एकूणच प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.

“आपकी औकात आपको ये ट्रेलर देखने कि अनुमती नही देता”

अशी पंचलाईन टीजर मध्येच दाखवणाऱ्या आर्टिकल 15 चित्रपटाने प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती.
चित्रपट अक्षरशः अंगावर येतो. तरी तो अत्यंत संयम ठेवून बनवलाय. जास्तीत जास्त वास्तविकतेला जवळ राहण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे कुठेही लाऊड होत नाही. अनेक क्षण असे आहेत जिथे टिपिकल बॉलिवूड चित्रपट असता तर हिरो ने सामाजिक न्याय अन्याय वर लंबे चौडे डायलॉग् फेकले असते. पण ते येथे नाहीय आणि तीच चित्रपटाची जमेची बाजू आहे.

इथला आयपीएस आयान(अंशुमन) हा माझ्या आवडत्या सरफ़रोश मधील आयपीएस राठोड(आमिरखान) पेक्षा देखील ग्राउंड वर आहे व हिरोगिरीच्या अनेक शक्यता व जागा असतांनाही तो संयत आहे हे विशेष.

ये औकात क्या होती है? याचे दिले गेलेले उत्तर,

‘उतना देते है जीतनी उनकी औकात है. उतना रखते है जीतनी हमारी औकात.’

चित्रपटात औकात शब्द अनेकदा येतो आणि त्यात त्याचा त्या वातावरणातील अर्थही असा उलगडून सांगितला जातो.

दिल्ली निर्भया केस, जम्मू काश्मीर रेप केस व कठूआ रेप अँड हँग केस या सर्व सत्य घटनांची आठवण हा चित्रपट पाहतांना येतो. पण मुळात तो फक्त या विषयावर नसून जातीत गाडल्या गेलेल्या भारतीय मानसिकतेवर आहे.
म्हणून आर्टिकल 15 हे घटनेचे सेक्शन मोठ्या कागदावर प्रिंट काढून अंशुमन पोलीस स्टेशनच्या बाहेर लावतो तेव्हा सर्व जण उत्सुकतेने ते वाचायला लागतात.

आपली ओळख सांगतांना ते अशा पद्धतीने जातींचा उल्लेख करतात जस ते आपली वेगवेगळी नावे सांगत आहेत. उत्तर भारतात काम करणारे मित्र सांगतात तिकडे ‘कौन जात’ हा प्रश्न खूप नॉर्मल आहे, त्याची सवय होईपर्यंत खूप ऑकवर्ड वाटते नंतर सवय होते. हि सवय इतकी नॉर्मल बनते कि त्या उत्तरावर आधारित discrimination व्हायला लागते ते कळत नाही व आपण काही गुन्हा करतोय हेही कळत नाही. भयंकर आहे सगळे.

आक्रोश नावाचे दोन सिनेमे या आधी येऊन गेले.

एक आक्रोश ज्याची स्क्रिप्ट तेंडुलकरांची होती. त्यातही आदिवासी महिलेवरील झालेला अत्याचार दडपण्यासाठी सर्व यंत्रणेतील गुन्हेगारी वृत्तीचे लोक कसे दबाव आणून केस फिरवण्याचा प्रयत्न करतात हेही खूप भेदक पद्धतीने दाखवलेले आहे. शेवटी लहाण्या आपल्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून मारतो. संपूर्ण चित्रपटात मूक असलेला लहाण्या अर्थात ओमपुरी फक्त याच दृश्यात मोठ्याने ओरडतो. तो अनेक वर्षांचा आक्रोश बाहेर काढतो. आर्टिकल 15 मध्ये देखील दबावाने मुलींचे वडील भयानक कारण दाखवून आपणच मुलींना मारले असे सांगतात तेव्हा त्या लहाण्याचीच आठवण येते.

न्याय मिळण्याच्या सर्व दरवाजे बंद झाल्यावर उरला सूरला असलेला जीव वाचवण्यासाठी ज्या असहाय्य पणे ते गुन्हा कबुल करतात ते म्हणजे समाजाचा आरसा दाखवतात. बिसलरी च्या दोन घोटा एवढी किंमत असलेल्या 3 रुपयांसाठी जर इतका अघोरी पण केला जात असेल तर स्वतः च्या देशाला महान तरी कोणत्या नजरेने म्हणायचे?

