अर्ज किया है, विषय : अंगणाचे रणांगण करणेबाबत.

महोदय,

आपण सूचना केल्याप्रमाणे आम्ही अंगणाचे रणांगण हा कार्यक्रम आमच्या कॉलनीत आयोजित करायचे ठरवले आहे. त्यासाठी काल दुपारी बैठकही बोलवण्यात आली. पण कैरीचे पन्हे असेल तरच आम्ही येऊ असे पंचवीस पैकी एकवीस सदनिका धारकांनी कळविले. खरंतर पंचवीसपैकी सहा सदनिकाधारक मराठवाड्यातले आहेत. तेही कैरीचे पन्हे मागत होते.

तर काल अचानक एवढ्या सगळ्या कैऱ्या उपलब्ध होऊ न शकल्याने बैठक होऊ शकली नाही.

त्यात आमच्याकडे एक राष्ट्रद्रोही डॉक्टर राहतात. कोरोनाचा एवढा कहर असताना बैठक घेण्याचे कसे काय सुचले तुम्हाला म्हणून त्यांनी आम्हालाच फैलावर घेतले. खरतर डॉक्टरांनी आपल्या कामास काम ठेवावे. राष्ट्र उभारणीच्या कामात अडथळा आणू नये. पण हल्ली कुणीही काहीही उपदेश करतो.

मागे मोदिजीनी थाळी वाजवायला सांगितली तेंव्हा आम्ही आठ दहा लोकच ताट आणि चमचा घेऊन शिस्तीत वाजवत होतो. पण उत्साह आणि उर्जा काही मनासारखी निर्माण होत नव्हती. मग पिंगळे म्हणाले की शांताबाईचा ठेका धरूया. तर ते अतिशय अप्रस्तुत आणि अस्थानी वाटत असूनही आणखी दोघांनी त्याला मंजुरी दिली.

आणि कोरोनासाठीच्या थाळी वादनात शांताबाई वाजवण्यात आले.

[ अर्थात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या हिची मामे बहिण तर पदर खोचून नाचायला लागली. अर्थात आमच्या हिने मात्र शिस्तीत फक्त थाळी वाजवली. अर्थात आमच्या हिचा एक मुद्दा बरोबर होता. थाळी वाजवायला एवढी साडी वगैरे नेसून यायची काही गरज नव्हती.]

तर मूळ मुद्द्यावर येतो. डॉक्टरांनी सांगितले तरी आम्ही त्याकडे कानाडोळा करून संध्याकाळी चालायला जम्ल्याच्या निमित्ताने सोसायटीत फेऱ्या मारता मारता बैठक घेतली.

त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपणास कळविणे आवश्यक आहे असे वाटले म्हणून लिहितो.

  १ ) चिखले असं म्हणाले की

अंगणाचे रणांगण वगैरे मराठी साहित्यात संदर्भ आहेत. पण ते कैदाशीण ज्यांना आपण भांडकुदळ म्हणतो अशा बायका आणि बेवडा आपण ज्याला व्यसनी वगैरे म्हणतो असे लोक यांच्यासंदर्भात आहेत. हे लोक अंगणाचे रणांगण करतात असा अनुभव आहे. यावर अर्थातच मी आणि वैभव खूप प्रतिवाद केला.

पण चिखले यांचे मराठी साहित्याचे वाचन प्रचंड असल्याकारणाने आम्ही कमी पडलो. खरेतर चर्चा वूडहाउस किंवा मिल्स and बून्स सिरीजवर असती तर आम्ही तिघे चौघे पुरून उरलो असतो. पण मूळ मुद्दा असा की अंगणाचे रणांगण ही गोष्ट जरा खटकणारी आहे.

२) आमच्या हिला मी म्हणालो की,

आपल्याला अंगणाचे रणांगण करायचेय. तर ती मला आधी चावटपणा पुरे करा म्हणाली. नंतर मी ठामपणे आपल्याला अंगणाचे रणांगण करायचेच आहे म्हणालो तर तिला मी पुरुषार्थाबद्दल काही बोलतोय असे वाटले. नंतर मी तिला आपली सविस्तर योजना सांगितली.

तर ती म्हणाली मी काय तसली वाटले काय? एकूण काय तर अंगणाचे रणांगण वगैरे चावट वाटण्याची शक्यता पण गृहीत धरायला हवी.

३)  घरच्या बायका तयार नाहीत म्हणून मग बाहेर संपर्क सुरु केला.

मागे प्रचाराच्या काळात आपण काही बायकांना साड्या वाटल्या होत्या. त्यांना फोन करून बघितले. तर त्यांनी त्या साड्यांचे मास्क करून विकले असे लक्षात आले. आणि त्या मास्क करायच्या पण कामाच्या नव्हत्या असेही म्हणाल्या. ही गोष्ट मनाला वेदना देऊन गेली.

खूप वेळ आम्हा चौघा पाच जणांचे मन खट्टू झाले. मग अशावेळी गेल्या दोन महिन्यात आम्ही एका कोपऱ्यात जाऊन तुमची क्लिप बघितली. ती काही अश्लील नाही. पण काही कुत्सित लोक तुम्हा लोकांच्या क्लिप बघताना मुद्दाम आमच्याकडे बघून हसतात. हे अतिशय असहिष्णू वातावरण आहे. कोरोनापेक्षा या गोष्टीचा हल्ली जास्त त्रास होतो.

हल्ली कुणी खोकल्याचा एवढा त्रास होत नाही जेवढा कुणी हसल्याचा होतो. मुळात लोक हसूच कसे शकतात.

