अरनॉल्डने नाद केला म्हणून हमर जन्माला आली..

असं म्हणतात तुमची गाडी तुमची आयडेंटिटी असते. एम-८० वर बसून तालमीत येणारे पहिलवान आणि यामाहाची पुंगळी काढून शाळेला जाणारे हेडमास्तर हे म्हणजे मटणाबरोबर तांबड्या पांढरया ऐवजी आमरस भुरकन मारल्यासारखं आहे.

काही गोष्टी जातिवंतालाच शोभतात. गावचा पाटील येण्याआधी त्याच्या फटफटीचा आवाज पोहचला पाहिजे. गांधी टोपी वाला राजकारणी अँबेसेडर मधून फिरत असला तर त्याचा गावच्या पोरींवर वाकडी नजर ठेवणारा व्हिलन पोरगा जीपातूनच फिरला पाहिजे. असा गाव गाड्याचा नियमच राहिलाय.

हेच म्हणणं होतं जगातल्या सगळ्या बॉडी बिल्डर लोकांचं दैवत असणाऱ्या अरनॉल्डच.

गोष्ट आहे १९९० सालची. मिस्टर ऑलिंपिया ७ वेळा जिंकणारा अरनॉल्ड भाऊ आता फिल्म लाईनमध्ये उतरला होता. म्हणजे या आधी बॉडी बिल्डिंग करत असताना त्याने छोटे मोठे रोल केले होते पण आता पूर्ण वेळ हॉलिवूड हेच घर केलेलं. त्यात टर्मिनेटर सारखा जास्त एक्स्प्रेशन द्यायला न लागणारा पिक्चर त्याला मिळाला आणि त्याच आयुष्य बदलून गेलं. टर्मिनेटरमुले अरनॉल्ड सुपरहिट झाला अगदी भारतात खेडोपाडी तालमीत जाणारे पोरंटोरं सुद्धा त्याचा फोटो जिमच्या भिंतीवर लावू लागली.

बॉडी करणारे पहिलवान फिल्म लाईनमध्ये चालत नाहीत हे दारासिंग नंतर अरनॉल्डने खोट ठरवलं होतं.

जिकडं जाईल तिकडं अरनॉल्डची हवा होती. त्याच नाव असलं तर भंपक सिनेमे देखील चालत होते. खोऱ्याने पैसे कमवत होता. टर्मिनेटरचे पुढचे पार्ट येत होते. एकूणच अरनॉल्ड दादाचे पाचही बोटं तुपात होते.

सुपरस्टार अरनॉल्ड एकदा किंडरगार्डन कॉप नावाच्या सिनेमाचं शूटिंग करत होता. एक अंडरकव्हर पोलीस ऑफिसर बालवाडीच्या शाळेत टीचर म्हणून गेला तर काय गोंधळ उडेल ही स्टोरी होती. शूटिंग ऑरेगॉन नावाच्या राज्यात सुरु होतं. तिथल्या हायवे वर अरनॉल्डचे काय तरी स्टंट सिन होणार होते.

एक दिवस सुरु असलेलं शूटिंग अचानक थांबवण्यात आलं. कारण काय तर तिथून यूएस मिलिटरीचा कॉन्व्हॉय पास होणार होता. अरनॉल्ड सकट सगळं युनिट ब्रेक घेऊन कॉन्व्हॉय पास होण्याची वाट पाहू लागले.   

काही मिनिटातच धाडधाड आवाज करत मिलटरीच्या गाड्या आल्या. संध्याकाळच्या वेळी आपल्या बेस कॅम्पकडे ते निघाले होते. यात ट्र्क होते, ऑफिसरच्या जीप होत्या आणि इतर मिलिटरीच्या गाड्या होत्या. रस्त्यावर उभे असलेला प्रत्येकजण देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या जवानांना सलाम ठोकत होता.