दुसरा एक आक्रोश होता, अजय देवगण व अक्षय खन्ना यातही जातीय आधारावर झालेल्या ऑनर किलिंग चा तपास दाखवण्यात आलेला आहे. तपासी अधिकाऱ्यांवर स्थानिक दबाव तसे वातावरण हेही अप्रतिम आहे फक्त तो थोडा फिल्मी होता.

आर्टिकल 15 ने हे बेरिंग कुठेही सोडले नाही याबाबत डायरेक्टर अभिनंदनास पात्र आहे.

प्रशासनातील खालच्या स्तरावर काम करणारे कर्मचारी वा अधिकारी मग ते पोलीस असो डॉक्टर असो वा अजून कोणी पण त्यांच्यातील परस्पर संबंध जातीसह अनेक बाबतीत किती गुंतागुंतीचे असतात व बॉस बदलला कि त्यांना ते कस बदलाव लागत हि एक वेगळी बाजू यात दाखवली आहे. याबाबतील दृश्य व डायलॉग्ज वास्तववादी आहेत.

‘आप को झाड़ू ही लगाने देना चाहिए था…….’

या अपमानावर फक्त डोक्यातील टोपी काढून ‘कब तक लगायेंगे हम झाड़ू..म्हणून त्या दलित पोलिसाच्या चेहऱ्यावरील हावभाव खुप काही सांगुन जातात. आपल्या तोंडात त्याने न बोललेले पुढील अनेक डायलॉग येवून गप्प बसतात. पण त्याचे ते त्या प्रसंगी शांत राहने हजार शब्दांचे काम करतात.

चित्रपटातील अजुन एक उल्लेखनीय बाब म्हणजे वर वर आपण कितीही आदर्शवादी गप्पा मारल्या तरी गटारी साफकरणे, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावने हि सर्व तुच्छ समजली जाणारी कामे अजुनही दलित समाजातील लोकच करत आहेत. हे अनेक लहान मोठ्या दृश्यातुंन पण तरीही अंडरटोन राहून चित्रपटात दाखवले आहे. तो टोन खर तर प्रेक्षकांनी पकडणे गरजेचे आहे. पोलिस स्टेशन मधील गटारीचे मेन होल मधील गटारीतील घाण पाणी उपसताना दाखवलेला कामगार हा या जगाचे प्रतिनिधिक रूप दाखवतो.

कोर्ट या मराठी चित्रपटात या बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तो इतक्या अबोध स्वरूपात दाखवला गेला होता की तो माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांपर्यन्त फारसा पोहचला नाही.

आर्टिकल १५ मध्ये पोस्ट मॉर्टम करणारी डॉक्टर ज्या प्रेशर मध्ये काम करतांना दिसते त्या प्रत्येक वेळी वाटते एखादा मोठा दबाव या लेडी डॉक्टर साठी जीव धोक्यात घालणारा होऊ शकतो पण तरी कुठल्याशा अंतर्गत प्रेरणेने ती रिस्क घेते. तिला जिवाची हमी देणारा आय.पी.एस अंशुमन खरच ऐन वेळी उपलब्ध झाला नाही तर पुढे काय हा प्रश्न तिला नक्कीच पडला असेल. पण ज्या निडरतेने ती डोळ्यात डोळे घालून त्या मुलींच्या मृत्यूचे खरे कारण सांगते व् पुढील तपासण्यांसाठी तयार होते. तेव्हा कुठेतरी वाटते घटना पाळण्याचे काम अशीच छोटी मोठी माणसे करतायत म्हणून हा देश अजुनही टिकून आहे.

राजकारणासाठी वापरण्यात आलेल्या जातीच्या राजकारणाचे पदर देखील यात आहेत पण तेही कथेशी तितक्याच प्रामाणिक राहून दाखवले आहेत. म्हणून मग,

‘हम कभी हरिजन हो जाते है, तो कभी बहुजन हो जाते है, बस जन नहीं बन पाते. वो जन गण मन वाले जन..’

अस सणसणीत वास्तव पण आपल्यापुढे मांडलं जात तेव्हा ते सर्वांना पटतं. एकूणच प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.

– समाधान महाजन. (7972552439)
हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.