थेट दूसरी “सेना” काढून राजकारणात आव्हान देण्याचं पहिलं काम केलेलं ते अरुण गवळीने..

एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव असेल.. शिवसेना बाळासाहेब ठाकरे..

सकाळी या बातम्या प्रसिद्ध कऱण्यात आल्या. मात्र अद्याप या गोष्टीला शिंदेगटाकडून दुजोरा मिळाला नाही. केसरकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही आमच्यात बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक असा उल्लेख करत आहोत.

मात्र एक गोष्ट या बंडखोरीत पक्की झालेली आहे आणि ती म्हणजे स्वतंत्र सेना. बंडखोरीचा मार्ग मागे घेतला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक सेना दिसेल अस चित्र सध्या तरी दिसत आहे. मुंबईत राहून..बाळासाहेबांच्या शिवसेनेविरोधात दूसरी सेना काढण्याचं काम फक्त राज ठाकरेंनी केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढून राज ठाकरेंनी सुरवातीच्या काळात शिवसेनेला चांगलाच घाम फोडला होता.

पण त्यापूर्वी देखील एका व्यक्तीने बाळासाहेबांच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी एक सेना काढली होती व त्या सेनेचं नाव होतं अखिल भारतीय सेना..

ही गोष्ट आहे अरुण गवळीची आणि त्याच्या सेना समर्थन ते सेना विरोधाची..

“तुमचा दाऊद तर आमचा गवळी.”

बाळासाहेबांच प्रसिद्ध वाक्य. बाळासाहेब हे वाक्य म्हणाले होते का? तर हो. काढणाऱ्यांनी त्याचा अर्थ दाऊद मुस्लीम म्हणून गवळीला बाळासाहेबांनी सपोर्ट केला होता असाही काढला. खुद्द गवळीने देखील तसाच अर्थ काढला होता. बाळासाहेबांचा गवळीला पाठिंबा होता की नव्हता हि आजही उघडपणे चर्चा न करण्याची गोष्ट.

महाराष्ट्रात विधानसभेच्या इलेक्शनचा प्रचार सुरू होता.

अशाच एका प्रचारसभेत कॉंग्रेस आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर तोफ डागत असताना बाळासाहेबांनी तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं वाक्य उच्चारल्याच सांगण्यात येत. त्यासाठी आपल्याला पाच वर्षांपुर्वीचा इतिहास पहायला लागतो.

शिवसेनेचा आवाज तेव्हा विधानसभेत पोहचला होता. इकडे दाऊद हा मुंबईचा एकमेव डॉन झाला होता. त्याला फक्त एकच डॉन नडत होता. अरुण गवळी. अरुण गवळी तेव्हा दाऊदचा एकमेव दुश्मन होता. दाऊदच्या वर्चस्वाला हादरे देण्याच काम चालू होता. मुळच्या BRA अर्थात बाबू रेशीम आणि रमा नाईक या दोघांचा खून झाला होता. त्या गॅंगमधला फक्त अरूण गवळी राहिला होता. अरुण गवळी आणि दगडी चाळीची चांगलीच दहशत माजली होती.

या दरम्यान इब्राहीम पारकरची हत्या झाली.

इब्राहीम पारकर हा दाऊदचा भाऊ. दाऊदच्या भावाची गेम केल्याने वातावरण गच्च झालं होतं. हा खून गवळी गॅंगच्या लोकांनी केला होता. हत्या घडवून आणणारे पोलीसांच्या ताब्यात होते आणि त्यांना जे.जे. हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलं होत. दाऊदला त्या दोन शूटरचा बदला घ्यायचा होता. त्यावेळीच मुंबईच्या इतिहासात उल्लेखलं जाणार जे.जे. हॉस्पीटल कांड घडलं.

रात्रीच्या वेळेस दाऊदचे शुटर जे.जे. हॉस्पीटलमध्ये घुसले. दोन्ही शूटरना लक्ष्य करण्यात आलं. यावेळी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. या हत्याकांडामुळे एक गोष्ट झाली होती, ती म्हणजे दाऊदच्या शूटरना पळून जाण्यासाठी भिवंडीच्या तत्कालीन कॉंग्रेस महापौरानी मदत केली होती. त्या आरोपाखाली त्यांना पुढे अटक देखील करण्यात आली होती.

दाऊदच्या शूटरना पळून जाण्यासाठी स्वत:ची गाडी दिल्याचा आरोप महापौरांवर झाला आणि दाऊदची चर्चा विधानसभेमध्ये गाजली.

