कट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं.

संगीताचा जादूगार, ऑस्कर विजेता अशा कितीतरी उपाध्यांनी जगभरात प्रसिद्ध असलेला ए आर रेहमान हा बऱ्याच जणांचा आवडता गायक आणि संगीतकार आहे. त्याच्या गाण्यांमध्ये असलेली मेलडी, वेगवेगळ्या ट्यून्स ऐकणाऱ्या लोकांना मोहित करून टाकतात. पण याच रेहमानच्या बाबतीत त्याच्या नावाचा किस्सा मात्र प्रसिद्ध आहे. धार्मिक मुद्यांमध्ये रेहमान कधी अडकत नाही मात्र त्याच्या आत्मचरित्रात त्याने सांगितलेली घटना कि एका हिंदू ज्योतिषाने मला मुस्लिम नाव दिलं होतं.

रेहमानच पूर्वीच खरं नाव होतं दिलीप शेखर. घरची परिस्थिती बेताची होती , त्यात वडील आजारी पडले तेव्हा जगात जितके कुठले देव असतील त्यांच्या प्रार्थना दिलीप शेखरच्या घरचे करू लागले. पण दुर्धर आजाराने वडील गेले. घरात कायम चिंतेचं वातावरण, पैशाची अडचण अशा सगळ्या परिस्थितीत हा परिवार सापडला होता. याच दरम्यान दिलीप शेखरच्या घरचे एका मुस्लिम पीराला खूप मानायचे.

दिलीपची बहीण एकदा आजारी पडली, त्या पिराकडे दिलीपच्या घरचे तिला घेऊन गेले. त्याने काही उपचार केले आणि बहीण बरी झाली. याच दिवशी दिलीपच्या आईने कस्तुरीने ठरवलं कि आता आपण इस्लाम धर्म स्वीकारायचा. पण आता इस्लाम स्वीकारला म्हणल्यावर नाव बदलावे लागतील असं सांगण्यात आलं. दिलीप परिवारासोबत एका ज्योतिषाकडे गेला.

ज्योतिषी हिंदू होता, नाव बदलण्याव्यतिरिक्त दिलीपच्या आईला मुलीच्या लग्नाबद्दलही विचारायचं होतं. ज्योतिषाने आधी दिलीपला बघितलं त्याला त्याच्यात काहीतरी वेगळं वाटलं. दिलीपला नाव बदलायचं होतं, आईने विचारलं कि दिलीप तुला कोणतं नाव आवडेल ? तेव्हा दिलीप म्हणाला अब्दुल रहमान किंवा अब्दुल रहीम. त्याचबरोबर हेही सांगितलं कि अब्दुल रहीम रहमान सुद्धा चालेल कारण एआर रहमान हे शुभ नाव आहे.

नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ए आर रहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक पुस्तकात रहमान सांगतो कि एका हिंदू ज्योतीषाने मला मुस्लिम नाव दिलं, हीच आपल्या देशाची विविधता मला भावते.

रहमान नाव दिलीपने ठेवले पण पुढे जाऊन अब्दुल रहीम ऐवजी अल्ला रख्खा हे कायम केले.

जागतिक संगीतात प्रवेश करण्याचा रेहमानचा प्रवास सुद्धा सुंदर आहे. एका जिंगलसाठी रहमानला अवार्ड मिळाला आणि त्या अवार्ड सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम हे सुद्धा उपस्थित होते, मणिरत्नम यांची भेट राह्मणशी झाली, रेहमानच कौतुक ऐकून ते भारावून गेले होते. रेहमानच काम आणि गाणं त्यांनी ऐकलं आणि रहमानला चित्रपटासाठी संगीत दे म्हणून साइन केलं. २५ हजार रुपयांमध्ये रेहमानने मणिरत्नम यांचा चित्रपट संगीतबद्ध केला.

१५ ऑगस्ट १९९२ साली रोजा चित्रपट आला. या चित्रपटाने सगळ्या जगाला दाखवून दिलं कि ए आर रहमान काय चीज आहे ते. रहमानला भलेहि कंप्यूटर जगातला संगीतकार मानतात मात्र त्याने आपल्या गाण्यातून असं कधीही जाणवू दिल नाही. भारतीय संगीत ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे मेलडी रेहमानने मेलडी सोडली नाही.

भारतात वंदे मातरम वरून अनेकदा वाद , चर्चा निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी रेहमानने सांगितलं होतं कि इस्लाम धर्मात मला शांतता मिळते, इस्लाम हे फक्त शांततेचं प्रतीक आहे. त्यावेळी कट्टर धर्मीय असलेल्या लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं आणि पुढे त्याचा अल्बम सुद्धा काढला.

सोनी म्युझिक कंपनीचा प्रचंड खपाचा हा अल्बम होता. देशभक्तीपर रेहमानची गाणी हि त्याने ज्या अंदाजात सादर केली आहेत ती सगळीच गाजली.

रहमान म्हणतो कि, सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे, देश माझ्यासाठी सर्वोच्च स्थानावर आणि सर्वप्रथम आहे. माझे वडील ज्यावेळी आजारी असायचे त्यावेळी आम्ही घरात पूजा करायचो , सगळ्या धर्माच्या देवांची प्रार्थना करायचो.

आज आपण बघतो कि रेहमान हा किती नामवंत कलाकार आहे, स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या अटीवर चित्रपटात संगीत देतो. याहीपेक्षा त्याच आपल्या मातीशी किती घट्ट नातं आहे हे त्याने ऑस्कर वेळी दाखवून दिलं होतं. ऑस्कर स्वीकारतेवेळी दीवार चित्रपटातील ‘ मेरे पास माँ हें ‘ हा डायलॉग तो म्हणाला आणि तेव्हा त्याने लोकांची मने जिंकली होती. त्याचबरोबर त्याने यातून आपली भारतीयताही  दाखवली होती.

माँ तुझे सलाम हे गाणं आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

स्वदेस, लगान, रंग दे बसंती चित्रपटातील त्याची गाणी देशाप्रती असलेलं प्रेम दर्शवतात. दिलीप ते रेहमान हा त्याचा प्रवास सुद्धा तितकाच रंजक आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.