एका मराठी पोराच्या स्टार्टअपमध्ये थेट रतन टाटा यांचे ५०% शेअर्स आहेत.

टायटल वाचूनच तुम्हाला काही अंदाज आला असेल कि, आम्ही नेमकं काय सांगणार आहोत…पण त्यामागची सगळी स्टोरी देखील समजून घ्या…कसंय अर्धवट वाचू नये अन समजू नये म्हणून थेट स्टोरीला सुरुवात करते.

ठाण्यातला अर्जुन देशपांडे नावाच्या १६ वर्षाच्या पोराने एक स्टार्टअप सुरु केलं होतं. आत्ता हाच पोरगा १९-२० वर्षाचा असेल साधारण…..त्याने जेनेरिक आधार’ ही कंपनी काढली होती…म्हणजे अजूनही आहे. चांगलीच यशस्वी झाली आहे. त्यात एक मोलाचा टप्पा ठरला तो म्हणजे रतन टाटा यांचा अर्जुन देशपांडेच्या स्टार्टअपमध्ये हिस्सा आहे. आता रतन टाटा हे नाव देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील मोठं आहे.  

एवढ्या भल्या माणसाने अर्जुनच्या कंपनीमध्ये हिस्सा खरेदी केला म्हणजे नक्कीच भारी काहीतरी स्टोरी असेल.

रतन टाटांसारख्या मोठ्या उद्योजकाला भुरळ पाडणाऱ्या ह्या बिझनेस मॉडेलमध्ये नक्की असं काय आहे तसच हि अर्जुनची हि ‘जेनरिक आधार’ कंपनी काय आहे? आणि हि जेनेरिक औषध म्हणजे काय?

एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर शोधल्या गेलेल्या फॉम्र्युलानुसार औषध तयार केले जाते. कोणत्याही रोगावर औषध शोधण्यासाठी औषध बनवणाऱ्या कंपन्या खूप सारे पैसे शोधकार्यात गुंतवतात. गोळ्या, इंजेक्शन, लस, क्रीम अथवा ड्रॉप्स बाजारात आणले जातात. बाजारात आणताना ह्या औषधांची बनवण्याची किंमत जरी कमी असली तरी त्यात गुंतवलेल्या पैश्याचा नफा म्हणून ही औषध बाजारात चढ्या भावाने विकल्या जातात. पण ह्यासाठी प्रत्येक सरकार अशा प्रकारच्या नवीन औषधाला काही वर्षासाठी पेटंट हक्क देते.

 औषधांची किंमत प्रचंड प्रमाणात कमी करता येते. कमी किमतीत ही रिटेलर आणि केमिस्टच कमिशन,कंपनी आपला नफा कमावून ही औषधे जवळपास ५० ते ८० टक्के कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. अशाच औषधांना जेनेरिक औषध असं म्हणतात.

भारत देश असे जेनेरिक औषध बनवणारा जगातील सगळ्यात मोठा उत्पादक आहे.

जगातील ६० टक्के जेनेरिक औषध आणि लसींचा वाटा हा भारताचा आहे….आणि त्यात एक उद्योजक म्हणजे अर्जुन देशपांडे होय.

त्याला या उद्योगात पाउल टाकायचे वयाच्या १५-१६ व्या वर्षीच कळले. त्याला कारणीभूत ठरले ते म्हणजे, अर्जुनची आई देखील औषधांच्या सेवा क्षेत्रात काम करत असत. तेंव्हा त्यांच्याबरोबर  उन्हाळाच्या सुट्टीत अनेक देशात फिरण्याची संधी अर्जुनला मिळाली. तेंव्हा अर्जुनला जाणवलं की भारतात अजूनही जेनेरिक औषध देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहचलेले नाहीत. आणि मग अर्जुनने ‘जेनेरिक आधार’चा शोध लावला आणि कंपनी स्थापन केली.

देशपांडे यांनी स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्या त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या निधीच्या जोरावर हा व्यवसाय सुरू केला. वर सांगितल्यानुसार, त्याच्या आईची एक फार्मास्युटिकल मार्केटिंग कंपनी आहे जी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात औषधे विकते. आणि वडील ट्रॅव्हल एजन्सी चालवतात. अमेरिका, दुबई आणि इतर काही देशांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फार्मास्युटिकल इव्हेंट्समध्ये सहभागी होताना आईसोबत व्यवसाय करण्याची कल्पना त्यांना सुचल्याचे देशपांडे सांगतात….

अवघ्या दोन वर्षात ‘जेनेरिक आधार’ची उलाढाल ६ कोटींपर्यंत वाढला…..आपण त्या टप्प्यावर पोहचलो तेंव्हा आपल्या यशाचा एक आलेखच अर्जुनने रतन टाटा ह्यांना दाखवलं…याच उद्देशापोटी कि, भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेनेरिक औषध पोहोचावं.

त्याचवेळी उद्योजक रतन टाटा यांनी हे जेनेरिक आधार’चं बिझनेस मॉडेल आवडलं आणि फिक्स केलं कि आपण यात गुंतवणूक करावी.

पण या माघे आणखी २ कारणे अशी कि, ‘जेनेरिक आधार’मध्ये पैसे गुंतवण्याची दोन करणे म्हणजे ‘जेनेरिक आधार’ची वाढती लोकप्रियता आणि भारतातल्या कानाकोपऱ्यात पोहचणारं बिझनेस मॉडेल…तसेच इतर ऑनलाइन फार्मसीच्या तुलनेत जेनेरिक आधार आपली औषधे बाजारभावापेक्षा खूपच स्वस्तात विकतो.

याच बिझनेस मॉडेलमध्ये रतन टाटा यांनी ५० टक्के हिस्सा खरेदी केला आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी या कंपनीत खासगी गुंतवणूक केली आहे. ते टाटा समूहाशी संबंधित नाही. रतन टाटा यांनी यापूर्वी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युरफिट, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायब्रेट यासारख्या अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

कंपनी सुरु करून काहीच वर्षांत जेनेरिक आधारावर १,००० लहान फ्रँचायझी मेडिकल स्टोअर्स उघडण्याची योजना आहे असं संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी सांगितलं आहे. त्यातल्या काही शाखा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.