आप्पासाहेब पाटील एक सृजनशील व्यक्तिमत्त्व’ प्राचार्य अरविंद बुरुंगले 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.