असच दूसरं एक उदाहरण म्हणजे उपायुक्त गो.रा.खैरनार.

खैरनार यांनी शरद पवारांना बेफाम आरोप केले होते. या आरोपांमध्ये शरद पवारांचे दाऊदसोबत संबध असल्याचा सूर होता. पवार संरक्षण मंत्री असताना त्यांच्या विमानात दाऊदचे निकटवर्ती शर्मा कसा प्रवास करु शकतात असा प्रश्न खैरनार यांनी विचारला होता. खैरनार नक्की काय करत होते तर मुंबईतील अनधिकृत बांधकामे पाडत होते. या अनधिकृत बांधकामात दाऊदची आवडती महनजीब बिल्डिंग देखील होती. खैरनार यांनी थेट त्या बिल्डिंगला हात लावला होता. त्यानंतर खैरनार यांचे पवारांवर आरोप वाढत गेले. तत्कालीन कॉंग्रेस सरकार त्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहे असा एकंदरित रोख होता.

या दोन्ही गोष्टीमुळे कुठेतरी कॉंग्रेसचा दाऊदला पाठिंबा असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. विरोधकांनी आणि विशेषत: बाळासाहेबांनी दाऊद सारख्या गुंडाना कॉंग्रेस अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असल्याच सुचित केलं होतं. पण तेव्हा दाऊद हा आंतराष्ट्रीय दहशतवादी नव्हता, तर तेव्हा तो फक्त एक गुंड होता. जसा अरूण गवळी तसाच दाऊद.

पण मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि दाऊदचा खरा चेहरा उघडकीस आला.

१९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांना कॉंग्रेसने दाऊदसारख्या गुंडाना पाठिशी घातल्याचा परिणाम होता हे शिवसेनेने लोकापर्यन्त यशस्वीपणे पोहचवलं. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद दुबईला पळून गेला. दुबईत बसून तो मुंबईतल्या गॅंग चालवू लागला. याच पार्श्वभूमीखाली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन लागल्या.

एका सभेत बाळासाहेबांनी तुमचा दाऊद तर आमचा गवळी अस वाक्य उच्चारलं. या वाक्यानंतर अरुण गवळीचा दबदबा वाढला. दाऊद मुस्लीम म्हणून तो आपला नाही तर अरुण गवळी हिंदू म्हणून आपला असा अर्थ देखील काढला गेला. खुद्द अरुण गवळीनेच तसा समज करुन घेतल्याने पुढे त्यांचे संबध बिघडत गेल्याच सांगण्यात आलं.

१९९५ साली निवडणूका पार पडल्या आणि युतीचं शासन सत्तेत आलं.

बाळासाहेबांच्या वाक्यामुळे सत्ता आपलीच असल्याची भावना गवळीची झाली होती. दाऊद देखील दुबईत बसून मुंबईत गॅंगवार घडवून आणायचा. त्यावेळी गवळी औंरगाबादच्या जेलमध्ये होता.  कॉंग्रेसच्या काळातच गवळी आत गेला होता. पण युतीची सत्ता येताच तो सुटला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. MPDA अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

त्यांची अटक थांबवण्यासाठी सेनेचे खासदार मोहन रावळे आग्रीपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसले होते पण याचा फायदा झाला नाही. त्यामुळे हि सत्ता आपली नाही अशी भावना दगडी चाळीची झाली. औंरगाबादच्या जेलमधून तो आपल्या शुटरला ऑर्डर द्यायचा. गवळी आणि दाऊद सोबतच मुंबईत छोटेमोठ्ठे डॉन तयार होत होते. छोटा राजन देखील आत्ता दाऊदचा दुश्मन झाला होता. नाईक गॅंग देखील होतीच.

दिवसाढवळ्या खून होवू लागले. अखेर राज्यसरकारवर दबाब वाढू लागला. तेव्हा गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सल्यातूनच एन्काऊंटरची स्किम आणल्याच सांगण्यात येतं.

साळसकर, प्रदिप शर्मा, दया नायक सारख्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या गॅंगवारमधल्या प्रत्येक टोळीतील १० शुटरची यादी केली. एकामागून एका गुंडाचा खात्मा करण्यास सुरवात झाली. त्याच दरम्यान अरुण गवळीचं कनेक्शन तोडण्यासाठी अरुण गवळीची रवानगी औरंगाबादमधून अमरावतीच्या जेलमध्ये करण्यात आली. बाहेर अरूण गवळीच्या शूटरचा खात्मा होत होता आणि कनेक्शन तुटल्यामुळे अरूण गवळी आत तळमळत होता.