अरनॉल्डच लक्ष मात्र त्या कॉन्व्हॉयमध्ये असलेल्या एका विशिष्ट गाडीकड होतं. ती गाडी छोट्या रणगाड्या प्रमाणे दिसत होती. या गाडीला बघून अरनॉल्ड उद्गारला,

“Look at those deltoids; look at those calves”

आकाराने महाकाय, भले मोठे टायर, ऐटदार चाल, रांगडा लूक बघून अरनॉल्ड महाशय या गाडीच्या प्रेमातच पडले. गाड्या जर दोन टाइम जिम मारायला लागल्या तर त्यांची बॉडी कशी दिसेल तशी ही गाडी होती. चौकशी केल्यावर कळालं या गाडीचं नाव हमव्ही असं होतं.

एखादी पोरगी आवडली कि नादिष्ट माणसं तिच्या माग माग फिरू लागतात तस अरनॉल्डच झालं. आपल्या वाड्यावर हमव्ही दिसलीच पाहिजे हे त्याच्या डोक्यात वेड घुसलं. पण मिलिट्रीची गाडी असल्यामुळे विकत घेता येत नव्हतं. 

त्याचा एक दोस्त गाड्या मॉडिफाय करायचा. अरनॉल्डने त्याला फोन लावला आणि अशी अशी एक गाडी आवडली आहे, ती सेकंड हॅन्ड कुठं मिळते का बघ आणि मॉडिफाय करून  दे असं सांगितलं.

तर तो दोस्त म्हणाला,

“अरण्या भावा येडा झालास कि खुळा. हि गाडी फक्त मिलिटरीवाल्यांसाठी आहे. आपल्याला ती सेकंड हॅन्डपण विकत घ्यायची परवानगी नाही. तुला गाडी बनवून दिलो तर मला जेलची हवा खावी लागील..”

अरनॉल्ड बापू निराश झाले. पण रात्रंदिवस हमव्हीच स्वप्न पडायचं. आपण एवढा मोठा सुपरस्टार, जगातला सर्वात ताकदवादन माणूस आणि एक गाडी विकत घ्यायला येत नाही तर थू आमच्या जिंदगानीवर असं त्याला वाटायचं. हा बैल आपल्या गोठ्यात पाहिजे लेका हे डायलॉग डोक्यात फिट बसले होते.

एक दिवस तो थेट हमव्ही बनवणाऱ्या AM General या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन थडकला.

तिथे त्याने त्यांच्या मॅनेजरला वगैरे भेटून मला हमव्ही पाहिजे वगैरे सांगितलं. कंपनीच्या मालकाने गाडी मिळणार नाही आणि तुम्ही सेकण्ड हॅन्ड मॉडिफाय करून घेतला तर तुमच्या विरुद्ध केस करेन वगैरे सांगितलं. अरनॉल्ड त्यांना हि गाडी नागरिकांना देखील मिळायला पाहिजे म्हणून अंगात होता तर कंपनीवाले ती साध्या रस्त्यांवर चालू शकत नाही हे सांगत होते. बराच वेळ वाद झाला.

पण अरनॉल्ड मागे हटणारा भिडू नव्हता. तो हट्टाला पेटला.

कंपनीवाले सांगत होते की आमचं यूएस गव्हर्मेंट बरोबर करार झाला आहे. १९७९ साली दुसऱ्या महायुद्धावेळी पासूनच्या पण आता आऊटडेटेड झालेल्या जीपच्या जागी दमदार हमव्ही बनवण्यात आली होती. ती प्रवाशी वाहतुकीसाठी नव्हती तर हॉवित्झर तोफा बसवलेल्या हमव्हीचा वापर युद्धात एखाद्या रणगाड्याप्रमाणे केला जायचा. तिचे तब्बल सतरा प्रकार बनवण्यात आले होते. मिसाईल करियर म्हणून देखील हमव्ही वापरली जात होती.

यूएस आर्मीची बॅट मोबिल म्हणून हमव्हीला सगळं जग ओळखायचं.

