हमखास मिळणाऱ्या नफ्यामुळे गाजत असलेली नगरच्या शेतकऱ्याची अत्तराची शेती….

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मच्छिन्द्र चौधरी यांनी अत्तराची शेती उभारली आहे. अगदी जागतिक बाजारपेठेत सुद्धा त्यांच्या शेतातल्या उत्पादनांचा दबदबा आहे. नक्की हि अत्तराची शेती काय आहे आणि बाजारपेठेत इतकी मागणी का आहे याविषयी जरा जाणून घेऊया. मछिंद्र चौधरी यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलेली हि माहिती.

अकोल्याच्या अंभोळ गावात मच्छिन्द्र चौधरी जिरेनिअमची शेती करतात. या प्रकारच्या शेतीला ऍरोमॅटिक फार्मिंग असेही म्हणतात. एम एस्सी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शेतीत विशेष लक्ष घातलं. पारंपरिक शेतीत कांदा, टोमॅटो, बटाटा अशी बेभरवशाची पिके घेत असताना त्यांना जिरेनियमच्या शेतीची कल्पना आली.

मच्छिंद्र यांना बावीस वर्षांचा मुंबईत सांडपाणी व्यवस्थापन कामांचा (वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) अनुभव होता . त्यांची या क्षेत्रातील कंपनीही आहे. आपल्या कंपनीतील सांडपाण्याला उग्रवास येत असताना मुंबई स्थित एका कंपनीच्या प्रकल्पातील सांडपाण्याला मात्र सुगंध येत असल्याचे त्यांच्या निरीक्षणास आले. त्यामागील कारण जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. यातून त्यांना ऍरोमॅटिक फार्मिंगची ओळख झाली.

मुंबई, लखनौ आदी भागांतून त्यांनी रोपे आणली. सुरवातीला उत्पादन घेण्यात तांत्रिक अडचणी आल्या पण अनुभवातून शिकत मार्ग काढला आणि बाजारपेठेतील मागणी व आपल्या कामाचा आवाका लक्षात घेत लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली.

शेतीत केवळ जिरेनियम न पिकवता वाळा, लेमनग्रास आणि गवतीचहा अशी पिकं घेतली. दर तीन महिन्याला या जिरेनिअमच्या पिकाची कंपनी केली जाते, याच पिकाच्या फांद्यांपासून रोपं बनवली जातात. एका एकरात जवळपास दहा हजार रोपं लागतात. वर्षभरात चार वेळा या पिकाची कापणी असते आणि पुढची तीन वर्ष तेच झाड कापणी करून पुन्हा वाढवलं जातं. त्यामुळे पुन्हा लागवड आणि मेंटेनन्स असा कोणताही खर्च शेतकऱ्याला येत नाही.

सुरवातीला जिरेनिअमची शेती करण्यासाठी एकरी खर्च हा ७०-८० हजारच्या आसपास येतो. या जिरेनिअमच्या पिकातून तेल काढून झाल्यानंतर त्याच्या उरलेल्या भागातून खत तयार होतं आणि मछिंद्र चौधरी त्याच ऑरगॅनिक मॅन्युअर बनवतात. इतर पिकांपेक्षा सरासरी ७५% खर्च हा जिरेनिअमच्या शेतीला कमी लागतो. गवत पीक असल्यामुळे आणि ऍरोमॅटिक असल्यामुळे जनावरांपासून या पिकाला धोका नसतो.

मच्छिन्द्र चौधरी यांनी १० एकरमध्ये जवळजवळ सहा हजार शेवग्याची झाडे लावली आहेत, शेवग्याच्या झाडातून मिळणारा नफा ते जिरेनिअमच्या शेतीला मेंटेंनन्स म्हणून वापरतात. पहिल्या वर्षी जिरेनिअमच्या शेतीतून तब्बल ३० किलो ऑइल एकरी प्राप्त होतं. एका एकरमध्ये ३५-४० लिटर ऑइल सापडत.

जिरेनिअमच्या शेतीतून मिळणाऱ्या ऑईलची किंमत जागतिक बाजारपेठेत १२५०० रु किलो आहे. साडेचार ते पाच लाख रुपयांचं ऑइल हे एका एकरातून शेतकऱ्याला मिळतं.

जिरेनिअमच्या पिकाबरोबर अंतरी पीक शेवगा घेतल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतीचा खर्च सहज केला जातो.

भारतात कॉस्मेटिक क्षेत्रात जिरेनियम ऑइलपासून कॉस्मेटिक, परफ्युम बनवले जातात. जिरेनियम तेलापासून उच्च दर्जाचे आणि नैसर्गिक अत्तर तयार होते. भारतात जिरॅनियम ऑईलची मागणी हि २००-३०० टन इतकी आहे पण भारतात दहा टनांच्या वर हे ऑइल बनत नाही. अनेक उपयोग आणि लॉन्ग टर्म फायद्यासाठी हे पीक अतिशय फायद्याचं आहे.

डिस्टिलेशन मशीनद्वारे जिरेनिअमच तेल काढलं जात तेही सोप्या पद्धतीने,उरलेलं मटेरियल हे खत म्हणून वापरलं जातं. स्प्रे, अत्तर, परफ्युम अशा या गोष्टींना जिरेनिअमचं तेल लागतच. परदेशातूनही या तेलाला मोठी मागणी असते.

निश्चित फायदा आणि नुकसानाची शक्यता अतिशय कमी असलेलं हे पीक आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जिरेनिअमची शेती करून फायदा करून घ्यावा असं आवाहन मछिंद्र चौधरी करतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि मार्गदर्शनासाठी आपण कायम उभे आहोत असं ते सांगतात.

सध्या मुंबई येथील ‘परफ्युम व कॉस्मेटीक’ क्षेत्रातील एका कंपनीला करार पद्धतीने
तेलांचा पुरवठा केला जात आहे. सुगंधी तेलांना बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
तेलाचा ‘फ्रॅग्रन्स’ व ‘फ्लेवर’ यांना मोठे महत्त्व आहे. कमी मनुष्यबळ असलेली शेती आणि जास्त नफा असलेली हि ऍरोमॅटिक फार्मिंग आहे.

मच्छिंद्र चौधरी यांचे बंधू अनिल यांचे मोठे पाठबळ त्यांना आहे. नातेवाईक युवराज कुटे शेतीचे व्यवस्थापन पाहतात. बीएस्सी ॲग्री, एमबीए पर्यंत त्यांचे शिक्षण झाले अहे. त्यांचे मंचर (जि. पुणे) येथे कृषी सेवा केंद्रही आहे.

शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सुगंधी पिकांची लागवड फायदेशीर असल्याचं मछिंद्र चौधरी यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.