मयुरेश तर म्हणाला नोटबंदीनंतर पहिल्यांदा एवढे हसताना बघतोय लोक. एकूण या हसण्याचे काहीतरी केले पाहिजे. मुलगा इस्त्रायलला असतो माझा. त्याला विचारलं या हसणाऱ्या लोकांवर काही उपाय आहे का? पण इस्त्रायलची पण या विषयात अजून काही प्रगती नाही. म्हणजे हे हसण्याचे शस्त्र निष्प्रभ करण्यासाठी ट्रम्प यांना विनंती करावी लागेल.

तर सांगायचा मुद्दा हा की आपली क्लिप बघितली. राष्ट्रकार्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात या आपल्या तेजस्वी विचाराने पुन्हा मनाला उभारी दिली. पण शेवटी काय तर साड्या घेऊनही बायकांनी अंगणात रणांगण करायला नकार दिला.

४) काही मित्रांना फोन केले.

तर त्यांनी घराच्या वाटण्या होतात तेंव्हा गावाकडे कसे अंगणाचे रणांगण होते वगैरे आठवणी काढून भाऊक केलं. त्यातही घरातला जो कुचकामी भाऊ असतो किंवा कजाग बाई असते तिच्यामुळे घर फुटते आणि अंगणाचे रणांगण होते असाही सगळ्यांचा अनुभव आहे. तर त्यांनाही अंगणाचे रणांगण करावे या गोष्टीत उत्साह नाही.

५) शेवटी एक सामाजिक कार्य करणारे वैद्य म्हणून आहेत. त्यांना फोन करून विनंती केली,

की अंगणाचे रणांगण करायचा बेत आहे. तर ते म्हणाले करायचेच असेल तर अंगणाचे उद्यान करा. अंगणाचे मुलांसाठी मैदान करा. रणांगण करायला टिपऱ्या तरी नीट खेळता येतात का तुम्हाला? मागच्या नवरात्रीत मी गरबा खेळताना एका आडदांड माणसाने जोरात माझ्या करंगळीवरच टिपरी मारली. करंगळी अंगठ्याएवढी झाली होती.

त्यावर गोमुत्र लावा असा एकजण म्हणाला होता. मी एका शेजाऱ्याला विचारले तर तो म्हणाला लहानपणी जखम झाली की आम्ही स्वतःच सु करायचो जखमेवर. एकूण आपल्याकडे आरोग्यसुविधेच्या नावाने बोंबच होती एवढी वर्षं. स्वतःची स्वतः सु करायची म्हणजे किती रानटीपणा. गोमुत्र ठीक आहे.

पण एकूण मला टिपऱ्याही खेळता येत नाहीत हे सगळीकडे झालं. त्यावर मी पुढच्या वेळी जोर लावून टिपऱ्या खेळणार आहे. माननीय मोदिजींच्या राज्यात केवढी समृध्द परंपरा आहे

टिपऱ्याची. मी तर ऐकलय की लवकरच राष्ट्रीय खेळ वगैरे पण होऊ शकतो गरबा. तर मूळ मुद्दा असा आहे की सामाजिक कार्यकर्ते पण नाही म्हणाले.

६) सगळ्या थरातून होणारा विरोध बघता या योजनेच्या नावात काही बदल करता येईल का? आमचे अभ्यासू मित्र म्हणाले की,

रणांगण म्हणाल्यावर पळ काढणारेच खूप आहेत. त्या ऐवजी वेगळा शब्द का वापरत नाही? तसंही अंगण म्हणाल्यावर रांगोळी, तुळस अशी जुनी परंपरा आहे. नव्या परंपरेतही छापाची का होईना रांगोळी उरलेली आहे. अजूनही पेपरवाल्याला पन्नास वेळा सांगूनही नेमका पेपर दारातच पडलेला असतो पायपुसणी पाशी. खुपदा आपल्याच लोकांचे फोटो असतात.

गेली काही वर्षं पहिल पान सोडलं नाही आपल्या लोकांनी. पण वर्तमान पत्र अंगणात पडलेलं बघून मन गलबलून येतं. असो. वर्तमानपत्रातले फोटो अंगणात पडणे वेगळी गोष्ट आहे. पण आपणच अंगणात पडावे हे काही बरे नाही. म्हणजे रणांगण असा उल्लेख आहे तर नुसते बसून राहणेही बरे दिसणार नाही.

आणि काळे मास्क घालण्याची शेजारील घरातून एक सूचना आहे. तिचा विचार व्हावा. बाकी आपले आदेश आम्ही पाळणारच. आपण आमच्या सूचनांचा नक्की विचार कराल अशी खात्री आहे. सध्या आपले सरकार नसल्याने काही मागणी करण्याचा प्रश्न नाही.

पण कोशारी काकांना भेटायची खूप इच्छा आहे. तेवढी घडवून आणावी. कितीवेळा रात्री बेरात्री उठावे लागले त्यांना सत्तास्थापनेच्या वेळी. पण हू नाही की चू नाही. नाहीतर आम्ही सु ला पण उठत नाही मध्यरात्री. या सवयीमुळे प्रोस्टेटचा त्रास सुरु आहे. आणी हल्ली गोळ्याही वेळेवर मिळत नाहीत. असो.

कोरोनापण खूप वाढत चाललाय. एकदा अंगणात रणांगण झालं की त्यावर बोलूया सविस्तर. माननीय मोदीजी आहेत तोपर्यंत देशाची काळजी नाही. फक्त महाराष्ट्राची चिंता वाटते. असो.

                                                                       आपला निष्ठावान 

अर्जबाजारी 

Leave A Reply

Your email address will not be published.