शिंदेंनी सुचना दिलीये, पण १० कोटींचा खर्च मुंबईच्या फायद्याचा आहे का?

वायू प्रदुषणाचा विषय काढला की डोळ्यासमोर दिल्लीचं चित्र उभं राहायचं. पण ही परिस्थिती काही महिन्यांपुर्वीची आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्या मुंबई-पुण्यातील हवामान किती खराब झालंय हे सातत्यानं माध्यमांमध्ये दिसतंय.

काही वेळा तर, मुंबईतलं हवामान हे दिल्लीपेक्षा खराब असल्याची आकडेवारीही समोर आली होती.

त्यामुळे, मग मुंबईतलं वायुप्रदूषण नियंत्रणात आणणं गरजेचं असल्याचं बोललं जाऊ लागलं. मुळात हे वायुप्रदूषण वाढण्यामागची कारणं काय होती हे बघितलं तर, यंदा मुंबईत वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये बदल झाला होता, वाढतं बांधकाम आणि वाढलेली वाहनांची संख्या ही काही महत्त्वाची कारणं होती.

आता वाहनांच्या वाढत्या संख्येवर मर्यादा आणणं कठीण आहे तसंच, मुंबईतलं वाढतं शहरीकरण रोखणंही अशक्यच आहे. त्यामुळे, मुंबईतलं बांधकाम आटोक्यात आणणं ही शक्य नाही…

त्यामुळे, मुंबईतली हवा शुद्ध करता यावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर पालिकेला एअर प्युरिफायर टॉवर बसवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे, येत्या काळात मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे टॉवर्स फायदेशीर ठरतील असं बोललं जातंय.

मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्ली, गुडगाव, लखनौप्रमाणे मुंबईतही एअर प्युरिफायर टॉवर्स बसवावेत अशा सुचना मुंबई महापालिका आयुक्तांना दिल्यात. मुंबईचा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे, त्याच पार्श्वभुमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता वाढवणं, सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी सुविधा करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतुद केलेली असावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

मुद्दा आहे, तो एअर प्युरिफायर टॉवरचा.

माध्यमांमधल्या वृत्तांनुसार मुंबईत ५ ठिकाणी हे एअरप्युरिफायर टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. या ५ एअरप्युरिफायर टॉवर्ससाठी एकूण १० कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे टॉवर्स नेमके काय कशाप्रकारे काम करतात?

तर, दिल्लीत लाजजप नगर सेंट्रल मार्केटमध्ये अशाप्रकारचे एअर प्युरिफायर टॉवर बसवण्यात आलेत. त्या विचार केला तर, टॉवरचा खर्च हा जवळपास प्रत्येकी ७ लाख रुपये इतका होता. २० फूट उंच आणि सिलींड्रिकल आकाराचा असलेला हा टॉवर चालवण्यासाठीचा खर्च म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट ही महिन्याला जवळपास ३०,००० रुपये आहे.

या टॉवरच्या आतली मशिन हवेतले प्रदुषित घटक हे ८० टक्क्यांपर्यंत काढून घेते अशाप्रकारे हवेतलं प्रदुषण कमी ठेवण्यात हे टॉवर मदत करतात. प्रदुषित घटक काढून घेतल्यानंतर हे टॉवर स्वच्छ हवा बाहेर सोडतात.

हे टॉवर त्यांच्यापासून ५०० ते ७५० मीटर पर्यंतच्या परिसरातली हवा स्वच्छ करतात. दररोज अडीच लाख ते सहा लाख क्यूबिक मीटर हवेवर प्रक्रिया करणं आणि त्या बदल्यात ताजी हवा सोडणं हे प्युरिफायरचं उद्दिष्ट होतं.

जेव्हा हे प्युरिफायर बसवण्यात आले होते तेव्हाची ही आकडेवारी, पण आता तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे? आता ते टॉवर्स कितपत काम करतायत याबाबत थोडी माहिती बघुया.

नॅचरल रिसोर्स डिफेंस काउंसिलच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना म्हटलंय,

“प्रदूषण रोखण्यासाठी स्मॉग टॉवर पूर्णपणे कुचकामी आहेत. आउटडोअर प्युरिफायरची तुलना ही उन्हाळ्यात उघड्या जागेवर एअर कंडिशनर बसवण्याशी केली जाते. एका अभ्यासाने सुचवल्या नुसार, कोणताही प्रभाव पाडण्यासाठी अशा किमान  ४०,००० स्मॉग टॉवर्स किंवा प्युरिफायर्सची आवश्यकता असेल.”

याशिवाय अनेकांनी असं म्हटलंय की, हे टॉवर्स फक्च १०० मीटर इतक्या भागातली हवाच शुद्ध करू शकतात. त्यामुळे त्यांच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.

दरम्यान, मुंबईतल्या या एअर प्युरिफायर्सटं काम हे काम महापालिकेतर्फे आधीपासुनच सुरू असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय. हा झाला राजकारणाचा भाग, पण या पलिकडे जाऊन खरंच हे प्युरिफायर्स मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी फायद्याचे आहेत का याचा विचार करावा लागेल.

दिल्लीतल्या प्युरिफायर्सबद्दलचं नागरिकांचं मत बघता मुंबईसारख्या ठिकाणी ५ टॉवर्स बसवून फार काही फायदा होईल असं दिसत नसल्याचं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.