महाराष्ट्राच्या मातीत “फॉरेनचा नांगर” फिरवणारे, अप्पासाहेब पवार.

महाराष्ट्राच्या भूमीत जिजाऊंनी बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यानंतरचा इतिहास हा कोणाला सांगावा लागत नाही. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला येणारा प्रत्येकजण शिवरायांचा तो जाज्वल इतिहास घेवून जन्माला येतो देखील, आणि तसाच जगतो देखील. 

पण आज आम्ही तुम्हाला ज्या व्यक्तिंबद्दल सांगणार आहोत ते देखील याच विचारांची वाट जोपासरणारे. सोन्याचा नांगर फिरवण्याच्या विचारातून शेतीच सोनं करणारे अप्पासाहेब पवार.

अप्पासाहेब पवार. महाराष्ट्राच्या राजकिय पटाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पवार घराण्यामधलं सर्वात महत्वाच्या नावांपैकी एक. अप्पासाहेब पवार हे शरद पवारांचे मोठ्ठे बंधू. पण इतक्यावर हि ओळख थांबत नाही. पवार या आडनावाहून अधिकच काहीतरी “अप्पासाहेब” या नावात दडलं आहे. 

पवार म्हणजे घरची श्रीमंती. त्यांच्या घरी साठ ते सत्तर एकर जमिन होती. पण या शेतीवर असणारे एकुण बारा भावंडे होती. अप्पासाहेब पवार यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापच्या नेत्या. त्यांना शेतीच अर्थशास्त्र योग्य काळात समजलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व मुलांना चांगल शिकवण्याचा विडा उचललेला. त्यातूनच अप्पासाहेब पवार पुण्यातल्या SP कॉलेजला आले. SP कॉलेजनंतर ते कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर झाले. त्या काळात कृषी पदवीधराने स्पर्धा परिक्षांचा अभ्यास किंवा कृषी अधिकारी म्हणून एखाद्या तालुक्याच्या गावात जायचा ट्रेन्ड होता. पण अप्पासाहेब पवार पुन्हा आपल्या शेतीकडे वळले. घरच्या साठ सत्तर एकर जमिनीत नेमकं काय करता येवू शकत याचा शोध घेवू लागले. 

पण त्यांच्या आई शारदाबाई यांनी सांगितलं होतं की, शेतीत फक्त एकाच मुलाने राबावं.

थोरल्या असणारे अप्पासाहेब शेतीतून बाहेर पडले आणि थेट ग्वालेरला गेले. तिथं त्यांनी जंगल मोजणीच काम करु लागले. त्याच काळात महाराष्ट्रात भारतातला पहिला सहकारी कारखाना काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजय गाडगीळ यांच्या कष्टातून हा कारखाना काही महिन्यात उभा देखील राहिला. कारखान्यामार्फत नोकरीची जाहिरात देण्यात आली आणि रितसर मुलाखत देवून अप्पासाहेब पवार या कारखान्यात कनिष्ठ कर्मचारी म्हणून नोकरीला लागले. 

अप्पासाहेबांकडे काम करण्याची एक विशेष स्टाईल होती. कारखान्याच्या फायद्या तोट्याच्या गणिताबरोबर त्यांना शेतकऱ्यांच्या फायद्या तोट्याचं गणित देखील जमायचं. लोकांना अप्पासाहेबांची हि स्टाईल समजू लागली. त्यातूनच त्यांना थेट सणसरच्या भागात जाचकांच्या प्रेरणेतून होत असणाऱ्या कारखान्यासाठी थेट सेक्रेटरी पदाची ऑफर देवून बोलवण्यात आलं. हि जबाबदारी फक्त दहा महिन्यात कारखाना उभा करुन पार पाडण्यात आली. सणसरचा कारखाना उभा राहिला आणि आत्ता पुढच्या कारखान्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. 

हा कारखाना होता अकलुजच्या मोहित्यांचा. १९५९ सालचा तो काळ. ऊस आडवा लावला तर उभा कसाकाय येतो असे प्रश्न शेतकऱ्यांना पडण्याचा तो काळ. या काळात अप्पासाहेब पवार तीन साखर कारखान्यांच्या यशोगाथेत सामील झाले होते.

त्यानंतर आपल्या लहान भावाच्या अर्थात शरद पवारांच्या पहिल्या प्रचारासाठी त्यांनी “स्टेबल” नोकरी सोडली. बारामतीत तळ ठोकून प्रचार केला. शरद पवार विजयी झाल्यानंतर आत्ता पुढे काय असा प्रश्न होता. इतक्यात त्यांना पुन्हा प्रवरा कारखान्याकडून बोलवण्यात आलं. प्रवरा कारखाना अडचणीत आला होता. कारखाना फायद्यात आणायचा, पण त्याचवेळी शेतकऱ्यांच भलं देखील करायचं अशा दुहेरी कामासाठी पुन्हा अप्पासाहेब पवारांना बोलवण्यात आलं. अप्पासाहेब पवार प्रवरेच्या कारखान्यात रुजू झाले ते MD म्हणून.

कारखाना उभा करताना ज्या कारखान्यात अर्ज करुन नोकरीवर लागणारा माणूस आज तोच कारखाना अडचणीत असताना MD म्हणून बोलवला जातो हे विशेष होतं. अप्पासाहेबांनी ते शिवधनुष्य पेललं. त्यानंतर त्यांनी छत्रपती कारखान्याची जबाबदारी घेतली. कारखान्यात चेअरमन झाले. इथे आपल्याला आयुष्यात याहून वेगळं काहीतरी करायचं आहे या जाणिवीचे ठिगणी पडली. कारखान्यामार्फत त्यांना चार महिन्यासाठी इस्त्रायला पाठवण्यात आलं. या भेटीत त्यांना इस्त्रालय करत असणारे शेतीचे प्रयोग कळाले. विदेशी गाई आणि तिच्या दूधाचं प्रमाण त्यांनी पाहीलं. कारखान्यावर पुन्हा आल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं ते म्हणजे, विदेशी गाई संकरीत करण्यास पुढाकार घेवून दुध संघाची स्थापना केली. पहिल्या दिवशी या दुधसंघामार्फत ४० लीटर दुधाच संकलन करण्यात आलं. 

