कलम १८८, ज्यामुळे राज्यपालांनी दिवसभर ममता बॅनर्जींचा जीव टांगणीला लावला होता…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच विधानसभा पोट निवडणुकीत भवानीपुर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे कालपर्यंत तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नसल्याचं मानलं जात होतं. पण आजचा सूर्य उगवला आणि निवडून येऊन देखील अजूनही मुख्यमंत्रीपदाचा धोका टळला नसल्याचं समोर आलं.

कारण ठरलं राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममतांच्या आमदारकीच्या शपथविधीत निर्माण केलेला एक पेच.

आता हा पेच काय होता? तर राज्यपाल धनखड यांनी निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार स्वतःजवळ घेतला. आणि यासाठी त्यांनी संविधानातील कलम १८८ चा दाखला दिला. 

इकडे राज्य सरकार ७ ऑक्टोबरपर्यंत नवीन सदस्यांना शपथ देण्यात यावी यावर अडून बसलं होतं आणि कलम १८८ नुसार राज्यपाल म्हणाले कि विचार करून तारीख कळवू. म्हणजेच ७ तारखेला अपेक्षित असलेला शपथविधी होणार नाही हे स्पष्ट झालं होतं. आणि जोपर्यंत निवडून आलेला सदस्य शपथ घेत नाही तो पर्यंत तो अधिकृत आमदार म्हणवला जात नाही.

त्यामुळेच आज दिवसभर राज्यपालांनी कलम १८८ चर्चेत आणले होते.

नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ? 

एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल लागला २ मे रोजी. त्या निकालात तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला पण पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. त्यामुळे तृणमूलची अवस्था गड आला आणि सिंह गेला अशी झाली होती.

ममता यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, जिथं त्यांना तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभूत केलं होतं.

पण यानंतर संविधानांमध्ये असलेल्या ६ महिन्यांपर्यंतच्या सवलतीचा फायदा घेत ममता दीदी ५ मे रोजी मुख्यमंत्री झाल्या. पण आता ६ महिन्यानंतर देखील खुर्चीवर राहण्यासाठी ५ नोव्हेंबर पर्यंत आमदार होणे त्यांना बंधनकारक होते. तिथं सध्या विधानपरिषद अस्तित्वात नसल्याने त्यांना विधानसभेवरच विजय मिळवावा लागणार होता.

अशात २१ मे रोजी तृणमूलचे नेते सोमदेब चट्टोपाध्याय यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ममतांसाठी भवानीपुरची जागा रिकामी केली. इथं ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक झाली आणि ३ ऑक्टोबरला निकाल लागले यात ममता बॅनर्जी निवडून आल्या. म्हणजेच त्यांचा मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला.

पण अशातच शपथ ग्रहणामध्ये राज्यपालांची एंट्री झाली… 

ममता बॅनर्जी यांची इच्छा होती की त्यांना दुर्गा पूजेपूर्वी आमदारकीची शपथ देण्यात यावी. त्यामुळे ७ ऑक्टोबरला आमदारकीच्या शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण इतक्यात बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड फ्रेममध्ये आले. त्यांनी संविधानाच्या कलम १८८ चा वापर करून आमदारांना शपथ देण्याचा अध्यक्षांचा अधिकार बिमान बॅनर्जी यांच्याकडून काढून घेतला.

आणि सांगतले की आता ते स्वतः राजभवनात नवीन आमदारांना शपथ देतील. मात्र हि शपथ कधी द्यायची याची तारीख निकालाचे गॅझेट नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानंतर घोषित करण्यात येईल. राज्यपालांच्या या निर्णयामुळे शपथविधी पुढे गेल्याच दिसू लागले. त्यामुळे या प्रकरणावरुन ममता बॅनर्जी आणि जगदीप धनखड पुन्हा आमने-सामने आले.

कलम १८८ काय सांगते?

संविधानाच्या कलम १८८ मध्ये म्हटले आहे कि,

राज्याच्या विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा निवडून आलेला प्रत्येक सदस्य राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेईल आणि त्यावर सही करेल.

म्हणजेच, एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आमदारकीची शपथ एकतर राज्यपालांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीद्वारेच दिली जाऊ शकते. हे नियुक्त केलेले व्यक्ती म्हणजे सर्वसामान्यपणे विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती असतात. किंवा राज्यपाल स्वतः शपथ देऊ शकतात. आपल्या याच अधिकाराचा वापर करून राज्यपाल धनखड यांनी स्वतः ममतांसह तीन आमदारांना शपथ देण्याचा निर्णय घेतला.

या सगळ्यामुळे आज दिवसभर ‘ममतांच्या आमदार बनण्यात राज्यपालांचा अडथळा’ अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे राज्यपाल चांगलेच वादात सापडले.

या सगळ्याचा शेवट काय झाला?

सरकारचे मत होते की जर राज्यपाल शपथ देणार असतील तर त्यांनी विधानसभेत येऊन शपथ द्यावी, राजभवनात नाही. आणि हा कार्यक्रम ७ ऑक्टोबरलाच व्हावा. यावर दिवसभर बऱ्याच चर्चा, वाद-विवाद, तू-मी होऊन अखेरीस ममतांच्या शपथविधीच घोड संध्याकाळपर्यंत गंगेत न्हाहले.

५ ऑक्टोबरला संध्याकाळी राज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले की,

ममतांच्या शपथविधीचा कार्यक्रम ७ ऑक्टोबर रोजी विधानसभा भवनात पार पडेल. म्हणजेच सगळ्या वादाचा, चर्चेचा सध्या तरी हॅपी एंडिंग झाला आहे. त्यामुळे आता ७ तारखेला ममता बॅनर्जी यांच्यासह झाकीर हुसेन आणि अमीरुल इस्लाम हे देखील आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.