अरनॉल्डने मात्र ही हमव्ही मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक केलं. तो तसाही डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारण्यामध्ये उठबस करायचाच. असं म्हणतात की पार राष्ट्राध्यक्षापर्यंत त्याने आपलं वजन वापरलं.

अखेर एएम जनरल कंपनीने वैतागून त्याच्यासाठी एक सॅण्ड कलरची खास हमव्ही मिशिगनच्या कारखान्यात बनवून लॉस एंजलिसला पाठवून दिली.

आपल्या बेडकुळ्या दाखवत अरनॉल्ड हॉलिवूडच्या रस्त्यांवर मिलिटरी स्टाइलच्या हमव्हीमधून फिरू लागला. त्याची गाडी बघायला ट्राफिक जाम होऊ लागलं. अरनॉल्डने दाबात येऊन कंपनीला आपल्या गाडीच्या पब्लिसिटी बद्दल सांगितलं. अजूनही त्याच म्हणणं होतं कि तुम्ही फक्त मलाच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाला घेता येईल अशी गाडी बनवा.

शेवटी एएम जनरल कंपनीच्या डोक्यात प्रकाश पडला.  

अरनॉल्डमुळे संपूर्ण जगात बॉडी बिल्डिंगची क्रेझ आलेली. हार्ले डेव्हिडसन सारख्या व्हिंटेज गाड्या हि रांगडी लोक फिरवत होती. या लोकांना शोभेल अशा एसयूव्ही सेक्शन मध्ये मोठा वाव आहे. आता आपण मिलिटरी बरोबरच सिव्हिल ऑटोमेटिव्ह सेक्शनमध्ये उतरलं पाहिजे.

१९९२ साली एएम जनरल कंपनीने हमव्हीमध्ये काही बदल केले आणि नवी गाडी जन्माला घातली,

तिला नाव देण्यात आलं हमर

अरनॉल्डने भविष्यवाणी केल्या प्रमाणे हमर प्रचंड गाजली. १९९९ साली जनरल मोटर्सने या गाड्यांच्या विक्रीचे हक्क स्वतः कडे घेतले. हमर १ त्यांनी मार्केटमध्ये भरपूर चालवली. पुढे हमर २, हमर ३ या गाड्या देखील बनवल्या. फक्त अमेरिकेतच नाही तर पार रशिया मध्ये हमर प्रचंड फेमस होती. तिथे देखील जनरल मोटर्सने हमरचा कारखाना सुरु केला.

सेलिब्रिटी लोकांमध्ये तर हमर घेण्याचं वेडच लागलं होतं. पार त्याची लिमोझीन बनवण्यापर्यंत मजल गेली होती. जगातल्या प्रत्येक स्टारच स्वप्न स्वतःची हमर घ्यायची हेच असायचं.  

पण दुर्दैवाने २००९ साली कंपनी तोट्यात गेली. क्वालिटी आणि किंमत यांचा ताळमेळ कंपनीला राखता आला नाही. या नादखुळा गाडीचं प्रोडक्शन थांबवण्यात आलं. अनेकांना यामुळे धक्का बसला.

गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु झाली की जनरल मोटर्स पुन्हा हमर घेऊन येतीय. यावेळी इलेक्ट्रिक व्हर्जन. २०१७ साली अरनॉल्डच्या हस्ते या गाडीचं प्रोटोटाइप रिलीज करण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात हि गाडी साकार होईल का याची खात्री नव्हती. एवढी मोठी दमदार गाडी इलेट्रीक बॅटरीवर चालू शकेल का हे कोणालाच माहित नव्हतं.

२०२० च्या जानेवारीमध्ये या इव्ही हमरचे शॉर्ट टिझर इंटरनेटवर रिलीज करण्यात आले. ती येतीय ते हि धडाक्यात याचा नादखुळा प्रचार करण्यात आला होता. पण दुर्दैवाने कोरोना व्हायरस आला आणि सगळं गणित बिघडलं.  

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.