इथपर्यन्त जे होतं ते अप्पासाहेबांच स्वत: अस, इथून पुढे जे झालं ते लोकांच…

बारामती येथे Hessel Skues आणि Edna Wazar या ख्रिश्चन विदूषी आणि शरद पवार यांच्यामार्फत ADT अर्थात अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. शरद पवार आमदार झाल्यानंतर या संस्थेचा कारभार अप्पासाहेब पवार यांच्या ताब्यात आला आणि तिथूनच चित्र बदलण्यास सुरवात झाली. 

आप्पासाहेबांच्या हातात कारभार येताच त्यांनी आपण आत्तापर्यन्त जे काही मिळवलं ते शेतकऱ्यांच्या जमिनीत रुजवायला सुरवात केली. फक्त शेती करुन नाही तर शेतीपुरक उद्योगातून शेतकरी उभा राहू शकतो याचा विचार करुन त्यांनी पुरक उद्योगांवर भर दिला. अकलुज भागात असणाऱ्या कुक्कुटपालनासंबधीत उद्योग पाहून त्यांनी बारामती मध्ये कुक्कुटपालनाचा उद्योगावर भर देण्यास भर दिला. विदेशी गाईची पैदास करण्यावर भर दिला. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात आला.

इथपर्यन्त झटण्याचा आणि शेतकऱ्यांसाठी जे चांगल वाटेल तो शोधण्याचा काळ होता. कर्मवीर पाटलांच्या कमवा व शिका मध्ये शिकलेले अप्पासाहेब “करा व शिकाचा” मुलमंत्र घेवून शेतकऱ्यांच्या बांधावर झटत होते. 

भारताच्या भूमीवर ठिंबक सिंचन आणणारे पहिले व्यक्ती अप्पासाहेब पवार होते. 

अशात पुन्हा इस्त्रायलला जाण्याचा योग अप्पासाहेबांवर आला. इस्त्रायलच्या भेटीत त्यांनी आपल्या बॅगमधून जे पाहिलं ते आणलं होतं. आपल्या बॅगमध्ये छोटेछोटे नोझल, पाईप्स घेवून ते आले होते. ठिंबक सिंचन पाहिल्यानंतर त्यांना याच गोष्टीने झपाटले. तिथून आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत देखील याचा वापर झाला पाहीजे हे त्यांनी ठरवलं. नेमकेपणा समजून घ्यावा म्हणून भारताच्या भूमीत पहिल्यांदा ठिंबकची पाईप आणणारे आप्पासाहेब होते. 

अण्णासाहेब शिंदे, भवरलाल जैन यांच्यासोबत त्यांना आस्ट्रेलियाला जायला मिळालं. तिथेही त्यांनी ठिबक सिंचनाची पद्धत समजून घेतली. व निर्णय घेतला की देशी पद्धतीने आपण देखील आत्ता ठिबक वापरण्यावर भर द्यायला हवा. अप्पासाहेब पवारांनी आयडिया मांडली. भवरलाल जैन यांनी ती अंमलात आणली. ठिबक सिंचनचे उत्पादन सुरू झाले. अप्पासाहेब पवार स्वत: हातात फळा आणि खडू घेवून एखाद्या कसलेल्या शेतकऱ्यांप्रमाणे ठिबक सिंचनाचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगू लागले. दोघांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ठिबक सिंचन करण्यास सुरवात करण्यात आली. ज्याप्रमाणे त्यांच्या आईने त्यांना शेती एकानेच करावी सांगितलं होतं तो विचार घेवून शेतकऱ्यांच्या मुलांनीच नाही तर मुलींनी शिकावं म्हणून त्यांनी शारदा शैक्षणिक संकुलाची स्थापना केली.

आज २०१९. कृषी विज्ञान केंद्र, ADT मार्फत कृषिक प्रदर्शन चालू आहे.

यंदाच्या प्रदर्शनात इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरची पायाभरणी करण्यात आली आहे. शेतीसाठी जागतिक दर्जाच संशोधन केंद्र म्हणून KVK चा उल्लेख करण्यात येतोय. इथे तुम्हाला २० फुटाच टॉमेटॉच झाड देखील दिसतं आणि ड्रोन द्वारे करण्यात येणारी औषधफवारणी दिसते. पाच अंश तापमानात फुलणारी भेंडी दिसते. ज्याप्रमाणे अप्पासाहेबांनी फॉरेनच तंत्रज्ञान आणलं, ते शेतकऱ्यांच्या शेतात रुजवलं त्याचप्रमाणे हे संशोधन रुजवण्याच काम राजेंद्र पवारांकडून केलं जात आहे. कृषिकच्या या प्रदर्शनात आठवण होते ती अप्पासाहेब पवार यांची.

अप्पासाहेब पवार यांना पद्मश्री पुरस्कारने गौरवण्यात आले. ज्या कॉलेजमधून त्यांनी कृषीच पदवी शिक्षण घेतलं त्याच कॉलेजने त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी देवून गौरवलं. अप्पासाहेब पवार यांच दिनांक १६ एप्रिल २००० रोजी निधन झाले. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.