अरुण गवळीच्या मते युतीच सरकार म्हणजे आपलं सरकार होतं, पण मुलाहिजा न ठेवता एन्काऊंटर झाले. या सर्वांना बाळासाहेब ठाकरेच जबाबदार असल्याची भावना अरूण गवळीने केली होती.

त्यातच त्याला अमरावतीला पाठवण्यात आल्यामुळे गवळी चिडला होता. जोपर्यन्त सत्ता मिळत नव्हती तोपर्यन्त शिवसेनेने आपल्याला जवळ केलं, सत्ता आल्यानंतर गवळी गॅंग संपवण्याचा विडा उचलला अशी गवळीची भावना होती.

बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र म्हणून जयंत जाधव सक्रिय होते. जयंत जाधव सेनेत कोणत्याच पदावर नव्हते पण त्यांचा सेनेतला शब्द अंतीम होता. अस सांगितल जात की जयंत जाधवांच्या सल्यानेच अरुण गवळीला अमरावतीला पाठवण्यात आलं होतं. गवळीने अमरावतीत पुन्हा आपलं नेटवर्क उभा केलं. दिनांक ३० एप्रिल १९९६ ला जयंत जाधवांचा खून झाला. हा खून अरुण गवळीने घडवून आणला होता. या खूनात त्याला अटक देखील झाली पण साक्षीदार फितूर झाल्याने अरुण गवळी त्यातून सुटला.

अरुण गवळी बाहेर पडला. त्याने बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटले. आणि आपला पक्ष उभारला,

त्या पक्षाच नाव अखिल भारतीय सेना.

शिवसेनेच्या थिमवरच त्याने हा पक्ष उभारला होता. त्यासाठी सर्वात मोठ्ठी मदत झाली ती जितेंद्र दाभोळकरची. अखिल भारतीय कामगार सेनेतून राजकारणामुळे बाहेर पडलेला जितेंद्र दाभोळकर हा अखिल भारतीय सेनेचा ब्रेन झाला. त्यांच्या नेतृत्वात अभासे हा पक्ष जोर पकडू लागला. आझाद मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. स्थानिक सेनेच्या शाखेतील तरुणांचा ओढा गवळीकडे वाढू लागला आणि काल आलेला गवळीचा पक्ष सेनेला हादरे देवू शकतो अशी भावना खुद्द सेनेच्या नेत्यांची झाली.

त्या वर्षभरात अभासे ने साडेतीन लाखाहून अधिक जणांना सदस्य करुन घेतले. मुंबईत असणाऱ्या सेनेच्या शाखांवरील बोर्ड जावून तिथे अखिल भारतीय सेनेचे बोर्ड उभा करण्यात आले.

प्रत्येकाच्या मते आत्ता सेनेची जागा अखिल भारतीय सेने घेईल असच होतं. पण ४ ऑक्टोंबर १९९७ रोजी जितेंद्र दाभोळकरची हत्या झाली आणि अखिल भारतीय सेनेला ब्रेक लागला. तिथून पुढे अखिल भारतीय सेना वाढू शकली नाही.

सांगणारे असेही सांगतात की एन्काऊंटर करण्यात आलेले सर्वात जास्त शुटर गवळी गॅंगचे होते. कालांतराने गवळी फक्त दगडी चाळीपुरता सिमीत राहिला. पुढे गवळी राजकारणात उतरला. २००४ च्या लोकसभा इलेक्शन तो उतरला पण त्याचा पराभव झाला, लगेच झालेल्या विधानसभेला तो निवडून आला. गवळी पहिल्यांदा आमदार झाला. पण कमलाकर जामसंडेकर या शिवसेना नेत्यांच्या खूनात त्यांचा सहभाग असल्याच सिद्ध झालं आणि जन्मठेपेची शिक्षा मिळाली.

पुलाखालून बरच पाणी गेलं. २०१४ साली गिता गवळी विधानसभेला उभा राहिल्या. अरुण गवळीच्या अनुपस्थितीत त्यांची पहिली निवडणूक. तेव्हा शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो निर्णय म्हणजे त्यांच्या विरोधात सेनेचा उमेदवार उभा न करणं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.